अतिश श्रीपाद दाभोलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अतिश दाभोलकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अतिश श्रीपाद दाभोलकर (जन्म: १६ सप्टेंबर १९६३, कोल्हापूर) हे भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत.[१] नोव्हेंबर २०१९ मध्ये अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेन्टर फॉर थिओरिटिकल फिजिक्स (आय सी टी पी)  च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. त्याआधी ते आय.सी.टी.पी च्या उच्च ऊर्जा, विश्वविज्ञान आणि खगोल भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी कार्यरत होते. स्ट्रिंग थियरी, कृष्णविवरे आणि पुंजकीय गुरुत्व याकरता ओळखले जाणारे दाभोलकर हे भारतीय विज्ञान अकादमीचे निर्वाचित सदस्य आहेत. २००६ साली वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद (कॉऊंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) या भारतातील वैज्ञानिक संशोधनाच्या सर्वोच्च संस्थेकडून पदार्थ विज्ञानातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट युवा नेतृत्व म्हणून आय आय एम राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. फ्रान्सच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या चेअर ऑफ एक्सलन्स् या पुरस्काराचे ते मानकरी आहेत.

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

शैक्षणिक पार्श्वभूमी [संपादन]

अतिश दाभोलकर यांचा जन्म १९६३ साली कोल्हापुरात झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण गारगोटी येथून पूर्ण केले. १९८५ साली कानपुर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून भौतिकशास्त्र विषयात त्यांनी एम्.एस सी ही पदवी मिळवली. १९९० मध्ये त्यांनी प्रिन्सटन् विद्यापीठातून जेफ्री हार्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सैद्धान्तिक भौतिकशास्त्रात पीएच. डी. ही पदवी संपादन केली.

संशोधन कारकीर्द[संपादन]

पीएच. डी. नंतर त्यांनी रटगर्स  विद्यापीठात व हार्वर्ड  विद्यापीठात संशोधन केले. त्यानंतर  कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी दोन वर्षे वरिष्ठ संशोधक म्हणून काम केले. १९९६ ते २०१० पर्यंत टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी सैद्धान्तिक भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. नोव्हेंबर २०१९ मध्ये इटली मधील त्रिएस्ते  येथील अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेन्टर फॉर थिओरिटिकल फिजिक्स (आय सी टी पी) च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. याआधी ते आय सी टी पी च्या उच्च ऊर्जा, विश्वविज्ञान आणि खगोल भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी कार्यरत होते. तसेच २००७ पासून ते फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च या संस्थेचे संचालक होते. २००३-०४ दरम्यान ते स्टॅनफर्ड विद्यापीठात तसेच २०१२ मध्ये युरोपियन ऑर्गनायजेशन ऑफ न्युक्लियर रिसर्च (CERN) येथे ते अतिथी अध्यापक म्हणून कार्यरत होते.

योगदान डॉक्टरेटचे मार्गदर्शक जेफ्री हार्वे यांच्याबरोबर संशोधन करताना त्यांनी सुपर सिमेट्री स्टेट स्पेक्ट्रमचा शोध लावला. पुढील काळात दाभोळकर - हार्वे स्टेट या नावाने तो ओळखला जाऊ लागला. स्ट्रिंग थिअरीच्या संशोधनामध्ये त्यांनी सुपर सिमेट्रीक सॉलिटॉनच्या अभ्यासाला सुरुवात केली. या अभ्यासानी पुढील काळात स्ट्रिंग थिअरी मधील ड्युएल सिमेट्रीजच्या संशोधनात आणि कृष्णविवरांच्या पुंजकीय संरचनेच्या अभ्यासात महत्वाची भूमिका बजावली.  स्ट्रिंग सिद्धांतामधील विशिष्ट प्रकारच्या कृष्णविवरांबद्दलच्या बेकेन्स्टन हॉकिंग संरचनेच्या पुंजकीय बदलांचे गणन हा त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय निष्कर्ष आहे. समीर मूर्ती आणि डॉन झँगियार यांच्या बरोबर संशोधन करून  त्यांनी गणितामधील मॉक मॉड्युलर फॉर्म्स आणि कृष्णविवरांच्या पुंजकीय संरचना यांमधील परस्पर संबंधांचा शोध लावला.

पुरस्कार [संपादन]

स्ट्रिंग सिद्धांतामधील सुपर सिमेट्रीक सॉलिटॉन्सचा मुलभूत अभ्यास तसेच पुंजकीय सिद्धांत हा कृष्णविवरांच्या पुंजकीय संरचनेमध्ये कसा बदल घडवू शकतो यातील योगदानाबद्दल त्यांना २००६ साली प्रतिष्ठेच्या डॉक्टर शांतिस्वरूप भट नागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय विज्ञान अकादमीचे ते निर्वाचित सदस्य  आहेत. २००८ मध्ये त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट युवा नेतृत्व म्हणून आय आय एम राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. फ्रान्सच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या वतीने चेअर ऑफ एक्सलन्स् या पुरस्काराने त्यांना २००७ मध्ये गौरविण्यात आले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Atish Dabholkar". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-05-23.