Jump to content

अतिमानव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अतिमानव (Superman) ही श्रीअरविंद तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना आहे.

अतिमानव - संकल्पना

[संपादन]

श्रीअरविंद यांचे तत्त्वज्ञान चेतनेच्या उत्क्रांतीच्या मूलभूत संकल्पनेवर आधारित आहे. मानव हा उत्क्रांतीमधील शेवटचा टप्पा नसून, मानवानंतर 'अतिमानासिक जीव' नावाची एक स्वतंत्र जीवयोनी उदयाला येणार आहे. परंतु ती जीवयोनी उदयाला येण्यापूर्वी, मानव ते अतिमानसिक जीव यांच्या दरम्यानची एक श्रेणी असणार आहे आणि ती श्रेणी म्हणजे अतिमानव, असे श्रीअरविंद यांनी सांगितले आहे.[]

अतिमानवाचा बाह्य रूपाकार हा मानवाप्रमाणेच असेल आणि त्याचा जन्म हा मनुष्याप्रमाणेच असेल पण त्याने स्वतःच्या चेतनेमध्ये इतके रूपांतरण केलेले असेल की त्याच्या कृती आणि त्याचे साक्षात्कार हे अतिमानवास साजेसे असतील. []

या अतिमानवांना अतिमानसिक सृष्टीचे रहस्य ज्ञात होईल आणि त्यांच्या माध्यमातून अतिमानासिक जिवांचा जन्म होऊ शकेल, असे परंपरा मानते.[]

नित्शे पुरस्कृत अतिमानव आणि श्रीअरविंद पुरस्कृत अतिमानव

[संपादन]

अतिमानव ही संकल्पना नित्शे यांनी मांडली आहे. परंतु त्यांनी मांडलेली अतिमानवाची संकल्पना आणि श्रीअरविंद यांनी मांडलेली अतिमानावाची संकल्पना यामध्ये मूलभूत फरक आहे. श्रीअरविंद लिखित सुपरमॅन या लेखात श्रीअरविंद यांनी नित्शे या तत्त्वज्ञाने मांडलेल्या अतिमानव या संकल्पनेचा परामर्श घेतलेला आहे.[]

नित्शे पुरस्कृत अतिमानव

[संपादन]

सामान्य मानवाहून गुणदृष्ट्या खूप वरचढ होणे, व्यक्तित्त्व विस्तृत करणे, अहम्‌ मर्यादेबाहेर वाढणे, बौद्धिक सामर्थ्य आणि वासना-सामर्थ्य शक्य असेल तेवढे वाढविणे, मानवी अज्ञानाच्या (अर्धवट ज्ञानाच्या) अंगभूत शक्ती अतिरेकी प्रमाणात मिळविणे, अतिमानवाने सामान्य मानवतेवर वर्चस्व गाजविणे या गोष्टी नित्शे या जर्मन तत्त्ववेत्त्याने मांडलेल्या कल्पनेमध्ये समाविष्ट होतात. []

श्रीअरविंद पुरस्कृत अतिमानव

[संपादन]

अतिमानव असणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देवाचे शक्तिसामर्थ्य मानवामध्ये येणे. मानव मनाच्या अतीत जाईल तेव्हा तो अतिमानव होऊ शकेल, आपल्या आत्म्याला प्राकृतिक बंधनांतून मोकळे करून त्याचा प्रकाश, त्याचे सामर्थ्य, त्याचे सौंदर्य सार्वभौम केल्यामुळे तसेच खऱ्या आत्म्याची बांधणी केल्यामुळे आणि आत्म्याचा साक्षात्कार करून घेतल्यामुळे खरी अतिमानवता संपादन करता येईल, असे श्रीअरविंद म्हणतात.[] जो छिन्नविच्छिन मनोमय मानवी अस्तित्वाच्या आणि जडभौतिकाच्या वर उठून, वैश्विकतेने स्वतःला भारून घेईल आणि दिव्य शक्ती, दिव्य प्रेम व दिव्य आनंद, दिव्य ज्ञान यामध्ये देवत्व पावेल तो अतिमानव, अशी श्रीअरविंद यांनी अतिमानवाची व्याख्या केली आहे.[]

अतिमानवाकडे असलेल्या क्षमता

[संपादन]

अंतर्ज्ञान, पूर्वज्ञान, तादात्म्यातून प्राप्त होणारे ज्ञान, आजार बरे करण्याची क्षमता, परिस्थितीवर कार्य करण्याची क्षमता अशा काही क्षमता अतिमानवाकडे असू शकतात असे श्रीमाताजी यांनी सांगितले आहे. [] मानवाकडे जशी विचारशक्ती स्वाभाविक असते त्याप्रमाणे, अतिमानवाकडे अंतर्ज्ञानाची शक्ती स्वाभाविक असेल असे श्रीअरविंद यांनी सांगितले आहे.[]

अतिमानवी-चेतनेचे आविष्करण

[संपादन]

०१ जानेवारी १९६९ रोजी अतिमानवी-चेतनेचे आविष्करण या पृथ्वीवर घडून आले, असे श्रीमाताजी यांच्या अनुभवास आले. []

अधिक वाचनासाठी

[संपादन]

अतिमानव (पुस्तिका)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b The Mother (1977). Questions and Answers 1957-1958. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 09 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. p. 313. ISBN 81-7058-670-4.
  2. ^ a b c The Mother (1980). Words of The Mother - III. Collected Works of The Mother. 15. Pondicherry: Sri Aurobindo Ashram, Pondicherry. pp. 105, 384, 110. ISBN 81-7058-670-4.
  3. ^ अतिमानव, ले.श्रीअरविंद, अनुवाद - सेनापती बापट, १९६४
  4. ^ a b c श्रीअरविंद. "मानव आणि अतिमानव". अभीप्सा. जानेवारी २०१९.
  5. ^ Sri Aurobindo (1997). Essays Divine and Human. The Complete Works of Sri Aurobindo. 12. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 439.