अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग हे इतर जीवांमुळे न होणाऱ्या जीव आहेत.

या रोगांमुळे वनस्पतींच्या कोशिकाक्रियांत बिघाड होतो. व्हायरसजन्य रोगांपेक्षा हे रोग भिन्न असतात. कारण हे बहुधा परिस्थितिजन्य असून संक्रामक (फैलावणारे) नसतात.

या रोगांची अनेक कारणे आहेत, ती अशी : (१) वनस्पतींच्या वाढीला पोषक तापमान नसणे—तापमान अति-उष्ण अथवा अतिशीत असल्यास प्रत्येकाची भिन्न लक्षणे निरनिराळ्या पिकांवर आढळतात. (२) योग्य प्रकाशाचा अभाव. (३) पोषक हवामानाची अथवा ऑक्सिजनाची न्यूनता (कमतरता). (४) दूषित हवामान.(५) मातीतील आर्द्रता कमी किंवा अधिक असणे. (६) मातीतील कार्बनी पदार्थांच्या विघटनामुळे उद्भवणारे विषारी पदार्थ. (७) पोषक व घटक द्रव्यांची उणीव वा आधिक्य. (८) पीक संरक्षणात तीव्र कवकनाशके व कीटकनाशके यांचा उपयोग. (९) इतर कारणे.

यांपैकी एक अथवा अधिक कारणे वनस्पतीच्या वाढीच्या काळात आढळल्यास त्यांचा वनस्पतीवर परिणाम होऊन निरनिराळी लक्षणे उद्भवतात. म्हणूनच या प्रत्येक कारणाचा स्वतंत्ररीत्या विचार कारावा लागतो.

(१) वनस्पतीच्या वाढीस पोषक तापमान नसणे:तीव्र तापमानाचा बऱ्‍याच वनस्पतींवर परिणाम होतो. नारळीच्या व पोफळीच्या झाडांना दक्षिण लागते (म्हणजे दक्षिणायनातील ऊन बाधते). हे लक्षण कोकणात नेहमीच आढळते. उन्हाच्या तिरपेमुळे खोडावर लांबसर अशा खाचा पडून झाड कमजोर बनते व वादळी वाऱ्‍यामुळे कोलमडते. कित्येक वनस्पतींवर शेंडा जळणे, भाजल्यासारखे चट्टे पडणे, गाभा काळा पडणे इ. लक्षणे तीव्र तापमानामुळे होतात.

पानवेलीची पाने टोकापासून तांबूस होऊन वाळल्यासारखी दिसणे हा उन्हाच्या तडाख्याच्या परिणाम आहे. म्हणून पानमळ्यात गारवा ठेवतात. पाश्चिमात्य देशांत सफरचंदाच्या फळावर भाजल्यासारखे खोलगट चट्टे उन्हाळ्यात तापमान ३८०से. पेक्षा जास्त असल्यामुळे पडतात. त्यामुळे फळांचे अपिरिमित नुकसान होते. उन्हाच्या तडाख्याचा परिणाम नाजूक फळे व भाजीपाल्यावरही होतो.