लाहिरी महाशय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाहिरी महाशय

श्यामाचरण लाहिरी (बंगाली : শ্যামাচরণ লাহিড়ী)(सप्टेंबर ३०, इ.स. १८२८ - सप्टेंबर २६, इ.स. १८९५) हे लाहिरी महाशय या नावाने अधिक प्रसिद्ध असणारे भारतीय योगी आणि महावतार बाबाजी यांचे शिष्य होते. योगीराज आणि काशीबाबा या नावांनीही ते लोकप्रिय होते. महावतार बाबाजींकडून १८६१ मध्ये शिकून घेतलेले क्रिया योगाचे तंत्र त्यांनी पुनरुज्जीवित केले. लाहिरी महाशय हे युक्तेश्वर गिरी यांचे गुरू होते. संस्कृतमध्ये महाशय या उपाधीचा 'मोठ्या मनाचा' असा होतो.[१] भारतीय साधूंशी तुलना करता ते वेगळे होते; कारण त्यांनी लग्न केले, कुटुंब चालविले, लष्करी अभियांत्रिकी खात्यात ब्रिटिश सरकारसाठी हिशेबनिसाचे काम केले. मंदिर किंवा मठात राहण्याऐवजी ते वाराणसीला आपल्या घरीच राहिले. आयुष्यभर त्यांनी सहजरीतीने कोणत्याही संस्थेशी फारसा संबंध न ठेवता क्रियेचा प्रसार केला. त्यांच्या स्वतःच्या पवित्र जीवनामुळे त्यांचे अनेक अनुयायी तयार झाले आणि अनेक क्रियावान प्रगत शिष्यांचे ते गुरू झाले. अशा शिष्यांमध्ये स्वामी श्री युक्तेश्वर गिरी व पंचानन भट्टाचार्य यांचा समावेश होतो. “आदर्श गृहस्थ-योगी” या रूपात असाधारण जीवन जगत असल्यामुळे ते तत्कालीन आध्यात्मिक प्रेरणास्रोत बनले; एकोणिसाव्या शतकात हिंदू धर्मवाद्यांमध्ये त्यांचा बोलबाला होता.

युक्तेश्वरांचे शिष्य श्री परमहंस योगानंद यांच्यामुळे व त्यांच्या योगी आत्मकथा पुस्तकामुळे (१९४६) पाश्चिमात्य जगतास लाहिरी महाशयांचा परिचय झाला. योगानंदांनी त्यांच्या जीवनास ख्रिस्तासारखे जीवन मानून त्यांचा गौरव ‘योगावतार’ असा केलेला आहे. योगमार्गातील सिद्धपुरुषांनी योगप्रसारासाठी लाहिरींची निवड केलेली असल्याने हा गौरव सार्थ ठरतो. लाहिरी महाशयांनी शिष्यांचे नैसर्गिक कल ओळखून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केले, क्रियेवर जोर देऊनही अन्य उपासनामार्गांचे स्वातंत्र्य अबाधित राखले ह्याची नोंद योगानंदांनी घेतलेली आहे. स्वतः सनातन हिंदू समाजातील उच्चवर्णीय ब्राह्मण असूनही काशीबाबांनी समाजाने बहिष्कृत केलेल्यांचा तसेच अन्यधर्मीय व्यक्तींचाही धैर्याने अंगीकार केला.

काशीबाबांबद्दलच्या अनेक विस्मयकारक गोष्टी योगानंदांच्या पुस्तकात आहेत. बाबाजींनी निर्माण केलेल्या प्रकाशमान महालात दीक्षाप्राप्ती आणि मृत शिष्यास जिवंत करणे अशा गोष्टींचा त्यात समावेश होतो. सेवानिवृत्तीच्या काळात कित्येकदा ते आपल्या घरातच ध्यानावस्थेत एका जागी झोपेची गरज न भासता बसलेले असत; घराच्या इतर भागात बऱ्याचदा ते जात नसत आणि रात्रंदिवस शिष्य व भटकंती करणारे साधू त्यांची भेट घेण्यास येत असत.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Yogananda, Paramahansa (1997). Autobiography of a Yogi, 1997 Anniversary Edition. Self-Realization Fellowship (Founded by Yogananda) http://www.yogananda-srf.org/. ISBN 0-87612-086-9.