करुणाष्टके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रगुरू म्हणून समर्थ रामदास सर्व महाराष्टाला वंदनीय आहेत. धार्मिक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीयच नव्हे तर प्रशंसनीय आहे. समर्थानी विपुल ग्रंथरचना केली आहे. ग्रंथराज दासबोध जिवनातील सर्वच अंगांना स्पर्श करतो. श्री आत्माराम व मनाचे श्लोक विवेक व वैराग्याची शिकवण देतात. रामदासांचे अभंग व करुणाष्टके रामावरील अतूट भक्तीचे द्योतक आहेत. समर्थांची करुणाष्टके कारुण्यपूर्ण भक्तीरसाने भरलेली आहेत. संसार तापाने होरपळून निघणाऱ्या मनाला शांतता लाभावी म्हणून यांत ते “जळत ह्रदय माझे जन्म कोटयानुकोटी ।मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी” अशी विनवणी करतात.”तजवीण रामा मज कंठवेना“ या करुणाष्टकात “आम्हा आनाथा तूं एक दाता ।संसारवेथा चुकवी समर्था“ अशी प्रार्थना करतात. “बुद्धि दे रघूनायका” या करुणाष्टकात आपल्या व्यक्तिमत्त्वाचे परखड परिक्षण करून रघुनाथाकडे सद्गुणांची, सावधानतेची भिक्षा मागतात. त्यातून त्यांची विनयशीलता व विचारशक्ती दिसून येते. करुणाष्टके म्हणजे करुणरसाने भरलेली आठ भक्तीगीते. परंतु सध्या सहाच करुणाष्टके उपल्बध आहेत. ही एकदां वाचली की, रोजरोज परतपरत वाचाविशी वाटतात.

करुणाष्टके—मागणे हेंचि आतां

नको द्रव्य दारा नको येरझारा ।नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा |सगुणी मज लावि रे भक्तिपंथा। रघूनायका मागणे हेचि आतां||५||

भावार्थ- श्री समर्थ रामदासांना कामिनी कांचनाचा मोह नाही कारण त्यामुळे माणुस जन्म म्रुत्युच्या चक्रात सापडतो असे रामदासांचे मत आहे.त्याना ज्ञान मार्गाची लालसा नाही कारण ज्ञानामुळे मनात गर्वाचा फुगारा निर्माण होतो. त्यांना सगुण भक्तीचा मार्ग अधिक पसंत आहे.या सगुण भक्तीची ते रामाकडे मागणी करीत आहे.

भवे व्यापिलो प्रीतिछाया करावी।क्रूपासागरे सर्व चिंता हरावी।।मज संकटी सोडवावे समर्था ।रघूनायका मागणे हेचि आतां।।6।।

भावार्थ- संसार रुपी संकटे व चिंता यांनी व्याप्त झालेल्या आपल्या मनाला श्री रामाने प्रीतीछाया देऊन शांत करावे. ते क्रूपासागर असून सर्व संकटे व चिंता या पासून आपली सुटका करावी अशी विनंती समर्थ रघूनायकाला करीत आहेत.

मनी कामना कल्पना ते नसावी।कुबुद्धी कुडी वासना नीरसावी।।नको संशयो तोडि संसारवेथा।रघूनायका मागणे हेंचि आतां।।७॥

भावार्थ- मनात निर्माण होणाऱ्या अनंत कामना व अमर्याद कल्पना ,कुबुद्धी व वाईट वासना यांचे निरसन व्हावे .संसारातील दुःखे मानसिक व्यथा ,संशय यांचा निरास व्हावा अशी विनंती समर्थ रघुनाथाला करीत आहेत.

समर्थापुढे काय मागो कळेना ।दुराशा मनी बैसली हे ढळेना।।पुढे संशयो नीरसी सर्व चिंता ।रघूनायका मागणे हें चि आता।।८॥

भावार्थ- आपल्या मनात दुराशा, चिंता व संशय यांनी घर केले आहे. त्यांनी मन भरून गेले आहे विचारांची गती कुंठीत झाली आहे.रघूनायका कडे काय मागणे मागावे हे कळेनासे झाले आहे.तरीही संशय निरसून सर्व चिंता दूर कराव्यात अशी विनंती श्री समर्थ करीत आहेत.

ब्रिदाकारणे दीन हाती धरावे। म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे।सुटो ब्रीद आम्हासि सांडूनी जाता।रघूनायका मागणे हेंचि आतां।।9॥

भावार्थ- दिनानाथ हे रघूनाथाचे ब्रिद असल्यामुळे त्यांनी दिनांना हाती धरावे .प्रेमळ भक्तांचा उद्धार करावा. त्यांची उपेक्षा केल्यास रघूनायकाचे ब्रीद खोटे ठरेल.आपले वचन सांभाळण्यासाठी तरी श्री रामाने आपल्या वर क्रूपा करावी .अशी निर्वाणीची मागणी श्री समर्थ या करुणाष्टकात करीत आहेत. भक्ती व करुण रसाने ओथंबलेली ही करुणाष्टके वाचून आपल्याला श्री समर्थांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना येते आणि मन त्यात नकळत गुंतून जाते. ती परत परत वाचाविशी वाटतात.

कळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु ।प्रत्यहीं पोट सोडीना बुद्धि दे रघूनायका ।।१०।। संसार नेटका नाही उद्वेगू वाटतों जिवीं । परमार्थु कळेना कीं बुद्धि दे रघूनायका ।।११।। देईना पुर्विना कोणी उगेचि जन हांसती । विसरु पडतो पोटी बुद्धि दे रघूनायका ।।१२ ।। पिशुने वाटतीं सर्वे कोणीही मजला नसे ।समर्था तू दयासिंधु बुद्धि दे रघूनायका ।।१३ ।।

अर्थ--जगात कोणी कौतुकास्पद शब्द उच्चारत् नाहीं.उलट सर्व लोक कुचेष्टेने हसतात. सावधानता नसल्याने काही गोष्टींचा विसर पडतो. या साठी श्री समर्थ सावधानी बुद्धीची श्री रामाकडे याचना करीत आहेत.

उदास वाटते जीवीं आतां जावें कुणीकडे ।तू भक्तवत्सला रामा बुद्धि दे रघूनायका ।।१४।।

अर्थ --आपल्या मनांत उदासीनता दाटून आली आहे. मदतीसाठी कुणाकडे जावे हे कळेनासे झाले आहे.श्री राम हे भक्तवत्सल आहेत त्यांनी योग्य मार्ग सुचवून या परिस्थिती तून सुटका करावी अशी प्रार्थना करतात.

काया-वाचा-मनोभावे तुझा मी म्हणवीतसें । हे लाज तुजला माझी बुद्धि दे रघूनायका ।।१५ ।।

अर्थ--काया ,वाचा मनाने आपण केवळ रघूनायकाचे आहोत.तेव्हा आतां आपली लाज राखणे केवळ रघूनायका लाच शक्य आहे .त्यांनी आपली लाज राखावी अशी विनंती श्री समर्थ रघूनायकाला करतात.

सोडविल्या देवकोटी भूभार फेडीला बळे ।भक्तांसी आश्रयो मोठा बुद्धि दे रघूनायका ।।१६ ।।

अर्थ--श्री रामांनी अनेक कोटी देवांची बंधनातून सुटका केली आहे,प्रुथ्वीचा भार हलका केला आहे.प्रेमळ भक्तांना फक्त रघूनायकाचाच आधार वाटतो. तेव्हां स्वामिंनी आपल्याला चांगली बुद्धि देऊन उपक्रुत करावे.

उदंड भक्त तुम्हाला आम्हाला कोण पुसतें ।ब्रीद हे राखणें आधी बुद्धि दे रघूनायका ।।१७ ।।

अर्थ--रघूनायकांना उदंड भक्त असून ते आपली कदाचित उपेक्षा करतील, परंतु आपले वचन खरे करण्यासाठी तरी रघूनायकाने आपल्याला योग्य मार्ग सुचवावा.असे श्री समर्थ म्हणतात.

उदंड ऐकली किर्ति पतितपावना प्रभो ।मी एक रंक दुर्बुद्धि, बुद्धि दे रघूनायका ।।१८।।

अर्थ--आपण आपल्या प्रभूची उदंड किर्ति ऐकली आहे.ते पतितपावन आहेत पण आपण एक दुर्बुद्ध ,दरिद्री भक्त असून सारासार बुद्धि देऊन रघूनायकाने आपणास मदत करावी अशी आशा श्री समर्थ करीत आहेत.

आशा हे लागली मोठी दयाळू बा दया करीं ।आणिक न लगे कांही बुद्धि दे रघूनायका ।।१९ ।।

अर्थ--श्री राम हे अत्यंत दयाळू असून त्यांनी आपल्याला सद्बुद्धी देऊन दया करावी या पेक्षा अधिक काहीही मागणी नाही असे श्री समर्थ आवर्जुन सांगतात.

रामदास म्हणे माझा संसार तुज लागला ।संशयो पोटीं बुद्धि दे रघूनायका ।।२० ।। अर्थ- - रामदासांनी पूर्ण शरणागती पत्करून आपली सर्व जबाबदारी रघूनायका वर सोपविली आहे, तरीही मन शंका ग्रस्त आहे. अत्यंत काकुळतीने ते रघूनायकाची करुणा मागत आहेत.

संदर्भ-

पुस्काचे नाव-श्रीमत ग्रंथराज दासबोध

लेखक- विनोबा भावे

बाह्य दुवे[संपादन]

  1. करुणाष्टके