आबालाल रहिमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आबालाल रहिमान
पूर्ण नावमुसप्पीर अब्दुल अझीज
जन्म १८६०
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू डिसेंबर २८, १९३१
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला, रेखाटन
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
प्रसिद्ध कलाकृती 'लेडी मेन्डिंग ड्रेस'(चित्रसंग्रह कोल्हपूरआर्टगॅंलरी -हर्षद कुलकर्णी,कोल्हापूर)
आश्रयदाते राजर्षि शाहू महाराज
अपत्ये बाबू (पुतण्या)

आबालाल रहिमान (१८६० - डिसेंबर २८, १९३१) वास्तववादी चित्रशैलीतील चित्रांकरता प्रसिद्ध असलेले एकोणिसाव्या शतकातील मराठी चित्रकार होते.

जीवन[संपादन]

आबालालांचा जन्म १८६० साली कोल्हापुरात झाला. त्यांच्या घराण्यात कुराणाच्या हस्तलिखित व सुलेखन, चितारकामाने सजवलेल्या प्रती बनवण्याचे काम पिढीजात केले जात होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात कारकून होते. ते फारसीमध्ये पारंगत होते. बालपणी आबालाल कुराणाची हस्तलिखिते रंगविण्यात वडलांना मदत करीत. त्यातूनच त्यांना बालवयात चित्रकलेची गोडी लागली. त्यांचे शिक्षण सहाव्या इयत्तेपर्यंत राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्यांना मराठी, संस्कृत, अरबी व इंग्रजी या भाषा येत होत्या. एका ब्रिटिश रेसिडेन्टच्या पत्नीने आबालाल यांची चित्रे पाहिली आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईला पाठविण्यासाठी घरच्यांना प्रवृत्त केले. शाहू महाराज व रिजन्सी कौन्सिल यांच्या आर्थिक मदतीने ते मुंबईला गेले.[१]

जीवन व कार्य[संपादन]

१८८८ मध्ये त्यांच्या एका चित्राला व्हाईसरॉयचे सुवर्णपदक प्राप्त झाले होते. तेव्हापासून जे. जे. मध्ये सुवर्णपदक देण्याची पद्धत सुरू झाली. रावबहादुर धुरंधर, माधवराव बागल हे चित्रकारदेखील त्यांना आपले गुरू मानत. आबालाल यांची ‘रावणेश्र्वर’ आणि ‘संध्यामठ’ ही दोन चित्रे खूप गाजली. या दोन चित्रांवरून त्यांचे कौशल्य दिसून येते. राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता, रसिक या जगात राहिला नाही म्हणून त्यांनी आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली. आबालाल मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशा या असामान्य व संवेदनशील चित्रकाराचे १९३१ मध्ये निधन झाले.दिल्लीतील एका कलादालनासह कोल्हापुरातील न्यू पॅलेस व टाऊन हॉल येथील कलादालनांत त्यांची चित्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत.[२]

आबालाल रहिमान १८८८ पर्यंत मुंबईत होते. १८८० ते १८८८ या काळात त्यांनी आर्ट स्कूल मध्ये केलेली कामे स्कूलच्या जुन्या रेकॉर्डमध्ये पहावयास मिळतात. १८८८ मध्ये त्यांच्या एका चित्रांच्या एका संचासाठी त्यांना व्हॉईसरॉयचे (लॉर्ड डफरीन त्यावेळचे व्हॉईसरॉय) सुवर्णपदक देण्यात आले. गुळगुळीत पावडर शेडिंगच्या काळातही आबालाल यांनी रेखाचित्रांमध्ये स्वतंत्रपणे प्रस्थापित केलेली शैली पाहून त्यांच्यातील अभिजात कलागुणाची साक्ष पटते. स्कूल ऑफ आर्टमधील त्या वेळच्या अध्यापक वर्गात आबालालांविषयी किती आदर होता, याचा रावबहादुर धुरंधरांनी आपल्या पुस्तकात आवर्जून उल्लेख केलेला आहे. कुणा इतर कलावंतांशी तुलना करून आबालाल यांच्यातील कलागुणाची महती पटवून देण्याचे कारण नाही. त्यांच्या चित्रांच्या सान्निध्यात अपरिमित आनंद प्राप्त करून देणाऱ्या ज्या दृक् संवेदना होतात. त्यांतूनच आबालाल यांच्यातील कलासामर्थ्याची प्रचिती येते.[३]

आबालाल हे एक संवेदनाक्षम व प्रयोगशील चित्रकार होते. त्यांनी पुष्कळ प्रकारच्या तंत्रपद्धती वापरून चित्रनिर्मिती केली असे त्यांचे शिष्य सांगतात. म्हणूनच त्यांची चित्रे ठरावीक ठशाची वाटत नाहीत. चित्रकला त्यांच्या बाबतीत केवळ व्यवसायाची बाब नव्हती तर ती एक प्रेरणाशक्ती होती. त्यांच्या अंतर्दृष्टीपुढे अव्याहतपणे असंख्य प्रतिमा एकामागून एक सरकू लागत. त्यांचे संबंध व्यक्तिमत्त्व त्या व्यापून टाकत. मग ते त्यातील मिळतील तेवढ्या प्रतिमा आपल्या माध्यमामधून अनुभवू पाहत. अशा अव्याहतपणे चाललेल्या मंथनातून कधी पंधरावीस हजार चित्रे घडली हे त्यांनासुद्धा समजले नाही. पहिल्या चित्रापासून ते अखेरच्या चित्रापर्यंत त्यांचा शोध चालूच होता आणि तरीसुद्धा कोल्हापूरसारख्या कलाक्षेत्रातील घडामोडींच्या दृष्टीने फारशा घटना न घडणाऱ्या अशा एकांतस्थळी सन १९२०-२१ च्या सुमारास आबालालना ज्या कलामूल्यांचा शोध लागला होता, तो मुंबईतल्या कलाकारांत पूर्णपणे रुजायला १९३५ साल उजाडावे लागले. यावरून त्यांच्या प्रतिभेची झेप केवढी होती हे ध्यानी येते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ बहुळकर, साधना. "आबालाल रहिमान (Abalal Rahiman)". https://marathivishwakosh.org. १ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ^ बागल, माधवराव (१९६३). कोल्हापूरचे कलावंत. कोल्हापूर.
  3. ^ मोटे, ह. वि. (१९६३). विश्रब्ध शारदा : भारतातील चित्रकला व शिल्पकला (खंड तिसरा). मुंबई.