ग्रामगीता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रकाशन[संपादन]

१९५५ साली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकाला एकदोन नाही, तब्बल नऊ प्रस्तावना आहेत. शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणाऱ्या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दिलेली ओळख आहे. आचार्य विनोबा भावे, गाडगे महाराज, मामासाहेब सोनोपंत दांडेकर, दादा धर्माधिकारी, श्रीपाद सातवळेकर, वि.स. खांडेकर, वि.भि. कोलते आणि ग.त्र्यं. माडखोलकर यांची प्रस्तावना आहे. शिवाय तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांनीही लिहिले आहे.

ओळख[संपादन]

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची "ग्रामगीता' म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप होय. तुकडोजी महाराज गावागावाच्या सेवेसाठी आयुष्यभर भटकत राहिले. त्यांनी खेड्यापाड्याच्या रूपात उभ्या असलेल्या गाव-संस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले आणि ते ग्रामगीतेतून समर्थपणे व्यक्त झाले.

ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्‌गार म्हणजे ग्रामगीता होय. तुकडोजी महाराज म्हणायचे, "माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला, अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे, हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे.

वैशिष्ट्य[संपादन]

तुकडोजी महाराजांनी ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामरक्षण, ग्रामआरोग्य, ग्रामशिक्षण, ग्रामकुटुंब, ग्रामप्रार्थना, ग्राममंदिरे, ग्रामसेवा, ग्रामसंस्कार, ग्रामउद्योग, ग्रामसंघटन, ग्रामआचार या साऱ्यांचा सूक्ष्म विचार "ग्रामगीता' या ग्रंथात केला आहे.या पुस्तकाचे भाषांतर संस्कृत भाषेतून केले गेले आहे डॉ श्री भा वर्णेकर यांनी हे भाषांतर केले जे श्लोक रूपात आहे ,

अर्पण[संपादन]

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा. ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, मानवतेचे तेज झळाळावे, या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे.

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत आहेत. त्यांच्या अंतरंगात वास करीत असलेली तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन बाहेर पडली आहे. भारतीय नवरचनेच्या संधिकाळात महाराजांनी ही ग्रामगीता जनतेच्या हाती देऊन ग्रामसुधारणेच्या कामाला सैद्धांतिक दिशा दिली आहे.

अंतरंग[संपादन]

या ग्रामगीतेमध्ये एकेचाळीस अध्यायात आठ पंचके आहेत. सद्‌धर्ममंथन, लोकवशीकरण, ग्रामनिर्माण, दृष्टिपरिवर्तन, संस्कारशोधन, प्रेमधर्मस्थापन, देवत्वसाधन, आणि आदर्श जीवन अशी ती आठ पंचके म्हणजे ग्रामजीवनाच्या विकास संकल्पनेतील अष्टमहासिद्धीच होत.

थोडक्‍यात सांगायचे, तर तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हीच ग्रामविकासाची संहिता होय.

अ. 1 -  वं. राष्ट्रसंत  श्री तुकडाेजी महाराज

राष्ट्रसंत श्री तुकडाेजी महाराज हे पंढरपूर क्षेत्री आषाढी एकादशीस जगाची  चिंता करीत चंद्रभागे तटी  बसले असता, याच अध्यायातील ओवी क्रमांक  43 व 44 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे , विश्वाचा विचार करण्याऐवजी खेडयांची उन्नती  करण्यासाठी ‘ग्रामगीता’ लिहण्याची प्रेरणा ईश्वराने त्यांना दिली. ‘देव भक्तासवे जाताे. ध्यानरुपे’ ही समर्थ उक्ती व कर्तृत्वाभिमान न घेण्याची भक्त-मनाेवृत्ती लक्षात घेता यात चमत्कारिक वाटण्याचे कारण नाही.

ग्रामगीतेवर पुष्पवृष्टी

''तुकडाेजीबाबांची ‘ग्रामगीता’ ही आज गीता - ज्ञानेश्वरी प्रमाणं जनतेला खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यात - झाेपडीझाेपडीत सुख सामाधान पैदा करील, असा भरवसा वाटताे. आज अशा ग्रंथाची गावाेगावी गरज आहे. या ग्रंथापासून साध्याभाेळया समाजाला ज्ञान मिळून , त्यांच्या हातूनच त्यांचं दुःख दैन्य दूर हाेण्याच भाग्य त्यांना मिळू शकेल, इतकं याचं महत्त्व आहे. भगवंताच्या गीतेचं खरं मर्म - ‘सर्व जीव देवासमान समजून सेवा करा’ - हे या ग्रंथाच्या रूपात आज पाहिजे, तशा तऱ्हेने  प्रगट झालं आहे अन् यातूनच प्रपंच - परमार्थ साधला जाईल. तुकडाेजीबाबांचा हा बहुमाेल प्रसाद सर्वांना सुखशांती देवाे हीच  सदिच्छा ! ’’

- वैराग्यमूर्ती श्रीसंत गाडगेबाबा

‘‘श्रीसंत तुकडाेजी महाराज आज कित्येक वर्षे अखंड जनसेवेत राबत आहेत. ग्रामीण जनतेची सेवा हा एकच ध्यास त्यांनी धरला आहे. ग्रामरचनेच्या काेणत्याही अंगाकडे त्याचे सहसा दुर्लक्ष झालेले नाही. त्यांच्या अंगातील  तळमळ त्यांच्या एकेक उद्गारात आणि हालचालित दिसून पडल्याशिवाय राहत नाही. मला भू-दानाच्या चक्रव्युहात अडकलेला पाहून त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांचे ग्रामकार्य इतके स्वयंभू आहे की, त्याला अशा प्रस्तावनेची काही गरज नव्हती. त्यांची ही ‘ग्रामगीता’ त्यांनीच म्हटल्या प्रमाणे ‘स्वानुभव संमत’ आहे. त्यामुळे आपाेआपच ती शास्त्रसंमतही झाली आहे. त्यांच्या विवेचनात वाचकांना संकुचीतपणा आढळणार नाही. भोळ्या कल्पनांना कोठेच वाव नाही. अगदी आधुनिक मन त्यात पहावयास सापडते. बाळगाेपाळांना यातून चांगली प्रेरणा मिळेल यात शंका नाही.’’

- आचार्य विनाेबा भावे