ऑक्टोबर क्रांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२५ ऑक्टोबर १९१७ (ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ७ नोव्हेंबर १९१७) या दिवशी रशियात घडलेल्या राज्यक्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते. या क्रांतीनंतर रशियातील समाजवादी पक्षाने देशाची सत्ता आपल्या हाती घेऊन समविचारी राष्ट्रीय गट एकत्र करून सोवियेत संघाची स्थापना केली.

रशियात राज्यक्रांती घडून येण्याला कित्येक शतकांचा सामाजिक व आर्थिक इतिहास कारणीभूत आहे. १९ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत रशिया दोन सामाजिक गटात विभागला गेला होता. एकीकडे राजा (त्सार), राणी (त्सारिना), जमीनदार, अमीर-उमराव यांचे ऐश्वर्यसंपन्न जग तर दुसरीकडे अज्ञानी, उपाशी, दारिद्र्यात जखडलेली जनता.

१८६१ साली भूदासमुक्तीचा कायदा संमत झाला. त्या आधी भूदास म्हणजे गुलामांना जमीनदारांची मरेपर्यंत गुलामी करावी लागे, त्यांना कोणत्याही सोयी-सवलती नव्हत्या. शिक्षण, घर, मानाचे जीवन यापैकी काहीही भूदासांकडे नव्हते. १८६१ च्या कायद्याने त्यांना सामाजिक समानतेचे अधिकार मिळाले, कित्येक शतकांची गुलामगिरीची चाल संपुष्टात आली. पण केवळ कायद्याने सुधारणा होणे अशक्य होते. कायद्यानुसार कोणी कोणास गुलाम म्हणून ठेऊ शकत नसल्याने भूदासांना काम मिळे ना. तर त्यांच्याकडे शिक्षण नसल्याने नोकरी किंवा इतर कामे करणे त्यांना अशक्य होऊन बसले. त्यांच्यासमोर बिकट परिस्थिती उभी होती. सामाजिक विषमता, मानहानी, आर्थिक संकट यामुळे कोट्यावधी सामान्य लोकांच्या मनात तत्कालीन सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थितीबद्दलचा असंतोष वाढतच गेला. ती परिस्थिती बदलून टाकल्याशिवाय काही गत्यंतर नाही असे मत सर्वसामान्य जनतेचे झाले होते.

रशिया अतिशय खडतर परिस्थितीतून जात असतांनाच १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यात रशियाही ओढले गेले. त्या युद्धात सहभागी होण्यासाठी रशियाजवळ लष्करी किंवा आर्थिक सामर्थ्य नव्हते. सुमारे १५ लाख सैनिकांपैकी ५ लाख सैनिकांजवळ साधी बंदुकही नव्ह्ती. शस्त्रास्त्र, अन्नधान्य यांचा प्रचंड तुटवडा होता, दळणवळणाची साधने विकसीत झालेली नव्ह्ती. त्यातच जर्मनी विरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने पहिले महायुद्ध संपण्याच्या सुमारास रशियात बेसुमार महागाई, आवश्यक वस्तुंचा प्रचंड तुटवडा, मोठ्या प्रमाणात झालेली प्राणहानी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीस जबाबदार असलेल्या अकार्यक्षम झारशाही विरुद्ध जनप्रक्षोभ वाढत गेला.

१९१७ च्या प्रारंभी लाखो सैनिक कोण्त्याही परवानगीची वाट न पाहता, कोण्ताही नेता, अधिकारी नसतांना स्वतःच्या शस्त्रांसह युद्धभूमीतून मागे हटले. सैनिक, कामगार, शेतकरी - सर्वसामान्य जनता रस्त्यावर जमली. फार मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती तयार झाली. या गडबडीतच त्सार निकोलसने मंत्रीपरिषदेचे (ड्यूमा) विसर्जन केले, सर्व सत्ता स्वतःकडे एकवटली. समाजवादी पक्षासह ड्यूमाचे सदस्य एकत्र आले आणि १४ मार्च रोजी प्रिन्स जॉर्जी लवोव यांच्या नेतृत्वाखाली उदारमतवादी आणि मवाळ समाजवादी यांचा समन्वय साधला गेल्याने एक मोठी शक्ती एकत्र झाली. लवोव यांच्या पुढाकाराने हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. कोणताही पर्याय समोर न राहिल्याने १५ मार्च १९१७ला त्सार निकोलसने राज्यत्याग केला व सुमारे तीन शतके रशियावर राज्य करणाऱ्या रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली.

हंगामी सरकार आणि समाजवादी विचारांच्या लोकांमध्ये लवकरच मतभेद सुरू झाले. लोकांच्या परिस्थितीबद्दल हंगामी सरकारने हालचाली सुरू केल्या नसल्याने पुन्हा क्रांती होऊन रशियाचे नेतृत्व नव्या लोकांकडे देण्याची चिन्हे दिसु लागली. समाजवाद्यांच्या दबावामुळे सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगणाऱ्या जोसेफ स्टालिन आणि रशियाबाहेर राहणाऱ्या लेनिन, ट्रॉट्स्की, कामनेव्ह, रादेक या नेत्यांना रशियात परत येता आले. हंगामी सरकार विरुद्ध लेनिनच्या नेतृत्वाने क्रांतीला जहाल वळण लागले. ताबडतोब आंतरिक युद्धबंदीची मागणी जोर धरू लागली. तसेच जमीनदार, उमराव यांच्याकडून जमिनी काढून त्या शेतकऱ्यांना वाटून देण्याच्या मागणीला समर्थन मिळू लागले.

जुलै १९१७ मध्ये हंगामी सरकारने आपली लोकप्रियता टिकविण्यासाठी जर्मनीवर आक्रमण केले पण त्यात सपशेल अपयश आले. मोठ्या प्रमाणात प्राणहानी, वित्त हानी मात्र ओढवून घेण्यात आली. हंगामी सरकारवरची नाराजी आणखी वाढली, बोल्शेविकांना समर्थन वाढले. २४ ऑक्टोबर १९१७ रोजी हंगामी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव झाला. सरकारच्या सहय्यासाठी सैन्य राजधानीत नव्हतेच त्यामुळे फारसा प्रतिकार झालाच नाही. २४-२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री विंटर पॅलेसवर बोल्शेविक चालून गेले. २५ ऑक्टोबरच्या सकाळापासून समाजवाद्यांनी एक एक करत राजवाडा, लष्कर, पोस्ट व तार घर, रेल्वे, बँक, शासकीय कार्यालये आपल्या ताब्यात घेतले.

२६ ऑक्टोबरला समाजवादी पक्षाचे सरकार अधिकृतपणे स्थापन झाले. लेनिन अध्यक्ष पदावर विराजमान झाले, परराष्ट्रमंत्री म्हणून ट्रॉट्स्की, शिक्षणमंत्री म्हणून लुनाचरस्की, गृहमंत्री म्हणून रिकोव्ह तर अल्पसंख्या गटांचे / देशांचे मंत्री म्हणून स्टालिन यांना कार्यभार सांभाळला. सोव्हिएत राजवटीला सुरुवात झाली.