अपस्मार (असुर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अपस्मार, नटराजांच्या पायाशी दडपलेला आहे (नटराज = शिवाचा एक अवतार ).

वर्णन[संपादन]

हिंदू पौराणिक कथांनुसार, अपस्मार हा एक खुजा- बुटका असुर आहे. तो आध्यात्मिक अज्ञान आणि निरर्थक वाक्प्रयोग (बडबड) ह्या वैशिष्ट्यांकरता ओळखला जातो. त्याला दक्षिण भारतात 'मुयालका' किंवा 'मुयलकान' म्हणूनही ओळखले जाते. पुराणांनुसार जगात ज्ञान टिकवण्यासाठी अपस्माराला पराभूत केले पाहिजे; मारले जाऊ नये कारण असे केल्याने आध्यात्मिक ज्ञान आणि अज्ञान यांच्यात आवश्यक संतुलन बिघडू शकते. अपस्माराचे जर समूळ निर्मूलन केले तर ज्ञानार्जनासाठी आवश्यक प्रयत्न, समर्पण आणि परिश्रम न करता साधकाला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि यामुळे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे अवमूल्यन होईल.

नटराजांचा अवतार[संपादन]

अपस्माराला दडपण्यासाठी, भगवान शंकराने नटराज हा अवतार धारण केला. अपस्माराला रूप बदलण्याच्या शक्ती प्राप्त होत्या, त्यांचा वापर करून तो एखाद्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा स्मृतिभ्रंश घडवून आणत असे, जणू एक प्रकारे स्वतःचे रूप बदलण्यात तो उत्तम नट बनला होता. त्याने आदिशक्ती पार्वती मातेचा स्मृतिभ्रंश घडवून आणला. परिणामतः त्यांच्या मूळ स्वरूपाच्या अनुपस्थितीत जगाचा समतोल बिघडू लागला. अशा संकटकाळी श्रीनटराजांनी वैश्विक तांडव नृत्य केले. या नृत्यादरम्यान, श्रीनटराजांनी आपल्या उजव्या पायाने अपस्माराला चिरडून दडपले. अमरत्व मिळालेल्या काही राक्षसांपैकी एक म्हणून, अपस्माराला मानले जाते. म्हणूनच श्री शिव हे अपस्माराला दडपण्यासाठी अनंतकाळापर्यंत नटराज रूपात राहतात. नटराजांचा उजवा पाय अपस्माराच्या पाठीवर आहे हा अपस्मार लोभीपणाचे आणि स्वार्थाचे जिवंत उदाहरण आहे. त्याला पराभूत करण्यासाठी त्याच्या पाठीवर उभे राहून, त्याला निष्क्रिय करणे हाच उपाय आहे. श्री नटराज हेच करत आहेत. त्यांनी त्यांच्या उजव्या पायाखाली हा धूर्त असुर चिरडून ठेवला आहे. परंतु श्री नटराज हे ज्या पायाने अपस्मार चिरडला त्या पायाकडे, माणसाचे लक्ष वेधत नाहीत, तर जो डावा पाय त्यांनी आता भूमीपासून वर उचललेला आहे त्याकडे आपला हात दाखवून लक्ष वेधतात. कारण उचललेला पाय, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या विरोधी दिशेत आहे. ऐहिक बंधनापासून मोक्ष, मुक्तीचे हे प्रतीक आहे.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नटराज के पैरों के नीचे कौन दबा रहता है?" (हिंदी भाषेत). १० मार्च २०२१ रोजी पाहिले.