सदस्य:Rajesh salvi

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साळवी

लखं लखं चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...

झळाळती कोटी ज्योती या...

Full Lights...

Role Sound...

Role Camera...

& Action...

या आवाजानंतर उलगडते ती लख्ख तेजाची एक वेगळीच दुनिया. या तेजाला पाहून अनेक जण हुरळून जातात. त्याच्या प्रेमात पडतात. पण खरं तर हे लख्ख तेज तयार होण्यामागे अनेक ज्योती आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. अशाच या चंदेरी झगमगाटात १९५० ते १९८५च्या कालखंडात एक प्रखर ज्योत आपल्या अदाकारीने सर्व मोठमोठ्या कलाकारांना आपल्या तालावर शब्दशः नाचवीत होती. ती म्हणजे नृत्य दिग्दर्शक मास्टर रंजन साळवी.

मास्टर रंजन साळवी हे त्या काळातलं चित्रपट सृष्टीतील एक मानाचं नाव.

खरं तर मास्टरजींच मूळ नाव रंगराव साळवी असं  होतं. त्यांचा जन्म 7 डिसेंबर 1929 साली अहमदनगर येथे झाला. घरातली परिस्थिती सर्वसामान्य अशीच होती, तरीही त्यांनी त्यावेळेस दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं होतं. नृत्याचे कोणतेही तांत्रिक शिक्षण नाही, कोणीही गुरू नाही अशा परिस्थितीतही रंगराव आपल्या आवडीच्या, आपल्या कष्टाच्या जोरावर मेळ्यांमध्ये, जत्रांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी नृत्य दिग्दर्शन करायचे. वेळप्रसंगी गायकाला ढोलकीवर किंवा टाळ झांजा वाजवून साथ ही द्यायचे.

रंगारावांचा राम यादव नावाचा मित्र त्यांना एकदा एका चित्रपटाची तयारी करत असलेल्या दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे घेऊन गेला. दिग्दर्शकाने क्षणभर या वीस बावीस वर्षांच्या सावळ्या हडकुळ्या तरुणाकडे पाहिलं आणि "मास्टरजी हे गाणं ऐका आणि स्टेप्स बसवा" म्हणून सांगितलं. रंगरावांनीही लगेचच गाणं ऐकून स्टेप्स बसवायला सुरुवात केली आणि इथूनच रंगरावांच्या म्हणजेच मास्टरजींच्या चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनाला सुरुवात झाली. मास्टरजींच हे पहिलंच गाणं अजरामर झालं. ते गाणं होतं 'सवाल माझा ऐका' चित्रपटातलं "कसं काय पाटील बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?"  मास्टरजी नृत्य दिग्दर्शनाबरोबरच गायनाच्या कार्यक्रमांमध्ये गायकाला तबला ढोलकीवर साथ देत असतं. अशाच एका कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गायक दत्ता वाळवेकर मास्टरजींना म्हणाले "तू आता डान्समास्तर झालाआहेस आणि रंगराव हे कसले नाव लावतो? तुझ्या नृत्यानं हजारो लोकांचं रंजन होतंय तर तू रंजन हेच नाव का नाही लावत?". दत्ता वाळवेकरांच्या सांगण्यावरून मास्टरजींनी रंगराव हे नाव बदलून रंजन साळवी हे नाव लावायला सुरुवात केली आणि त्यांचा चित्रपटसृष्टीतला रंजक असा प्रवास घडत गेला.

मास्टरजींच्या काळात मराठी चित्रपट साधारणपणे दोन प्रकारात विभागले गेले होते. एक म्हणजे तमाशापट किंवा लावणी पट आणि दुसरे म्हणजे आशयघन चित्रपट. तमाशापटांमध्ये साधारणपणे लावण्या, सवाल- जवाब अशा प्रकारची गाणी असायची ज्यावर संपूर्ण नृत्यप्रकार असायचे तर आशयघन चित्रपटांमध्ये प्रेमगीते, युगुलगीत किंवा कथेला पूरक अशी गाणी असायची, त्यावर कदाचित नृत्य बसवता येत नसे परंतु गाण्याचा ताल आणि लयीनुसार कलाकारांचे हावभाव, त्यांच्या हालचाली बसवाव्या लागतं .या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये मास्टरजींनी आपल्या नृत्य दिग्दर्शनाच्या कौशल्याचा ठसा उमटवला होता.

गाणं कोणत्याही प्रकारचा असो त्यामध्ये संपूर्णपणे झोकून द्यायचं असा मास्टरजींचा स्वभाव होता. उदाहरण द्यायचं झालं तर "पिंजरा" या व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटाचं देता येईल. पिंजरा या चित्रपटांमधली प्रत्येक गाणी ही वेगवेगळ्या धाटणीची, वेगवेगळ्या भावनांवर आधारित अशी होती. या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण असलेलं  "दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला" हे गाणं असो किंवा "दे रे कान्हा चोळी अन् लुगडी" हे गाणं असो. यामागे मास्टरजींचे कष्ट, त्यांचं कौशल्य दिसून येतं . "दे रे कान्हा चोळी अन लुगडी" या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मास्टरजींनी स्वतः गळ्यापर्यंत पाण्यात उभं  राहून संध्याजींना दिग्दर्शन केलं होतं. आपल्या कलेपुढे आपल्या शरीराची, तब्येतीचीही तमा न बाळगणारे मास्टरजी व्ही. शांताराम,राजदत्त, अनंत माने, राजा परांजपे यांसारख्या चित्रपट दिग्दर्शकांच्या मर्जीतले बनून गेले होते.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मास्टरजींनी साधारण १७५हून अधिक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. जयश्री गडकर, उषा चव्हाण, सुषमा, उषा नाईक, जयश्री टी, लीला गांधी, माया जाधव, रंजना, संध्या, बेबी जीवनकला यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायिकांना मास्टरजींनी नृत्याचे धडे दिले. तर मराठी चित्रपटांमध्ये चित्रपटांचा नायक आणि नृत्य यांचं फार काही सख्य नसलं तरीही मास्टरजींनी अरुण सरनाईक, श्रीराम लागू, नाना पाटेकर, अशोक सराफ यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांना ताल धरायला भाग पाडलं होतं.

त्या काळात तयार केल्या जाणाऱ्या दर दोन तीन चित्रपटांनंतर एका चित्रपटाच्या श्रेयनामावलीत मास्टर रंजन साळवी नृत्य दिग्दर्शक हे नाव झळकायचं.  एक गाव बारा भानगडी, सवाल माझा ऐका, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, सुगंधी कट्टा, लक्ष्मीची पाऊले, असला नवरा नको ग बाई, केला इशारा जाता जाता, सांगू कशी मी, सुशीला, चानी, पिंजरा, एक डाव भूताचा असे काही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मास्टरजींच्या नावाला चित्रपटसृष्टीमध्ये मान मिळू लागला. मास्टरजींनी मराठी चित्रपटांबरोबरच राजकुमार या अभिनेत्याच्या "दुराद्दो बेट्टा"(Doorada Betta) या दाक्षिणात्य चित्रपटासाठीही नृत्य दिग्दर्शन केलं होतं.

आपलं सर्वस्व कलेला वाहिलेल्या मास्टरजींनी कधीच प्रसिद्धीला किंवा पैशाला महत्त्व दिले नाही. त्यामुळे कधीच ते प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत किंवा चंदेरी दुनियेत इतर कलाकारांच्या इतके चमकूनही दिसले नाहीत. मास्टरजींनी 16 फेब्रुवारी 2001 साली जगाच्या या रंगमंचाचा निरोप घेतला. खरोखरच प्रेक्षकांचं रंजन करण्यात आपलं उभ आयुष्य व्यतीत केलेल्या मास्टरजींनी आपलं "रंजन साळवी" हे नाव सार्थकी लावलं असचं म्हणावं लागेल.