फॅशन-प्रदर्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


 स्त्रीपुरुषांच्या पोशाखाचे किंवा वेशभूषेचे नावीन्यपूर्ण प्रकार जाहीरपणे सादर करण्याचा सुविहित कार्यक्रम.कापड आणि कपडे यांच्या निर्मितीत नित्य नवे प्रकार व प्रयोग केले जातात,तसेच स्त्रीपुरुषांच्या वस्त्रप्रसाधनात नव्या टूम किंवा फॅशन अखंडपणे निर्माण होत असतात. वेशभूषेतील नावीन्याविषयी एकाप्रकारचे नैसर्गिक आकर्षण सामान्यपणे सर्व स्त्रीपुरुषांना असते. म्हणूनच वस्त्रनिर्माते, पोशाखनिर्माते, कल्पक शिंपी आणि शिवण संस्था, कपड्यांचे व्यापारी, वितरक आणि दुकानदार, फॅशन संस्था किंवा फॅशनविषयक प्रकाशन संस्था इ. फॅशन-प्रदर्शनांची योजना करतात. 
                                 नव्या प्रकारचे कापड व कपडे घातलेल्या देखण्या स्त्रीपुरुषांना आकर्षक रीतीने रंगमंचावर मिरवून आपल्या मालाची लोकप्रियता व खप वाढविणे, हा फॅशन-प्रदर्शकांचा मुख्य हेतू असतो, तथापि कापड व कपडे यांविषयी समाजाची कलात्मक अभिरुची किंवा सौंदर्यदृष्टी वाढावी,अशा व्यवहारनिरपेक्ष उद्दिष्टानेही फॅशन-प्रदर्शने आयोजित केली जातात.पूर्वी राजघराण्यातील स्त्रीपुरुष,धनाढ्य व्यापारी,सरदारदरकदार इ.अशा प्रदर्शनांकडे आकृष्ट होत.आधुनिक काळात छोटेमोठे व्यापारी,वितरक, दुकानदार तसेच सर्वसामान्य हौशी व्यक्ती हे या प्रदर्शनाचे प्रेक्षक होत.ते आपापल्या गरजांनुसार नव्या वस्त्रप्रकारांची मागणी पोशाख वा वस्त्रनिर्मात्यांकडे नोंदवितात.

अत्याधुनिक स्त्री-पेहेराव : मुंबईच्या फॅशन-प्रदर्शनातील एक दृश्य.अत्याधुनिक स्त्री-पेहेराव : मुंबईच्या फॅशन-प्रदर्शनातील एक दृश्य.फॅशन-प्रदर्शनांचा उगम गेल्या शतकात यूरोपमध्ये विशेषतः यूरोपीय फॅशनप्रकारांचे केंद्र असलेल्या पॅरिसमध्ये झाला. तेथील कल्पक शिंपी आपापल्या दुकानातूनच नवे व विशेषतः ऋतुमानानुसार असे पोशाखप्रकार देखण्या स्त्रीपुरुषांद्वारा ग्राहकांना दाखवीत. या खाजगी स्वरूपाच्या प्रदर्शनाचेच पुढे अधिक मोठ्या व सार्वजनिक स्वरूपाच्या प्रदर्शनात रूपांतर झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर त्यास नवे परिणाम प्राप्त होऊन फॅशन-समारंभाचे (फॅशन-शोचे) स्वरूपच प्राप्त झाले.

फॅशन-समारंभ हा एखाद्या छोट्या नाट्यप्रयोगाप्रमाणे मनोरंजक असा रंगमंचावरील प्रयोग असतो. केवळ देखण्या स्त्रीपुरुषांनी अभिनव वेशभूषा करून रंगमंचावर मिरवण्यापुरताच तो मर्यादित नसतो. त्यात एखाद्या नाट्यप्रयोगाप्रमाणे संगीत, नृत्य, रंगमंचावरील प्रकाशयोजना व देखावे आणि पुष्कळदा तर स्वतंत्र नृत्यप्रयोगही अंतर्भूत असतात. पोशाखप्रदर्शकांचे रंगमंचावरील पदन्यास सुविहित असतात. हा कलात्मक प्रयोग निश्चित करताना प्रदर्शनीय पोशाख प्रकारांची संख्याही विचारात घेतली जाते. प्रत्येक वेशभूषा ही रंगमंचावर साधारणपणे ३० ते ४० सेकंद सादर करण्यात येते. अनुरूप अशा संगीताची व प्रदर्शकांच्या पदन्यासाची तिला जोड दिली जाते.



प्रदर्शक स्त्रीपुरुषांना यासाठी योग्य ते प्रशिक्षणही देण्यात येते. ज्यावेळी प्रदर्शन करणाऱ्या देखण्या मुली (मॅनेक्विन्स) प्रेक्षकांसमोरून जाऊ लागतात, त्यावेळी त्यांच्या अंगावरील विशिष्ट फॅशनचे दर्शन, पोशाखाचे मूल्य, कापडउत्पादकाचे उल्लेख व कापड वैशिष्ट्य यांसंबंधीची निवेदकाकडून माहिती दिली जाते. थोडक्यात फॅशन- प्रदर्शन हा केवळ एक व्यापारी स्वरूपाचा कार्यक्रम व म्हणून तो कंटाळवाणा होऊ नये, यासाठी त्यास विविध प्रकारे मनोरंजक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातो.


फ्रान्समधील खिश्चन डायोर, पायरे कार्डिन, सेंट लॉरेंट आणि इटलीतील निना रिच्ची इ. यूरोपीय फॅशन संस्था अग्रेसर आहेत. भारतात स्वातंत्र्योत्तर काळातच फॅशनप्रदर्शनांची सुरुवात झाली. मुबंईच्या फेमिना ह्या इंग्लिश पाक्षिकाच्या साह्याने हेलेन कर्टिस या सुगंधी द्रव्य उत्पादक उद्योग समूहातर्फे येथे प्रथमच १९६५ साली फॅशन-समारंभ आयोजित करण्यात आला होता. फेमिनाखेरीज ‘स्वॅंक इंडिया’ ही दिल्लीतील आणि ‘इंडिया ऑन शो’ व ‘फॅशन इंडिया’ या मुंबईतील व्यावसायिक संस्था भारतातील मोठमोठ्या शहरी नियमितपणे फॅशन- समारंभ आयोजित करीत असतात.


पहा : तयार कपडे; पोशाखवेशभूषा; फॅशन.