सदस्य:माधवी वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार !!

विकिपीडियाचा आजवर पुष्कळ वापर करून झाल्यावर आता मी स्वतःसुद्धा काही हातभार लावू शकतेय, हे लक्षात आल्यावर छान वाटतंय ! विकिपीडियाने अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथम विकिपीडियाचे आभार ! ह्यानिमित्ताने बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.

मी मराठी पुस्तकांच्या प्रूफ-रिडिंगचं तसंच पुस्तकांचा हिंदीतून (आणि कधीकधी गुजराथीमधून) मराठीत अनुवाद करण्याचं काम करते.

लहानपणापासून पुस्तक-वाचनाची बरीच आवड आहे. त्यामुळे पुस्तकांसोबतच राहण्याची आणि पुस्तकांच्याच विश्वात काम करण्याची इच्छा होती. आणि आता ती पूर्ण होत असल्याने खूप खुश आहे. सध्या वैयक्तिक लेखनाचं कामही सुरु केलं आहे. विकिपीडियाच्या निमित्ताने हाही अनुभव घेतला.

येथे मला शुद्धलेखन तपासणी अर्थात प्रुफ-रिडिंगचं काम करायला तसेच ज्या विषयांची मला जाण आहे, त्या माहितीचं वाटप करायला आवडेल.

मी वनस्पतीशास्त्र ह्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. विज्ञानाची जाण आणि आवड दोन्ही असल्याने त्या विभागातदेखील मला काम करता येईल.

अजून नवीन असल्याने चुका घडत आहेत, अजूनही घडतील, पण काम करता करता बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. सर्व अनुभवी सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी कृपया मला आणि माझ्या चुकांना सांभाळून घ्यावे आणि न कंटाळता मार्गदर्शन करावे.

नवनवीन गोष्टी शिकायला आणि त्याद्वारे स्वतःची नवीन आवृत्ती बनवायला मला आवडतं. आयुष्यात आणि कामात सतत बदल घडत असतात. त्या प्रत्येक बदलाच्या वेळी कितीही त्रास झाला, तरी त्यातून खूप काही शिकायला मिळतं. आपण एकप्रकारे घडत जातो, त्यामुळे 'टीका आणि निंदा' ही आवडतात. काहीसा तत्त्वज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दिशेने माझा कल असल्याने, अशा लेखांचं वाचन करतानाही काही काम करता आलं तर निश्चित करीन.

मला गाण्याचीही आवड आहे. जुनी-नवी दर्जेदार गाणी मला ऐकायला आणि गायला आवडतात. वेगवेगळी स्तोत्रे म्हणायला आवडतात. संस्कृत उच्चार आणि काहीसे भाषा विषयक ज्ञान आहे. सध्या मी व्यक्तिमत्त्व-विकास ह्यासंबंधी कार्यशाळेत जात आहे आणि तत्संबंधाने नवनवीन गोष्टी शिकत आहे. मला आवडणाऱ्या आणि कळलेल्या गोष्टी इतरांना विविध माध्यमांतून सांगण्याची, शिकवण्याची आणि त्यात सहभागी करून घेण्याचीही मला आवड आहे.

हो, अजून एक -- मी कविताही करते.. पण तो भाग इथे कामाचा नाही ! इतरांच्या कविता, कथा वगैरे वाचायला ही खूप आवडतं. तेव्हा विकिस्रोतवरती स्तोत्रे, कथा, कविता वगैरे विभागांतर्गत जुन्या प्रताधिकार मुक्त साहित्यिकांचे साहित्य घालायला आवडेल.

सध्या एवढं स्व-पुराण पुरे असं वाटतं.

माझ्या आवडत्या कवितेच्या ओळी लिहून लिखाण पूर्ण करते ..

जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल..!

इतकं सगळं वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद....!

माधवी वाघ.

ता.क. काही ठिकाणी मी शुद्धलेखनाचा नियम डावलून 'मिळते' ऐवजी 'मिळतं' असं लिहिलं आहे, कारण ही वैयक्तिक माहिती असल्याने लिखित भाषेपेक्षा बोलीभाषा वापरल्यास मनोगत जास्त छान वाटतं ! असं मला वाटतं. मनोगत मांडताना लिखित भाषा थोडीशी रुक्ष तर बोलीभाषा मनमोकळी आणि स्नेहाळ वाटते. तरीही आपला आक्षेप असल्यास मनोगत पूर्णपणे लिखित भाषेत रुपांतरित करीन बापडी... !