सदस्य:गुळाचा गणपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाच्या कथेची हस्तलिखित प्रत उजेडात आली असून, एका कलाप्रेमीने ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संवाद, संगीत व अभिनय असे सारे काही ‘सबकुछ पु. ल.’ आहेत. या चित्रपटाची हस्तलिखित प्रतही खुद्द महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आनंदयात्री पु. ल. देशपांडे यांच्या हस्ताक्षरातील असल्याने त्यामुळे एक मोठा ठेवा आता जतन होणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे सध्या चित्रपट वारसा अभियान सुरू असून त्यामाध्यमातूनच हे दुर्मिळ हस्तलिखित संग्रहालयाला मिळाले आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली. गुळाचा गणपती हा चित्रपट १९५३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे हे हस्तलिखित साहजिकच त्या आधीचे आहे.

या चित्रपटाची निर्मिती विनायक राजगुरू यांनी केली होती. त्यांच्याच कुटुंबातील डॉ. सरोजिनी राजगुरू यांच्याकडे या चित्रपटाच्या हस्तलिखिताची प्रत होती. चित्रपटप्रेमी व आशय फिल्म क्लबचे सचिव सतीश जकातदार यांच्या माध्यमातून डॉ. राजगुरू यांनी ही दुर्मिळ प्रत संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे नुकतीच सुपूर्द केली. याविषयी मगदूम यांनी सांगितले, की चित्रपटविषयक जुन्या गोष्टी मग त्यात जुणी गाणी, छायाचित्रे, फिल्म, कथा असे साहित्य असल्यास ते संग्रहालयाकडे देण्यात यावे. संग्रहालयाच्या माध्यमातून हा ठेवा जतन केला जाईल, असे आवाहन आम्ही करत आहोत. त्यामुळे चित्रपट वारसा अभियानाला यश येताना दिसत आहे. डॉ. सरोजिनी राजगुरू यांनी पु. ल. देशपांडे यांच्या हस्ताक्षरातील गुळाचा गणपती या चित्रपटाच्या कथेची प्रत संग्रहालयाकडे दिली आहे. ‘पुलं’चे हस्तलिखित मिळणे हा मोठा ठेवा आहे. हा चित्रपट १९५३ मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यामुळे ही प्रत त्याआधीची आहे. हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असून त्याचे डिजिटायजेशन करण्यात येईल. यामध्ये ‘पुलं’नी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत, त्याचाही अभ्यास करण्यात येईल.