दोदरी रावशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दोदरी रावशी हा मासा पॉलिनीमिडी या मत्स्यकुलातील असून त्याचे प्राणिविज्ञानातील नाव पॉलिनीमस पॅरॅडीसियस असे आहे. भारतीय समुद्रात विशेषेकरून बंगालच्या उपसागरात हे मासे आढळतात. पश्चिम बंगाल आणि ओरिसा यांच्या किनाऱ्यालगत आणि नदीमुखाजवळील पाण्यात ते मुबलक आहेत.

वर्णन[संपादन]

शरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असून शेपटीकडे निमुळते असते. शरीराची लांबी १५-२३ सेंमी. असून त्यावर कंकताभ शल्क (फणीसारखे खवले) असतात. सगळे अंग आणि पक्ष (पर) पिवळसर रंगाचे असतात; पण पाठीवर आणि पक्षांवर करड्या रंगाची झाक असते. अंसपक्षाच्या (छातीच्या भागावरील पराच्या) बुडाखाली सात मोकळे पक्ष-अर (पक्षांना आधार देणारे सांगाड्याचे घटक) असून त्यांपैकी वरचे तीन सगळ्यांत लांब व मजबूत असतात. त्यांची लांबी माशाच्या लांबीच्या दुप्पट असते. पुच्छपक्ष (शेपटीचे पर) द्विशाखित असून दोन पालींच्या मधली खोबण खोल असते. वरची पाली खालची पेक्षा जास्त लांब असते. डोळे बारीक असतात. नैऋत्य मॉन्सूनच्या सुरुवातील हे मासे अंडी घालण्याकरिता नदी मुखातून नदीत फार दूरवर जातात. त्यांच्या या स्थलांतराच्या काळात विशेषतः जून महिन्यात हे मासे पकडण्याच्या धंद्याला विशेष तेजी येते. सामान्यतः यांची मासेमारी एप्रिलपासून सुरू होते. हे मासे जरी लहान असले, तरी त्यांचे मांस रुचकर व स्वादिष्ट असल्यामुळे त्यांना फार मागणी असते.

संदर्भ[संपादन]

[१] [[वर्ग:मासे

  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92694b926930940-93093e935936940