विकिपीडिया:मासिक सदर/१० मार्च २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंदा कोचर (१७ नोव्हेंबर, इ.स. १९६१:जोधपूर, राजस्थान, भारत - हयात) या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.

कोचर यांचा जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट अँजेला सोफिया स्कूल, जयपूर येथे झाले. नंतर त्या मुंबईला आल्या व मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आय.सी.डब्ल्यू.ए.आय.चा कोर्स पूर्ण केला. कॉस्ट अकाउंटिंग विषयातील प्राविण्यासाठी त्यांना जे.एन. बोस सुवर्ण पदक मिळाले.

जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतून एम बी ए पूर्ण केले. व्यवस्थापन शास्त्रात त्यांना वोकहार्ड सुवर्णपदक मिळाले.

१९८४ साली व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी म्हणून भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (तेव्हाची आय सी आय सी आय आताची आयसीआयसीआय बँक) येथे रुजू झालेल्या कोचर २००१ मध्ये याच बँकेच्या संचालक म्हणून निवडल्या गेल्या. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळातील सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्या कागद, कपडा आणि सिमेंट उद्योगातील प्रकल्प मूल्यमापनाचे काम करीत.

१९९० च्या दशकात कोचर यांनी आयसीआयसीआय बँक स्थापन करण्यात मोठा भाग घेतला. १९९३ मध्ये ही बँक स्थापन करणाऱ्या अंतरक गटामध्ये कोचर यांची निवड झाली. १९९४ मध्ये सहायक महाव्यवस्थापक आणि १९९६ मध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. १९९६ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या उर्जा , दूरसंचार आणि परिवहन अशा पायाभूत उद्योगांची वाढ करणाऱ्या समूहाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. १९९८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या २०० प्रमुख ग्राहकांशी संबंध ठेवणाऱ्या मुख्य ग्राहक समूहाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. २००० साली कोचर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँकेने किरकोळ बँकिंग व्यवसायाचे वितरण आणि परिमाण वाढवण्याच्या दृष्टीने नवप्रवर्तन, तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचे पुनर्गठन सुरु केले. एप्रिल २००१ मध्ये कोचर कार्यकारी संचालक बनल्या.२००६ मध्ये त्यांची उप व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक झाली. २००६-०७ मध्ये त्यांनी बँकेचे आंतरराष्ट्रीय तसेच निगमित व्यवसाय हाताळले.

कोचर यांच्या नेतृत्वाखाली, २०१७ साली आयसीआयसीआय बँकेने सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वोत्तम किरकोळ बँक हा द एशियन बॅंकर या मासिकाचा किताब पटकावला.

२००९ मध्ये कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली.

आयसीआयसीआय समूहाबरोबरच कोचर जपान बिझनेस फोरम च्या तसेच युएस इंडिया सीईओफोरम व्यापार मंडळाच्या सदस्य आहेत. भारतीय बँक संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. आय.आय.आय.टी. वडोदरा संचालक मंडळाच्या त्या प्रमुख आहेत .इन्स्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स तसेच नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट या संस्थांच्या संचालक मंडळावर आहेत.

पुढे वाचा... चंदा कोचर