रिरायटिंग हिस्ट्री: द लाइफ अँड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द लाइफ अँड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)

रीरायटिंग हिस्ट्री : द लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई हे पुस्तक स्त्रीवादी इतिहासकार उमा चक्रवर्ती यांनी लिहिले असून काली फॉर विमेन यांनी ते प्रसिद्ध केले आहे. ही पुस्तक १८ व्या आणि १९व्या शतकातील ब्राम्हणी आचार आणि ब्राम्हण स्त्रियांचे वैधव्य यांच्या व्यवस्थांचा सखोल अभ्यास आहे.

प्रस्तावना[संपादन]

भारतातील प्रमुख ऐतिहासिक विचार धारेनेपंडिता रमाबाई यांचे जे जीवन आणि कार्य पद्धतशीररीत्या दडपून ठेवले त्याला उजेडात आणण्याचा हा प्रयत्न आहे. आधुनिक इतिहासातील ॲनी बेझंट यांच्यासारख्या इतिहासातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीच्या विरोधाभासात रमाबाईंची उपेक्षा अधिक स्पष्ट होते. या पुस्तकाची ही लेखिका पंडिता रमाबाई यांच्या काळाच्या संदर्भात त्यांचे आयुष्य समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

या पुस्तकाचे दोन प्रमुख भाग आहेत.

पहिला भाग[संपादन]

पहिल्या भागात पंडिता रमाबाई यांनी लिहिलेल्या ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ या पितृसत्तेची समीक्षा करणाऱ्या पुस्तकाचे संदर्भ विशद केले आहेत. जात, लिंगभाव आणि शासन यातील परस्पर संदर्भ पहिल्या भागात अधिक स्पष्ट होताना १८व्या शतकात लिंगभावात्म्क आचार संहिता हा सांस्कृतिक आचारविचारांचा पाया होता. पेशवाईच्या काळात ही लिंगभावात्मक आचारसंहिता कशी पद्धतीने जपली गेली, तिचे संवर्धन केले गेले आणि पुनरुत्पादन केले गेले याचे वर्णन लेखिका करते. १७१३ साली शिवाजीच्या नातवाने पेशवाईच्या दफ्तरात केलेली चित्पावन ब्राम्हणाची नेमणूक वंशपरंपरागत ठरली त्यामुळे १८ व्या शतकात पेशव्यांनी ब्राम्हणी सामाजिक व्यवस्थेची जबरदस्ती करून ब्राम्हणी हिंदू साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये इतर जातींचे दमन अंतर्भूत होते. यातूनच जात व्यवहार आणि शासन यातील जवळीक स्पष्ट होते. लेखिकेच्या मते १८ व्या शतकात या सर्वांचा प्रभाव लिंगभावात्मक नातेसंबंधांवर पडला. जातिव्यवस्थेची उतरंड अबाधित राखण्यासाठी स्त्रियांच्या लैंगिकतेचे दमन, सौभाग्याची कल्पना आणि कठोर वैधव्य या कल्पनांचा वापर करण्यात आला.

पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात वसाहतींच्या राजवटीमध्ये जात लिंगभाव आणि शासन व्यवस्था यामधील संबंध कसे बदलत गेले याविषयी लेखिकेने लिहिले आहे. राष्ट्रवादाचा उदय नवी वर्गरचना आणि जातींचे पुनर्घटन या प्रक्रियांचा लिंगभावावर काय परिणाम झाला याचे विश्लेषण लेखिका करते. ब्राम्हणांच्या हातून सत्ता निसटून गेल्यानंतर ब्राम्हणी पितृसत्तेला कितपत धक्का पोहोचला किंवा तिचे स्वरूप कसे बदलले याचा आढावा लेखिकेने दुसऱ्या प्रकरणात घेतला आहे. नव्या ब्रिटिश प्रशासनाला त्यांच्या प्रजेच्या सामाजिक आयुष्यात टोकाचे बदल करायचे नव्हते परंतु, त्यांनी असा(?) एक वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १८३० साली घडलेल्या ‘सती’ विषयक घडामोडींमध्ये शासनाचे काय दृष्टिकोन होते हे स्पष्ट करतात.

त्यांना ब्राम्हणांचा पाठिंबा गमवायचा नव्हता त्यामुळे सतीप्रथेचे निर्मूलन करण्यामध्ये त्यांनी दिरंगाई केली. या ऐवजी विधवांची काळजी घेण्यासाठी कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला.

पुस्तकाच्या पाचव्या प्रकरणात सुधारणावादी दृष्टिकोन हा सांस्कृतिक आचारविचारांकडे कसे पाहतो आणि स्त्रियांच्या लेखनात त्यांची समीक्षा कशी केली गेली आहे याबद्दल आहे. यासाठी इतर काही लेखनाबरोबर १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या ताराबाई शिंदे लिखित पुस्तकाची चर्चा लेखिका करते. या लेखनात पितृसत्तेच्या दुहेरी मापदंडाबाबत बोचरी उपहासात्मक टीका केली गेली आहे. ताराबाई शिंदे यांनी विधवांवर अत्याचार करणाऱ्या सामाजिक नीति-नियमांवर कठोर प्रहार केले आहेत. अनौरस संततीची हत्या केल्याबद्दल विधवा स्त्रीला दोषी ठरवून या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या पुरुषाला मोकळे सोडणाऱ्या सामाजिक नियमांची खिल्ली ताराबाईंनी उडवली आहे.

पुस्तकाचे शेवटचे प्रकरण ‘स्ट्रक्चर ॲन्ड एजन्सी : इ लाइफ ॲन्ड टाईम’ या प्रकरणात पंडिता रमाबाईंच्या आयुष्याबद्दल लिहिले आहे.

दुसरा भाग[संपादन]

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात वासाहतिक राजसत्तेने पितृसत्तावादी सुधारणा राबवून लिंगभावाकडे कसे पाहिले याचे विवेचन लेखिका करते. तर तिसऱ्या भागात कायदा, वासा वासाहतिक राजसत्ता आणि लिंगभाव याचे विश्लेषण आहे. नव्या वासाहतिक कायद्याचा स्त्रियांवर काय परिणाम झाला या प्रश्नाने या प्रकरणाची सुरुवात होते. स्त्रिया या जात आणि कुटुंबांच्या वर्चस्वाखाली राहिल्या का हा ही प्रश्न होता. १८५६ साली झालेल्या विधवा पुनर्विवाह कायद्यामुळे परंपरागत कायद्यामध्ये मोठा हस्तक्षेप केला गेला का या प्रश्नाने लेखिका सुरुवात करते. याच काळात सांस्कृतिक राष्ट्रवाद सर्व हिंदूना एकाच कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करीत होता हे लक्षात घेणे ही महत्त्वाचे आहे. यामुळेच दुसऱ्या विवाहानंतर पतीच्या संपत्तीतील हक्क संपृष्टात येणे अशा तरतुदी या काळात झाल्या.

चौथ्या प्रकरणात लिंगभावावर परिणाम करणाऱ्या बाह्य ताकदीकडून उच्च जातीय कुटुंबामधील अंतर्गत ताकदीच्या विश्लेषणाकडे लेखिका वळते. आनंदीबाई जोशी, काशीबाई कानिटकर, आणि रमाबाई रानडे या स्त्रियांच्या चरित्रातून लेखिका शोध घेते. या स्त्रियांना आपल्या इंग्रजी उच्चशिक्षित पतीशी बरोबरी साधण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे वाटले. परंतु त्यांना त्यांच्या कुटुंबातून प्रचंड विरोध सहन करावा लागला. रमाबाई रानडे सारख्या स्त्रीला त्यांच्या सुधारक पतीच्या अपेक्षा पूर्ण करताना कुटुंबातील इतर सदस्यांचा अवमान होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागली. यासाठी लेखिका रमाबाईंच्या आयुष्यातील अनेक प्रसंगाचे दाखले देते. आपल्या पतीची मर्जी राखण्यासाठी शालेय शिक्षण घेणे हे नव्या पितृसत्तेच्या पर्यावरणात अत्यंत कठीण होते याची नोंद लेखिका घेते. या सर्व प्रकरणांमध्ये घरगुती जग हे पुरुषा-पुरुषांमधील, स्त्रिया-स्त्रियांमधील आणि स्त्री-पुरुषांमधील संघर्षाचे कुरुक्षेत्र ठरले.

योगदान[संपादन]

'इकॉनॉमिकल ॲन्ड पॉलिटिकल विकली'मध्ये या पुस्तकाचे परीक्षण करताना गेल ऑम्वेट म्हणतात, ‘हे पुस्तक ब्राम्हणी पितृसत्तेचे सिद्धांकन करण्यासंदर्भात टाकलेले एक पाऊल आहे.’ या पुस्तकामुळे आधुनिक भारतातील स्त्रियांची चळवळ आणि दलित बहुजनांची चळवळ या दोन महत्त्वाच्या चळवळीतील आंतरसंवादाबद्दल एक नवी चर्चा सुरू होऊ शकेल असा आशावाद गेल ऑम्वेट व्यक्त करतात. [१]

वसाहतपूर्व काळात आणि वासाहतिक काळातील ब्राम्हणी पितृसत्तेची स्त्रीवादाने केलेली चिकित्सा या पुस्तकातून पुढे येते असे ‘फेमिनिस्ट स्टडीज्’ मध्ये आश्विनी तांबे यांनी म्हंटले आहे.[२]

पेशवाई आणि वासाहतिक काळात ब्राम्हणी पितृसत्ता कशी कायम राहिली याचे वर्णन हे पुस्तक करते असे इंद्राणी चॅटर्जी यांनी ‘हिस्ट्री वर्कशॉप जर्नल’ मध्ये म्हंटले आहे. [३]

संदर्भ सूची[संपादन]