विकिपीडिया:मासिक सदर/सप्टेंबर २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनेलीस मारी फ्रांक, अॅन फ्रँक तथा आने फ्रांक (१२ जून, इ.स. १९२९ - मार्च, इ.स. १९४५) ही ज्यूंच्या शिरकाणात बळी गेलेली एक ज्यूधर्मीय मुलगी होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीयांवर होत असलेल्या अत्याचारांपासून लपण्यासाठी अ‍ॅन व तिचे कुटुंब एका घरात लपून राहिले होते, त्या काळात तिने लिहिलेली दैनंदिनी द डायरी ऑफ अ यंग गर्ल या नावाने प्रसिद्ध झाली. त्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटे बनविण्यात आले आहेत.

वायमार प्रजासत्ताकामधील फ्रांकफुर्ट आम माइन या शहरात तिचा जन्म झाला. पण ती आयुष्यातील बराचसा काळ अ‍ॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स येथे राहिली. ती जन्माने जर्मन होती मात्र नाझी जर्मनीच्या काळातील ज्यूद्वेशी न्युर्नबर्ग कायद्यामुळे फ्रँक परिवाराचे जर्मन राष्ट्रीयत्व काढून टाकले गेले. मरणोत्तर तिची दैनंदिनी प्रकाशित झाल्यानंतर ती जगभरात प्रसिद्ध झाली.

इ.स. १९३३मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रँक कुटुंब जर्मनीतून अ‍ॅम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलँड्सवर सत्ता मिळवली. त्यामुळे ते अ‍ॅम्स्टरडॅममध्येच अडकले. जुलै १९४२मध्ये सर्वत्र ज्यूंची छळवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यापासून वाचण्यासाठी फ्रँक कुटुंब, अ‍ॅनचे वडील ऑटो फ्रँक यांच्या कार्यालयाच्या इमारतीतील गुप्त खोल्यांमध्ये लपले. तिथे असतांना अ‍ॅनच्या तेराव्या वाढदिवशी तिला एक कोरी वही मिळाली होती, त्यातच तिने १२ जून, इ.स. १९४२ ते १ ऑगस्ट, इ.स. १९४४पर्यंतची दैनंदिनी नोंदवली. दोन वर्षे तेथेच लपतछपत राहिल्यानंतर त्यांना विश्वासघाताने पकडण्यात आले व नाझी छळछावणीत पाठवण्यात आले. अ‍ॅन व तिची मोठी बहीण मार्गो यांना नंतर बर्गन-बेल्सन छळछावणीत पाठवले गेले व तिथे इ.स. १९४५मधील मार्चमध्ये दोघीही प्रलापक ज्वराने मरण पावल्या.

पुढे वाचा... अॅन फ्रँक