चर्चा:शेख अब्दुल्ला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र असलेला मजकूर येथे योग्य संपादने करुन समाविष्ट करावा. अभय नातू (चर्चा) २१:२०, १२ जुलै २०१७ (IST)[reply]


(५ डिसेंबर १९०५—८ सप्टेंबर १९८२). जम्मू-काश्मीरचे एक राजकीय नेते. जन्म श्रीनगरच्या सौरा या उपनगरात. सुरूवातीचे शिक्षण श्रीनगरमध्ये घेऊन त्यांनी अलीगढ मुस्लिम विदयापीठाची भौतिकी विषयातील एम्.एस्सी. पदवी मिळविली (१९३०) आणि शिक्षकी पेशा स्वीकारला. काश्मीर संस्थानात सरकारी नोकऱ्यांत मुस्लिम युवकांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांनी युवक मुस्लिम संघटनेची स्थापना केली (१९३०); पण त्यामुळे त्यांना शिक्षकाची नोकरी गमवावी लागली. अब्दुल कादर वरील खटल्याच्या वेळी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराच्या (१९३१) निषेधार्थ नेमलेल्या चौकशी समितीचे ते सदस्य होते. पुढे जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली (१९३२). या पक्षाचे जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे नामकरण करण्यात आले (१९३९). त्यांनी सरंजामशाही, साम्राज्यशाही आणि जमातवाद यांविरूद्घ भूमिका घेतली. १९४० नंतर नव्या काश्मीरची चळवळ सुरू केली. पूर्वेकडील नव्या जागृतीची ती प्रतीक होती. जबाबदार शासन, लोकशाही राजवट, स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि मूलभूत अधिकार यांची त्यांनी मागणी केली. समता, स्वातंत्र्य व न्याय यांवर आधारलेल्या समाजवादी समाजरचनेचा त्यांनी पुरस्कार केला. पुढे काश्मीरच्यामहाराजां विरूद्घ त्यांनी ‘ काश्मीर छोडो ’ आंदोलन छेडले (१९४६), तेव्हा त्यांना नऊ वर्षांची शिक्षा झाली. त्याच सुमारास अखिल भारतीय संस्थानी प्रजापरिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तुरूंगातून मुक्तता करण्यात आली (२९ सप्टेंबर १९४७). पाकिस्तानने काश्मीरात घुसखोर पाठवून कब्जा घेण्याचा प्रयत्न केला; तेव्हा अब्दुल्लंनी त्याविरूद्घ जनआंदोलन उभे केले व भारतीय संघराज्यात काश्मीरच्या सामिलीकरणासाठी जनमत तयार केले (१९४७). नंतर काश्मीर राज्याच्या आणीबाणी प्रशासनाचे ते प्रमुख बनले (२७ ऑक्टोबर १९४७). पुढे त्यांना मुख्यप्रधान करण्यात आले (५ मार्च १९४८). ते भारतीय घटना समितीचे सदस्यही होते.

सुरूवातीस (१९४८—५३) अब्दुल्लांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे त्यांच्या निष्ठांविषयी शंका निर्माण झाली. शेख अब्दुल्लांनी पाकिस्तानच्या हेरखात्याशी संधान साधून काश्मीरचे भारतात झालेले सामिलीकरण रद्द करण्याचा व काश्मीरला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट उघड होताच भारत सरकारने त्यांना पकडून तुरूंगात टाकले (८ ऑगस्ट १९५३). १९६४ च्या एप्रिलमध्ये त्यांची सुटका करण्यात आली; परंतु भारतविरोधी वक्तव्यांमुळे त्यांना काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले.

भारत-पाक युद्धानंतर (१९७१) शेख अब्दुल्ला व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात वाटाघाटी होऊन नंतर १९७५ मध्ये एक करार झाला. त्यानुसार त्यांची जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली; पण मार्च १९७७ मध्ये काँग्रेस पक्षाने आपला पाठिंबा काढून घेतल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यात नव्याने निवडणुका घेण्यात आल्या व जुलै १९७७ मध्ये त्यांचे सरकार परत सत्तेवर आले. मुख्यमंत्रिपदी असतानाच अल्पशा आजाराने त्यांचे श्रीनगरमध्ये निधन झाले. उर्दूमध्ये त्यांचे आत्मचरित्र आहे.

पहा : जम्मू व काश्मीर (राजकीय स्थिती); राजकीय पक्ष.

संदर्भ : 1. Kaul, R. N. Sheikh Mohammad Abdullah-A Political Phoenix, Delhi, 1985.

   2. University of Kashmir, Sheikh Mohammad Abdullah-Commemoration Volume, Srinagar, 1983.
   3. Vashishth, Satish, Sheikh Abdullah Then and Now, Delhi, 1968.