पांढरकळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पांढरकळी हे सिंधू नदीच्या आणि काश्मीरच्या पूर्वेस आसामपर्यंत हिमालयात २,००० मी. उंचीपर्यंत व भारतात इतरत्र पानझडी जंगलांत आढळणारे झुडुप आहे. याला कोदरसी; हि. डालमे; सं. भूरी, धूसरा, फली; गु. शीनवी; क. इबत्ती गिड; लॅ. सेक्युरेनेगा व्हिरोजा, फ्ल्युजिया मायक्रोकार्पा; कुल-युफोर्बिएसी, इ. नावेही आहेत. हे झुडूप भारताबाहेर चीन, ऑस्ट्रेलिया, कार निकोबार बेट, मलेशिया, आफ्रिका, इ. प्रदेशांतही आढळते.

हे झुडूप अंदाजे ८ मी. उंच, बिनकाटेरी व द्विभक्त लिंगी असून खोडावरील साल पातळ, गुळगुळीत, लालसर करडी असते व तीवर वल्करंध्रांचे (बारीक छिद्रांचे) ठिपके असतात. फांद्या लहान व कोनीय (धारदार); पाने साधी, एकाआड एक, पातळ, दीर्घवृत्ताकृती-गोलसर, २.५-७.५ × १.५-४.५ सेंमी., भिन्न लांबी-रुंदीची; फुले हिरवट पिवळी, सुगंधी, एकलिंगी, फार लहान व सूक्ष्म छदांनी वेढलेल्या झुबक्यांनी, पानांच्या बगलेत मे-जूनमध्ये येतात. पुं-पुष्पे अनेक व स्त्री-पुष्पे १-५; केसरदले ३-५, किंजदले ३ व किंजले विभागलेली व भिन्न झाडांवर येतात.

याची फळे दोन प्रकारची, लहान व शुष्क अथवा मोठी (८ मिमी. व्यास), पांढरी व मांसल आणि खाद्य असतात.

सामान्य लक्षणे यूफोर्बिएसी कुलात (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळात बिया ३-६ असतात.