आख्यानकाव्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आख्यानकाव्य हा प्राचीन मराठी संतकविता आणि पंडिती काव्य या दोहोंच्या परंपरांतील कथाकाव्याचा एक प्रकार आहे. आख्यान म्हणजे कथा किंवा गोष्ट. तथापि देवदेवता, अवतारी महापुरुष आणि संत इत्यादींची गोष्टीरूप चरित्रे, पौराणिक व धार्मिक स्वरूपाच्या कथा किंवा उद्बोधक स्वरूपाच्या स्वतंत्र काल्पनिक कथा इत्यादींना उद्देशूनही आख्यान ही संज्ञा वापरली जाते. आख्यानाचे मूळ ऋग्वेदातील पुरूरवा-उर्वशी-संवादासारख्या अतिप्राचीन कथांत आढळते. नंतरचे वैदिक वाङ्‌मय इतिहासपुराणादी रचना आणि बौद्ध व जैन धार्मिक साहित्य यांतून आख्यान रचनेस वेगवेगळी वळणे लागल्याचे दिसून येते. तेराव्या शतकातील महानुभावांच्या साहित्यात मराठी आख्यानकाव्याचा उदय झाला. सोळाव्या शतकात संत एकनाथांच्यारुक्मिणीस्वयंवराने त्यास विशेष चालना व लोकप्रियता मिळाली आणि नंतरच्या धार्मिक आणि पंडिती रचनांतून अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ते वाढत-विकसत गेले. महाराष्ट्रातील कीर्तनसंस्थेमुळे आख्यानकाव्यास विशेष चालना मिळाली. आधुनिक काळात आख्यानकाव्याची जागा खंडकाव्याने घेतली आहे.

संकीर्ण स्वरूप[संपादन]

रुक्मिणीस्वयंवर हे एकच आख्यान महानुभाव कवी नरेंद्र, संत एकनाथ आणि पंडित कवी सामराज या तिघांनीही हाताळलेले आहे आणि प्रत्येकाच्या आख्यानाचा घाट वेगळा आहे. महाभारतावर आधारित रचना मुक्तेश्वर, मोरोपंत आणि श्रीधर या तिघांनी केलेली आहे आणि या तिघांच्या आख्यानांची रूपरेखा विभिन्न आहे. सामराज व रघुनाथपंडित हे दोघेही पंडित कवीच; पण पहिल्याचे रुक्मिणीहरण महाकाव्याच्या आखणीचे, तर दुसऱ्याचे नलदमयंतीस्वयंवर म्हणजे सुसूत्र खंडकाव्यच.