उष्माघात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रखर उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे किंवा तापमानात जास्त फरक असलेल्या जागी वावरल्यामुळे (उदा.:वातानुकुलीत खोलीतुन प्रखर उन्हात वा त्या विरुद्ध) होणारी व्याधी.यात अचानक शरीराचे तापमान १०४ फॅ.पेक्षा जास्त वाढते. त्यावर नियंत्रण न आल्यास मृत्यु येतो. यास इंग्रजीत 'सनस्ट्रोक' असे म्हणतात.

विदर्भातील अनेक गावात तपमान ४७ सेल्सियस वा कधी कधी त्याहीपेक्षा थोडे जास्त होते त्यावेळेस उष्माघाताने अनेक लोकं मृत्युमुखी पडतात.[ संदर्भ हवा ]

कारणे[संपादन]

  • प्रखर तपमानात बाहेर उन्हात फिरणे.(याने शरीरातील पाण्याची मात्रा अचानक कमी होते व मृत्यु ओढवतो.)[ संदर्भ हवा ]
  • कानास फडके न बांधता फिरणे.(याने उष्णता मेंदुपर्यंत जाण्यास अटकाव होतो.)[ संदर्भ हवा ]
  • उपाशी पोटी उन्हात फिरणे (शरीरास साखरेचा/ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो.)[ संदर्भ हवा ]
  • अति थंड पाणी पिणे(शरीराच्या तापमानात अचानक बदल)[ संदर्भ हवा ]

उन्हाळ्यात बाहेरील दिवसाचे तापमान ४२ सेल्शियसहून अधिक असते. एरवी उन्हामध्ये शरीरातील घाम निर्माण करणारे केंद्र बाहेरील तपमान काहींही असो शरीराचे तापमान 37.7 0 से. कायम ठेवतात. उन आणि गरम हवेच्या झोतामध्ये काम करावे लागले किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात जसे वेल्डिंग, भटट्या, ओतकाम आल्यास शरीराचे तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणा-या उष्णतेहून शोषलेली उष्णता अधिक असते. यामुळे शरीराचे तापमान वाढते. उष्माघात झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली नाहीतर मृत्यू ओढवतो. उष्माघात आणि ताप येणे या भिन्न प्रक्रिया आहेत. ताप येण्यामध्ये शरीराचे तापमान नेहमीहून अधिक राहते. व्याख्येप्रमाणे उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान 38.1 पेक्षा (100-101फॅ) अधिक किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान 37.70 से (97.5ते 98 फॅ) असते. उष्माघातामध्ये हे तापमान 400 से होणे हे जीवघेणे ठरते.

उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण. त्वचेलगतच्या रक्तवाहिन्यामधून उष्णता बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वचा लालबुंद होते. त्वचेचा रंग काळपट असेल तर नखे, ओठ, आणि खालची पापणी ओढून पाहिल्यास त्वचेचा नेहमीचा रंग बदलल्याचे समजते. ओठ सुजतात. घाम येण्याचे बंद झाल्याने त्वचा कोरडी पडते. उष्माघाताची इतर लक्षणे कारणपरत्वे बदलतात. उष्माघाताबरोबर जलशुष्कता असल्यास मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी होणे आढळून येते. परिणामी बेशुद्धी. अशा व्यक्तीस उभे करण्याचा प्रयत्न केल्यास ती खाली पडते. तीव्र स्वरूपाचा उष्माघात असल्यास व्यक्ती गोंधळल्यासारखी होते, कधीकधी संतापते, मद्यपान केल्यासारखी स्थिति होणे नवीन नाही. नाडी जलद लागते, श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी झाल्याने हृदय अधिक वेगाने आकुंचन पावून शरीरास पुरेसा ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न करते. रक्तदाब कमी झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्वचा फिकट होते. फिकट त्वचा झाल्यास ही उष्माघाताची तीव्र अवस्था समजण्यात येते. लहान मुलाना उष्माघातामध्ये झटके येतात. शरीरातील अवयवांचे कार्य थांबते आणि मृत्यू ओढवतो.

बाहेरील तापमान चाळीसहून अधिक आणि शरीराचे तापमान चाळीस झाल्यास उष्माघात होतो. उष्माघात दोन प्रकारचा होतो. एका प्रकारात बाह्य तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते. ते नेहमीच्या उपायानी कमी होत नाही. आणि दुसरा बाह्य तापमान अधिक असता शारिरिक कष्टाची कामे करताना किंवा उन्हाळ्यात व्यायाम करताना होतो. शारिरिक कष्टाची कामे करताना स्नायूंच्या चयापचयामुळे आधीच शरीर अधिक उष्णता निर्माण करते. उष्ण आणि दमट हवेत शरीर थंड ठेवण्याची यंत्रणा काम करीत नाही. हा अनुभव ऐन उन्हाळ्यात खेळाच्या स्पर्धा घेताना येतो. यात भर घालणा-या बाबी म्हणजे अतिशय कमी पाणी पिणे, मद्यपान आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे.

उपचार

सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.

उष्माघातावरील उपचार शरीराच्या तापमान वाढीच्या कारणावर अवलंबून आहेत. कधीकधी शरीराचे तापमान वाधण्याचे कारण दूर झाले म्ह्णजे उष्माघातावर उपचार करणे सुलभ होते. कडक उन्हामध्ये शरीराचे तापमान वाढल्याची शंका येताच स्वतःच्या रक्षणासाठी सावलीमध्ये बसणे आणि पाणी पिणे अशा उपायानी पुरेसा आराम मिळतो. ऐन कडक उन्हाळ्यात बाहेर पडल्यास रेल्वे रिटायरिंग रूम्स, वातानुकूलित चित्रपटगृहामध्ये बसून राहिल्यास पुढील अपाय टळतात. औषधांच्या परिणामामुळे झालेल्या उष्माघातावर उपचार म्हणून पॅरासिटॅमॉल, ॲअस्पिरिन सारखी ताप कमी होण्यासाठी देण्यात येणा-या औषधांचा वापर करू नये.

शरीराचे तापमान काळजी करण्यासारखे वाढले आणि घाम येणे बंद झाले आहे अशी शंका येताच शरीरातील उष्णता इतर उपायानी कमी करण्याचा प्रयत्न करावा. थंड सावलीच्या ठिकाणी बसणे अंगावरील कपडे काढणे असे उपाय त्वरित करावेत. डोके, मान आणि घड थंड पाण्याच्या पट्ट्यानी पुसून काढावे. यामुळे शरीराचे तापमान पूर्ववत होण्यास मदत होते. पाणी पिणे, पंखा , एर कूलर किंवा वातानुकूलित यंत्रणा चालू करण्याने व्यक्तीस बरे वाटते. जेवढे वय कमी तेवढे उष्माघाताचा परिणाम तीव्र असतो. वयस्क व्यक्तींच्या बाबतीत शरीराची तापमान पूर्ववत करणारी यंत्रणा नीटशी काम करत नसल्याने त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते.

उष्माघात झालेल्या व्यक्तीने थंड पाण्याच्या टबमध्ये शरीर बुडवण्याने शरीरातील उष्णता कमीतकमी वेळात बाहेर पडते. हा उपाय तारतम्याने करावा लागतो. टबमधील पाणी अति शीत असेल तर त्वचेलगतच्या रक्तवाहिन्या संकोचतात आणि शरीरातील उष्णता बाहेर येण्यात अडथळा निर्माण होतो. प्रायोगिक स्वरूपामध्ये उष्माघात स्थिति पर्यंतआणलेल्या व्यक्तीस शीत पाण्यात बुडवण्याने पुढील गंभीर स्थिति येत नाही.

शरीराचे तापमान 40 0 से होऊन व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार करावे लागतात. रुग्णालयामध्ये सलाइन लावणे, जठरामध्ये नळी टाकून आतील द्रव बाहेर काढणे आणि जठरात शीत सलाइन नळीवाटे देणे आणि तातडीच्या उपायामध्ये रक्ताचे तापमान कमी करण्यासाठी डायलिसिस वर रुग्ण ठेवणे अशा उपायांचा समावेश होतो. उष्माघात होऊ नये यासाठी सोबत मोठा पांढरा मान आणि डोके झाकेल असा रुमाल, किंवा पंचा, पूर्ण अंगभर शक्यतो सुती कपडे, कमीत कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणे, जवळ पाण्याची बाटली बाळगणे, दर अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी पिणे, अधून मधून लिंबू पाणी बर्फ न टाकलेले पिणे अशा उपायानी उष्माघात टाळता येतो.