विझिबल हिस्टरीझ, डिसअपियरिंग विमेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विझिबल हिस्टरीझ, डिसअपियरिंग विमेन : प्रोड्यूसिंग मुस्लिम विमनहूड इन लेट कलोनियल हे महुआ सरकार यांनी लिहिलेले २००८ मध्ये जुबान या स्त्रीवादी प्रकाशन गृहाने दक्षिण आशियामध्ये प्रकाशित केलेले पुस्तक आहे. तर ड्यूक विद्यापीठ प्रकाशनाने संपूर्ण जगामध्ये प्रकाशित केले.

सारांश[संपादन]

महुआ सरकार यांनी त्यांचा सदर पुस्तकामध्ये वसाहतकालीन भारताच्या इतिहासामध्ये मुस्लिम स्त्रियांचे कोणकोणत्या वेगवेगळ्या मार्गांनी चित्रण झाले आहे याची चिकित्सात्मक चर्चा केली आहे. राष्ट्राचे केंद्रीकरण व आधुनिकतेचे बौद्धिक राजकारण यांचा परिणाम म्हणजे भारतातील व वसाहतकालीन बंगालमधील मुस्लिम स्त्रियांचे सिमांतीकरण झाले आणि बळी म्हणून त्यांचे एक विशिष्ठ असे चित्रण निर्माण केले गेले.१८ व्या शतकापासून राष्ट्राच्या इतिहासामधून मुस्लिम स्त्रिया या जवळपास पूर्णपणे अदृश्य झाल्या. वसाहतकालीन भारतातील स्त्रियांबद्दल इतिहासामध्ये लिहिले गेले आहे परंतु या प्रामुख्याने उच्च जात/वर्णीय किंवा मध्यमवर्गीय हिंदू स्त्रिया होत्या ज्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिम स्त्रियांना प्रतिबंध करण्यात सहभाग दिला होता. लेखिका नमूद करतात की, वसाहतकालीन भारताच्या उत्तर कालखंडामध्ये मुस्लिम स्त्रियांची ही अदृश्यता आदर्श नागरिकत्वाची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. व्यापक संग्रहित संशोधन व मौखिक इतिहास यांच्या माध्यमातून सरकार यांनी मुस्लिम स्त्रिया या कशाप्रकारे वसाहतीक, हिंदू, राष्ट्रवादी आणि उदारमतवादी मुस्लिम लिखाणातून अदृश्य राहिल्या याचा आढावा घेतला आहे. तसेच मुस्लिम स्त्रियांची पूर्वी तयार केलेली प्रतिमा, वर्तमानकालीन प्रतिनिधित्व आणि सध्याच्या भारतात मुस्लिम स्त्रियांविरुद्ध होणारा हिंसाचार या सर्वांमधील गुंतागुंतीचे आंतरसंबंध यांची उकल केली आहे. एकमेकांशी जोडलेली अशी चार प्रकरणे पुस्तकात असून वसाहतकालीन बंगालमध्ये मुस्लिम स्त्रिया कशाप्रकारे दृश्य किंवा अदृश्य होत्या; तसेच आजच्या मुस्लिम व हिंदू अशा दोन्ही स्त्रियांच्या फाळणीपूर्व बंगालच्या आठवणी यासर्वांचा आढावा घेतला आहे. समारोपाच्या प्रकरणामध्ये शेवटी भूतकालीन प्रतिनिधित्वाच्या संदर्भातील हिंसाचार आणि समकालीन भारतामध्ये स्त्रियांविरुद्ध होणारा हिंसाचार यांच्यातील आंतरसंबंधांवर प्रकाश टाकला आहे.

पहिल्या प्रकरणामध्ये महुआ सरकार यांनी प्राथमिक साहित्य आणि काही निवडक महत्त्वाचे प्राथमिक स्रोत वापरून वसाहतकालीन दस्ताऐवजांचे पुनर्परीक्षण केले आहे ज्यातून वर्चस्ववादी ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये स्त्रियांचा समावेश व प्रतिनिधित्व कसे केले आहे याचा आढावा घेतला आहे. १८ व्या शतकामध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आपले बस्तान भारतात बसवायला सुरुवात केली; त्यादरम्यानभारतातील मुस्लिम राजवटी देखील अस्ताला जाऊ लागल्या होत्या. या काळामध्ये भारतीय उपखंडामध्ये ब्रिटीश पुरुष व स्थानिक स्त्रिया यांच्यामध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित होऊ लागलेले. उपखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीसाठी मनुष्यबळाचे पुनरुत्पादन होण्यासाठी हे संबंध हे महत्त्वाचे ठरले. या स्थानिक स्त्रिया नेहमी मोलकरीण, सेविका, गुलाम, सोबती, सहचर आणि ज्या पुरुषांच्या 'इच्छेच्या विषय वस्तू' असू शकतात अशा प्रकारेच प्रदर्शित केल्या जात असत; ज्या ब्रिटिश साम्राज्याच्या उत्कर्षासाठी पूरक होत्या. ब्रिटिशांचे राज्य आणि वर्चस्व यांचे समर्थन करण्यासाठी व स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी/पुनर्रचित करण्यासाठी या स्थानिक स्त्रिया व त्यांचे 'इच्छेच्या विषय वस्तू' म्हणून केले जाणारे चित्रण तसेच बळी म्हणून त्यांची तयार केली गेलेली प्रतिमा हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. स्त्रियांचे हे चित्रण करण्याच्या दिशेने जाणीवपूर्वक उचलेले हे पाऊल हे प्रत्यक्षात या स्थानिक स्त्रिया ज्या ब्रिटीशांच्या सहचारिणी होत्या त्यांचे इतिहासलेखनात आलेले जे प्रश होते त्याकडे दुर्लक्ष करविणारे होते. तरीदेखील या स्त्रिया वसाहतीक मनुष्यबळाचे पुनरुत्पादन करणे व महत्त्वाच्या सामाजिक संस्थेचा भाग बनणे अशा महत्त्वाच्या भूमिका पार पडतात.

प्रकरण दोन पोलिटीक्स ऑफ इन(विझीबिलीटी) यामध्ये स्त्रिया या राष्ट्राच्या दृश्य स्वरूपातील प्रतिक कशा बनतात हे उलगडले आहे. स्त्रीवादी अभ्यासकांनी लिंगभाव आधारित होणाऱ्या शोषणाचे विश्लेषण करताना अस्मितांच्या ऐवजी स्त्रियांमधील भिन्नात्वाला महत्त्वाचे स्थान दिले, पुस्तकाच्या लेखिका याच मांडणीच्या सहाय्याने विश्लेषण करतात की, लिंगभाव व वर्ण यांच्याआधारे समूहाच्या व वर्गाच्या ज्या अस्मिता तयार केल्या गेल्या; ज्यात हिंदू उच्च जातीय मध्यम वर्गीय स्त्रियांच्या अस्मितेमुळे मध्यम वर्गीय मुस्लिम स्त्रियांना सदर अस्मिता नाकारल्या जातात. १९ व्या शतकामध्ये जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा संपूर्ण प्रशासकीय कारभार आपल्या हातात घेतला तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये एक नवीन असा नोकरदार इंग्रजी बोलणारा मध्यम वर्ग उदयास आला. इंग्रजी शिक्षणामुळे बंगालमध्ये बौद्धिक क्रांती व सामाजिक सुधारणा होण्यास सुरुवात झाली, ज्यावर पाश्चिमात्य उदारमतवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता आणि प्रबोधन व धर्माचे विचार यांच्या संदर्भात त्यांचे यश हे गृहीत धरले जात होते. 'भारतीय' संस्कृतीवर केल्या गेलेल्या टीकेमध्ये हिंदू धर्माच्या सामाजिक व धार्मिक प्रथा आणि स्त्रियांना दिली जाणारी वागणूक यावर भर दिला गेला, ज्याचा परिणाम म्हणजे हिंदू उच्च जातीय पुरुषांना त्यांच्या प्रथा-परंपरांबद्दल पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली. परंतु सामाजिक सुधारणेच्या या संपूर्ण चळवळीमध्ये मुस्लिम समूह हा वेगळा पडला कारण जे सामाजिक प्रश्न मांडले गलेले होते त्यांच्यासोबत ते स्वतःला जोडून घेऊ शकत नव्हते. मुस्लिम हे त्या अर्थाने पुराणमतवादी असले तरी सार्वजनिकरीत्या स्त्रियांवर अत्याचार करण्याची त्यांची प्रथा नव्हती. आदर्श ठरलेले नव मध्यम वर्गातील शिक्षित स्त्रिया व पुरुष यांच्या माध्यमातून स्त्रियांचे नव्या स्वरूपात पुनर्साचिकरण केले जाऊ लागले. यामागील मुख्य प्रेरणा ही ब्रिटिशांनी मुस्लिमांचे जे वर्गीकरण केले व ज्यातून मुस्लिम पुरुषांना अनैतिक, अप्रतिष्ठा आणि अवास्तव पुरुषी जे स्त्रियांचे शोषण करतात; ज्यामुळे ते परिवर्तनाच्या चळवळीमध्ये देखील सहभागी होत नाहीत अशी गृहीतके निर्माण केली गेली. या वसाहत काळामध्ये जे निर्माण झालेले साहित्य होते; जे प्रामुख्याने धर्म, राष्ट्रवाद यांच्याशी संबंधित होते; त्यात मुस्लिम स्त्रिया या जरी त्याकाळी आवाज उठवत होत्या तरीदेखील त्यांची अतिशय कमी प्रमाणात दखल घेतली जात असे. १८ व्या शतकाच्या शेवटापासून ते २० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत हे जे एक शतक होते त्यामध्ये वसाहतीक व हिंदू वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी अवकाशामध्ये मुस्लिम स्त्रियांना जाणीवपूर्वक अदृश्य ठेवले गेले. लिखित साहित्यातील स्त्रियांचे दृश्य वा अदृश्य असणे व त्यातून स्त्रियांच्या विशिष्ठ प्रतिमा निर्माण करण्याचे राजकारण हे ठराविक इतिहास निर्माण करणे व स्त्रियांचे ठराविक असे वर्णन करणे याच्याशी संबंधित होते. लेखिका हे आवर्जून नमूद करतात की, सामाजिक परिवर्तन व स्त्रियांच्या मुक्तीचे गौरवीकरण यासंदर्भातील जो समूहावादी अवकाश होता तो प्रत्यक्षात पितृसत्ताक/राष्ट्रवादी पुरुषांनी त्यांच्या सोयीने जे बदल घडवून आणले होते त्यामध्ये स्त्रियांनी स्वतःला त्यांच्या बदलांनुसार परिस्थितीसोबत जुळवून घेणे हे अपेक्षित होते.

१९ व्या शतकाच्या शेवटी ते २० व्या शतकाच्या दरम्यान मुस्लिम मध्यम वर्ग हा बंगाली ही त्यांची भाषा आहे असे म्हणत उदयास आला. या मुस्लिम समूहाला वसाहतवाद्यांकडून, मुस्लिम सनातन्यांनी धर्मांतरित म्हणून कनिष्ठ दर्जाचे हिंदू म्हणून व हिंदूंनी त्यांच्यापेक्षा निम्न दर्जाचे असे म्हणून सर्व बाजूंनी विरोध झाला. अशाप्रकारच्या गुन्हेगारीकरणामुळे मुस्लिम समूहाचे प्रश्न हेच त्यांची ओळख बनले आणि वसाहतवादी आणि हिंदू समूहांनी ज्या समूहाच्या व बनविलेल्या होत्या त्याला; यासोबतच लिंगभाव आधारित होणारे शोषण याला संपादकीय साहित्य प्रसिद्ध करणे तसेच लोकप्रिय साप्ताहिक यांच्या माध्यमातून आव्हान देण्यास मुस्लिम समूहाने सुरुवात केली. नेगोशीयेटिंग मॉडरनिटी या प्रकरण तीन मध्ये लेखकाने हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे की, राष्ट्र राज्य व राष्ट्र यांच्यावरील स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये मुस्लिम समूहाच्या अस्मितेचे वरील प्रमाणे जे प्रश्न होते त्याची आवश्यक तेवढी दखल घेतली गेली नाही. तसेच काळ्या स्त्रीवादी व तिसऱ्या जगातून जी मांडणी केली गेली त्यामध्ये बंगाल मधील ऐतिहासिक संदर्भात मुस्लिम स्त्रियांची जी मांडणी केली गेली त्यावर देखील प्रश्न उभे केले आहेत. जाणीवपूर्वक केलेले अदृष्यीकरण ही बंगालच्या फाळणीच्या संदर्भात मुस्लिमांना फुटीरतावादी व सनातनी म्हणून जाहीर करण्यात एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरले गेले. बंगाली मुस्लिम बुद्धीजीवी वर्गाचा या राजकीय फाळणीला विरोध नव्हता. फाळणीच्या कथनामध्ये मुस्लिमांना फुटीरतावादी म्हणून चित्रित करण्यातून फाळणीचे समर्थन केले गेले की, मुस्लिमांना फाळणी हवी होती आणि हिंदूंना त्याचे दुःख सहन करावे लागले.

इतिहास हा जनता, शासन किंवा प्रबळ प्रतिनिधित्व यांच्यातून निर्माण केला जात नाही तर लोकांच्या आठवणींमध्ये भूतकाळ जसा रचला जातो त्याप्रमाणे इतिहास हा लोकांच्या आठवणींमध्ये घडविला जातो. जनमानसातील आठवणींचा अभ्यास हा विवेकवादी असणे हे आवश्यक आहे कारण वर्चस्ववादी सिद्धांकने आणि अकादमिक व सार्वजनिक जगातील विरोधी रचना तसेच प्रथा परंपरांनी युक्त खाजगी जग व सार्वजनिक जग यांच्याशी हे संबंधित आहे. डीफ्रेंस इन मेमरी या चौथ्या प्रकरणामध्ये सरकार यांनी बंगाल मधील वसाहतीक राजवटीच्या शेवटच्या दशकांचा आढावा घेतला आहे. विशेषतः शहरी मुस्लिम लोकांच्या बदलत्या जीवनशैलीबद्दल मुस्लिम स्त्रियांच्या आठवणी ज्या एक महत्त्वाचे दस्तऐवज आहेत ज्यातून त्या प्रदेशाचा भौगोलिक इतिहास देखील समोर येतो. लेखिका नमूद करतात की, आठवणी या सत्याचा शोध घेण्यासाठीच असतात असे नाही तर वैयक्तिक आठवणी या इतिहासाचे जे विभक्त न होऊ शकणारे असे प्रतिनिधित्व असते त्यासोबत जोडलेल्या असतात. मौखिक इतिहासामधून वसाहतकाळाच्या उत्तरार्धामध्ये जो हिंदू राष्ट्रवाद आणि ब्रिटीश राष्ट्रवाद होता त्यादरम्यान निर्माण झालेले 'मुस्लिमपण' हे लेखिकेने मांडले आहे. ज्यामध्ये मध्यमवर्गीय बंगाली मुस्लिम स्त्रिया ज्या १९१० ते १९५० च्या दरम्यान कलकत्ता किंवा ढाका मध्ये जन्माला आलेल्या स्त्रिया तसेच काही मध्यम वर्गीय बंगाली हिंदू स्त्रिया यांच्या आठवणींचा समावेश आहे.

महुआ सरकार यांनी पुस्तकाच्या निष्कर्षामध्ये मुस्लिम स्त्रियांचे ऐतिहासिकदृष्ट्या जे प्रतिनिधित्व केले गेले आहे आणि त्याची समकालीन भारताच्या सध्याच्या आकादामिक व लोकप्रिय क्षेत्रांमध्ये कशी जडणघडण केली जात आहे यावर चर्चा केली आहे. हसन आणि मेनन यांच्या मांडणीला पुढे घेऊन लेखिका मांडतात की, राष्ट्रवादाच्या अवकाशामधून तसेच सामाजिक वगळणे यासंदर्भातील त्यानंतर येणारा इतिहास यामध्ये मुस्लिमांना कशाप्रकारे उत्पादित केले/ खोडले गेले/ परीघावर टाकले गेले याची दखल घेण्यात मोठ्याप्रमाणात अभ्यासकांना अपयश आले आहे. मुस्लिम स्त्रियांचे बळी म्हणून वसाहतकालीन चित्रण किंवा वर्तमानकालीन चित्रण हे तसेच आहे आणि मुस्लिम हा कोटीक्रम निर्माण करण्याची दीर्घ प्रक्रिया ही काळानुसार प्रतिनिधित्वाच्या अदृष्यीकरणामध्ये बदलत गेलेली दिसते ज्याचा संदर्भ सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हिंसाचारासोबत आहे. समकालीन भारतामध्ये मुस्लिम स्त्रियांची दखल सार्वजनिक जगामध्ये घेण्यास काही घटना कारणीभूत ठरल्या त्या म्हणजे १९८० च्या दशकातील शहाबानो घटना आणि २००२ मधील गुजरातमधील दंगल. या सर्वांच्या अनुषंगाने लेखिका मुस्लिमांचे पद्धतशीरपणे अवमुल्यन करण्याच्या पद्धती या स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या वेगवेगळ्या प्रकारांमधून चर्चिल्या आहेत. यासोबतच मुस्लिम व्यक्तीनिष्ठतेला ज्याप्रकारे खोडून काढले जाते हे मांडले आहे. [१]

प्रतिक्रिया[संपादन]

बर्टन ज्यांनी आर्काइव स्टोरिस: फेक्ट्स,फिक्शन अंड द राईटिंग या पुस्तकाचे संपादन केले आहे; ते म्हणतात की या पुस्तकामधून जे वास्तविक स्वरूपाचे काम पुढे आले आहे त्यामधून दक्षिण आशियातील इतिहास, लिंगभाव व स्त्री अभ्यास, उत्तर-वसाहतकालीन सिद्धांतआणि ऐतिहासिक सामाजिक शास्त्र यांच्यामध्ये एक नवीन अवकाश निर्माण झाला आहे.

दुर्बा घोष या सदर पुस्तकाबद्दल म्हणतात की, यातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे; विशेषतः भारतीय उपखंडातील मुस्लिम स्त्रियांबद्दल. सरकार यांनी शहाबानो या वादग्रस्त घटनेची पुन्हा चर्चा केली आहे तसेच गुजरात मधील दंगलीची चर्चा निष्कर्षामध्ये केली आहे. ही चर्चा सरकार यांच्या विस्तृत मांडणीवर आधारित आहे परंतु ती त्यांच्याच मांडणीच्या विरोधात पण दिसते कारण मुस्लिम स्त्रियांची वस्तुनिष्ठता ही वैयक्तिक कोटीक्रमांच्या किंवा घटनांच्या पलीकडे जाऊन समाजाने आवश्यक आहे. [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://networks.h-net.org/node/22055/reviews/22200/shehabuddin-sarkar-visible-histories-disappearing-women-producing
  2. ^ http://www.tandfonline.com/doi/abs/10.1080/03071020902778543?src=recsys