फेमिनिस्ट मेथडॉलॉजी: चॅलेंजेस अँड चॉइसेस (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेमिनिस्ट मेथडॉलॉजी: चॅलेन्जेस ॲन्ड चॉइसेस[१] हे २००२ मध्ये केरोलीन रमाझानोग्लु व जेनट होलेंड द्वारा लिखित व 'न्यू सेज प्रकाशनाने' प्रसिद्ध केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात लेखक स्त्रीवादी पद्धतीशास्त्राच्या निर्मितीमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याला विविध विचारधारेकडून मिळालेले आव्हान व यातून निर्माण झालेले स्त्रीवादी पद्धतीशास्त्राचे वेगळेपण अधोरेखित करतात.

ठळक मुद्धे[संपादन]

या पुस्तकात तीन महत्त्वाच्या मुद्यांचा उहापोह झालेला दिसतो: (1) स्त्रीवादी पद्धतीशास्त्र, हे पाश्चात्य तत्त्वज्ञानात सत्य शोधण्यासाठी 'समाजाबाबतीतील विचार, लोकांचे समाजजीवनाबाबतीतील अनुभव व वास्तविक सामाजिक परिस्थिती' या तिन्हींचा एक दुसऱ्याशी संबंध कसा जोडावा या प्रश्नाभोवतीच्या मतभेदांनी घडले आहे. (2) या चर्चेला स्त्रीवाद्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे स्त्रीवाद्यांमध्ये वैविध्य तसेच पद्धतीशास्त्राबाबतीतील मतभेद निर्माण झालेले आहे. (3) सदरचे वैविध्य असून देखील स्त्रीवादी पद्धतीशास्त्रात काही वैशिष्ट्य ठळकपणे दिसते कारण काही विशिष्ठ तात्त्विक, राजकीय व नैतिक मुद्दे या सर्व स्त्रीवादी विचारपद्धतींचा आधार असलेले दिसते.

विभागनिहाय विषयाची मांडणी[संपादन]

स्त्रीवाद्यांमधील प्रबोधनकाळाचा वारसा व विरोधाभास[संपादन]

पुस्तकातील पहिल्या भागात लेखकांनी स्त्रीवादी पद्धतीशास्त्राच, प्रबोधनकाळातील मूल्यांशी असलेले नातं टिपलेल आहे. त्यांच्या मते स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे ‘संशोधन पद्धती’ (प्रबोधनकाळाच फलित) विरुद्धच्या संघर्षाने (वैज्ञानिक पद्धती या ज्ञानशाखेनी स्त्रियांना तुच्छ व दुय्यम लेखलेले दिसते व या विरोधातील संघर्षाने स्त्रीवादी पद्धतीशास्त्र घडलेले दिसते) घडले असले तरीही प्रबोधनकाळातील व मानवतावादातील काही धारणांचा (तर्क, विज्ञान, विकास, सत्यशोधन, मुक्ती)आग्रह स्त्रीवादीही पूर्णपणे सोडू शकलेले नाहीत. त्यामुळे स्त्रीवादी पद्धतीशास्त्रात अंतर्गत विरोधाभास निर्माण झालेले आहेत. याआधारावर स्त्रीवादी पद्धतीशास्त्राची पाळ-मूळ हे युरोपियन प्रबोधनकाळ व मानवतावादात असल्याचे ते मांडतात.

वैज्ञानिक पद्धतीचे मुलभूत घटक ‘वैश्विक सत्याचा शोध (truth claim)’ व वस्तुनिष्ठतेला स्त्रीवाद्यांनी सातत्याने आव्हान दिले परंतु त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या सामाजिक जीवनाबाबतीतील ज्ञानाला, या वैज्ञानिक जगतात सिद्ध करण्यासाठी त्यांनी कुठले विविध मार्ग निवडले हे पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणात लेखक मांडतात. ज्ञान व वास्तव यामधील संबंध सिद्ध करताना स्त्रीवाद्यांनी ४ वेगळ्या भूमिका घेतलेल्या दिसतात. पहिल्या व दुसऱ्या भूमिकेत वस्तुनिष्ठता व व्यक्तीनिष्ठता हे भिन्न व सत्य सिद्ध करण्यास विरोधाभासी मार्ग असल्याचे दिसते. तिसऱ्या भूमिकेत सत्याप्रत पोहचण्यास दोन्हींची गरज असल्याचे मांडतात व सापेक्षतावादी हे ज्ञान व वास्तव यामधील संबंध जोडणे संशोधकाला शक्य नाही अशी भूमिका मांडतात. पहिल्या भागातील ४थ्या प्रकरणात लेखक सापेक्षतावादाच्या दाव्याला (अनेक सत्य असतात व व्यक्तीच्या सामाजिक स्थानावरून सत्याची आवृत्ती बदलते) स्त्रीवादी कशे सामोरे जातात याचे स्पष्टीकरण देतात. त्यांच्या मते स्त्रीवाद्यांनी मांडले कि 'जाणणारा स्त्रीवादी (संशोधक)' व त्याने निर्माण केलेले सत्य या समाजातील असलेल्या त्याच्या स्थानाचा परिणाम असते (स्त्रीवादी भूमिदृष्टी). लेखकांनी दाखवून दिले कि सापेक्षतावादाच्या दाव्याला सामोरे जाताना स्त्रीवादी हे निरपेक्षतावादाच्या व 'सत्य' या धारणांच्या पलीकडे जाऊन स्त्रीवादी भूमिदृष्टी पुढे आणतात.

स्वातंत्र्य, विघटन व विरोध[संपादन]

पुस्तकातील दुसऱ्या भागात लेखक आधुनिकोत्तरवादी व उत्तर संरचनावाद्यांनी स्त्रीवाद्यांवर केलेली टीका व स्त्रीवाद्यांनी त्याला दिलेले उत्तर स्पष्ट करतात. जिथे एका बाजूला आधुनिकोत्तरवाद्यांनी स्त्रीवादी विचारधारेच्या मुलभूत कोटीक्रमांनाच (स्त्री, स्त्रीवाद) आव्हान केलेले दिसते तिथे स्त्रीवाद्यांनी याला लिंगभाव, सत्ता व ज्ञान निर्मितीवर पुर्नचिंतन करण्याची सकारात्मक संधी म्हणून पाहिलेले दिसते.

तसेच येथे वैज्ञानिक पद्धती व मानवतावादाला संपूर्णपणे सोडण्याने स्त्रीवाद्यांवर कुठले राजकीय व नैतिक परिणाम पडतील याबाबतीतील चिंता स्त्रीवाद्यांमध्ये दिसून येते हे ही त्या दाखवून देतात. या वारसाला संपूर्णपणे न सोडल्याकारणान स्त्रीवादी पद्धतीशास्त्रात दोन प्रकारचे परिणाम दिसतात. एकाबाजूला स्त्रीवादी पद्धतीशास्त्राच्या गाभ्यात विरोधाभास निर्माण झाले व दुसऱ्या बाजूला आधुनिकोत्तर विचारांना स्त्रीवाद्यांनी विविध पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या (एक पद्ध्तीशास्त्रातील धोरणाद्वारे नव्हे).

स्त्रियांमधील भिन्नत्वाच्या स्वीकारामुळे स्त्रीवद्यांमधील विभागणी किंवा त्याने तुकडे करण्याचे राजकीय परिणाम व स्त्रियांमध्ये युतीच्या शक्यता निर्माण करण्याचे मुद्दे स्त्रीवादी संशोधकांपुढे येतात ज्याबाबत या पुस्तकात भाष्य केलेले दिसते. याच मुद्द्याला धरून संशोधनकर्ता व ‘ज्यांच्यावर संशोधन होत आहे’ यामधील संबंधांबाबतही या पुस्तकात चर्चा केलेली दिसते. स्त्रीवादी संशोधकाचे नैतिक मूल्य /कर्तेपणा हा संशोधन प्रक्रियेमधील सत्ता संबंधांबाबत चिकित्सक पद्धतीने चिंतन (reflect) करण्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. त्या हे ही दाखवून देतात कि स्त्रीवादी ज्ञान निर्मितीचे निर्माते म्हणून संशोधका समोर जे पर्याय उपलब्ध असतात ते आजही राजकीय व ज्ञानमीमांसाशास्त्राच्या दृष्टीने एक समस्या आहेत.

आव्हानांना सामोरे जाताना, निवड करताना[संपादन]

पुस्तकातील तिसऱ्या भागात एक छोटे स्त्रीवादी संशोधन करताना स्त्रीवादी संशोधका पुढे येणाऱ्या पर्यायांबाबत मांडणी केलेली दिसते. लेखकांनी येथे योग्य उत्तर किंवा आदर्श प्रक्रिया नोंदवण्याचा प्रयत्न केलेला नाही तर संशोधन प्रश्नापासून ते संशोधनाचे निष्कर्ष काढण्यापर्यंत, संशोधन प्रक्रियेच्या एका आवृतीला उलगडण्याचा येथे प्रयत्न दिसतो. तसेच स्त्रीवादी ज्ञान निर्मिती व त्याला सिद्ध करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयामधून संशोधकाला सदरचे पुस्तक नेते.

निष्कर्ष[संपादन]

एकंदरीत ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेत विविध स्वरूपाचे स्त्रीवादी योगदान व स्त्रीवादी चर्चाविश्वातून व बाहेरून निर्माण झालेले विविध मतभेद लेखक दाखवून देतात. प्रबोधनकाळातील काही धारणा स्वीकारल्यामुळे स्त्रीवादी पद्धतीशास्त्रात निर्माण झालेले काही विरोधाभास, सत्य व वस्तुनिष्ठता या धारणांना स्त्रीवाद्यांनी दिलेले आव्हान, सापेक्षवादाचा दावा (relativist claims), स्त्रीवादी पद्धतीशास्त्राला आधुनिकोत्तरांनी दिलेले आव्हान, स्त्रियांमधील भिन्नत्वाचा मुद्धा व या सर्व मुद्यांमधून स्त्रीवादी संशोधकांनी केलेल्या निवडींबाबत या पुस्तकात भाष्य केलेले दिसते. या पद्धतीने लेखक स्त्रीवादी 'पद्धतीशास्त्रातील गोंधळ (methodological confusion)'[२] उलगडून दाखवण्यासाठी विविध समकालीन वादविवादांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच या पद्धतीशास्त्रातील वाद- विवादांना स्त्रीवादी संशोधन करताना व्यवहारात कसे आणायचे हे ही दाखवून देते.

प्रतिक्रिया/ योगदान[संपादन]

पेटी लथेरच्या[३] मते समाज विज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रीवादी संशोधनासाठी हे पुस्तक एक परिचय म्हणून उपयोगी आहे. त्यांच्या मते हे पुस्तक आधुनिकोत्तर विचारांना, आधुनिक विचारांकडून मिळालेली प्रतिक्रिया आहे.[४] तसेच या पुस्तकात उत्तर वास्तवतावादी ज्ञानमीमांसाशास्त्र(post realist epistemologies), ज्यात सापेक्षतावाद (relativism) विरुद्ध वास्तववाद (reaslism), भाषिक (linguistic) विरुद्ध भौतिक (material), या द्वैतांच्या मर्यादांचा, तसेच बहुसंख्यांकांच्या बाजूने नसलेले स्त्रीवादी विचार(non-majoritarian feminist thought) व व्यवहार, मनोविश्लेषणात्मक (psychoanalytic) दृष्टीकोणाचाही यात समावेश होतो.

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ Ramazanoglu, C., & Holland, J. (2002). Feminist Methodology: Challenges and Choices. New Delhi: Sage Publications.
  2. ^ http://www.socresonline.org.uk/7/4/ramazanoglu.html
  3. ^ https://comparativestudies.osu.edu/people/lather.1
  4. ^ Lather, P. (2005). Book Reviews. Chicago Journals, Signs, Vol. 30, No. 4, New Feminist Approaches to Social Science Methodologies , 2240-2243