केशवराव कोठावळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केशवराव कोठावळे (जन्म : २१ मे १९२३; - ५ मे १९८३) यांनी मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी ग्रंथप्रकाशन संस्था काढली आणि नावारूपाला आणली.

मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करूनही त्यांनी काही दिवस अल्प प्रमाणात अर्थार्जन केले. काही काळ रोज झोपण्यासाठी मौज प्रेसच्या जागेचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. परंतु यातून बाहेर पडायचेच असे निश्चयपूर्वक ठरवून त्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकीत केशवरावांनी औदुंबराच्या झाडाखालच्या मॅजेस्टिक सिनेमा(मुंबई)जवळच्या लहानशा दुकानापासून गिरगावातील प्रसाद चेंबर्समधल्या अद्ययावत कार्यालयापर्यंत आणि पुण्यातल्या तीनमजली भव्य इमारतीपर्यंत आपल्या प्रकाशनव्यवसायाचा विस्तार घडवून आणला.

१९६४ मध्ये केशवराव कोठावळे यांनी ललित नावाचे मासिक काढले, आणि साहित्यिक चर्चाविनिमयाचे व वृत्तविशेषाचे एक विश्वासार्ह माध्यम त्यातून त्यांनी निर्माण केले. ललित मासिकामध्ये आजही, बाजारात येणाऱ्या नवीन मराठी पुस्तकांची माहिती आणि कधीकधी परीक्षण असते.

१९६९ मध्ये केशवरावांनी लॉटरीच्या तिकिटांचा व्यवसाय सुरू केला. लॉटरीच्या तिकिटांवरील कोठावळ्यांचा शिक्का इतका लोकप्रिय झाला की हे तिकीट घेतले की लॉटरी लागणारच असा विश्वास ग्राहकांच्या मनात निर्माण झाला. यातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग मॅजेस्टिक प्रकाशनाच्या वाट्याला येत राहिला. मौज, पॉप्युलर, कॉन्टिनेन्टल यांसारख्या नामांकित मराठी पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या संस्था असताना मॅजेस्टिक हे नाव त्यांच्या जोडीला आणून ठेवणे ही अवघड कामगिरी केशवरावांनी तुलनेने अल्पावधीत पार पाडली.

केशवरावांच्या प्रयत्‍नाने पुण्यात मॅजेस्टिक गप्पांचा कार्यक्रम १ मे १९८३ रोजी नुकताच सुरू झाला असताना ५ मे रोजी केशवराव हे जग सोडून गेले.

केशवराव कोठावळे पुरस्कार[संपादन]

इ.स. १९८५पासून मराठीतील एखाद्या उत्कृष्ट पुस्तकाला केशवराव कोठावळे यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. या पुस्तकांचा परिचय करून देणारा ग्रंथ - केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ - डॉ. विलास खोले यांनी लिहिला आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले लेखक आणि त्यांची पुस्तके :-

  • इ.स. २००९ : सिद्धार्थ पारधे ('कॉलनी’ या पुस्तकासाठी)
  • इ.स. २०१३ : मकरंद साठे (‘मराठी रंगभूमीवरील ३० रात्री' या समीक्षा ग्रंथासाठी)
  • इ.स. २०१४ : जया दडकर (`दादासाहेब फाळके – काळ आणि कर्तृत्व' या चरित्रास)
  • विजय वसंतराव पाडळकर (’कवडसे पकडणारा कलावंत’ या श्रेष्ठ रशियन कथाकार आंतोन चेखव याचे जीवन व त्याच्या कथा यांचा अभ्यास करणाऱ्या पुस्तकास)
  • इ.स. २०१५ : दासू वैद्य (‘तत्पूर्वी’ या काव्यसंग्रहासाठी)
  • याशिवाय, जाळ्यातील चंद्र (म.वा. धोंड), पिकासो (माधुरी पुरंदरे, खरे मास्तर (विभावरी शिरुरकर, पानझड (ना.धों. महानोर, बदलता भारत (भानू काळे, भिन्न (कविता महाजन, वगैरे.
  • इ.स. २०१६ : अनंत भालेराव (‘हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा\ या पुस्तकासाठी)