शांतलिंगस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शांतलिंगस्वामी (जीवनकाळ: अंदाजे इ.स.च्या १६व्या शतकाचा पूर्वार्ध) हे महाराष्ट्रातील शिखर शिंगणापूर या शैवक्षेत्री राहणारे हिंदू आध्यात्मिक गुरू होते. शिवाजीराजे भोसल्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे त्यांचे समकालीन होते [१]. वीरशैवांच्या प्रमुख मराठी संतकवींपैकी शांतलिंगस्वामी एक होते. त्यांचा जन्म इ.स. १५५३ साली झाला असावा व त्यांनी इ.स. १६२३ साली समाधी घेतली, असे संशोधकांचे मत आहे. त्यांच्या नावाचे शिवयोगी, शांतेश्वर, शांतनीळकंठ इ. अन्य उल्लेखही त्यांच्या साहित्यात आढळतात.[२]

साहित्य[संपादन]

त्यांची विचारप्रवृत्ती तत्त्वचिन्तनात्मक होती, हे त्यांच्या विविध ग्रंथांवरून आपल्याला जाणवते. भाष्यात्मक लेखन हा त्यांचा आवडीचा प्रांत. त्यांची रचना पांडित्यपूर्ण असून तिच्यामधून त्यांची बहुश्रुतता, विद्वत्ता आणि व्युत्पन्नता प्रकट होते.

विवेकचिंतामणी, शांतबोध आणि करणहसुगे (कर्णहस्तकी) हे त्यांचे ग्रंथ असून वीरशैव मराठी तत्त्वपर लेखनात त्यांचे स्वतःचे असे एक स्थान आहे.

निजगुणशिवयोगी यांच्या ‘विवेकचिंतामणी‘ या बृहद्‌ग्रंथाचा मराठी ओवीबद्ध अनुवाद शांतलिंगस्वामींनी केला.[३] विवेकाचिन्तामणी या ग्रंथात त्यांनी वीरशैव धर्माच्या मूलभूत षट्स्थल- सिद्धान्ताचे सविस्तर विवेचन केले आहे. त्यावरून वीरशैव हा एखादा संप्रदाय वा पंथ नसून स्वतंत्र धर्म आहे याची कल्पना येते. वीरशैव हा पंथ या संप्रदाय नसून धर्म आहे, याविषयीचे उल्लेख अनेक वीरशैव मराठी संतकवींच्या लेखनात आढळतात. त्यांच्या स्वतंत्र विचारप्रणालीत व आचारसंहितेत याची प्रमाणे वा दाखले आढळतात. जनसामान्यांसाठी कन्नड भाषेतील वीरशैव तत्त्वज्ञानाचा व आचारधर्माचा परिचय करून देणे, हे शांतलिंगांच्या या प्रमुख ग्रंथांच्या निर्मितीचे प्रयोजन तर होतेच पण त्याच बरोबर शांतलिंगांनी या ग्रंथांत काव्यशास्त्र, संगीतशास्त्र, ज्योतिषशास्त्रादींचाही परिचय करून दिला आहे.[४]

शांतलिंगांच्या दुसऱ्या ग्रंथाचे नाव कर्णइस्तकी किंवा करणहस्तुशे असे आहे. मुंकुंदराजाच्या विवेसिंधूप्रमाणे किंवा दासोपंतांच्या पासोडीप्रमाणे या ग्रंथाचा विषयही पंचीकरण हाच आहे.

सामाजिक विचार[संपादन]

शांतलिंगस्वामीचे वैशिष्ट्य असे की त्यांनी अध्यात्म चिंतनाबरोबरच समाजचिंतनही केले आहे. वीरशैव धर्माला साधना व समाजव्यवस्था यांतील विषमता अमान्य आहे. या विषमतेवर शांतलिंगांनी प्रखर टीका केली आहे. बाराव्या-तेराव्या शतकात या विषमताधिष्ठित विचारसरणीला झालेला विरोध सोळाव्या सतराव्या शतकातही कसा टिकून होता, हे शांतलिंगांच्या या कर्णहस्तकीतला विवेचनातही आढळते. वर्णाश्रम हा तर वैदिक धर्माचा पाया. तोच भ्रम किंवा अज्ञान कसे आहे, हे शांतलिंगस्वामी विस्ताराने सांगतात. हा एक भ्रम नसून भ्रमांचे, सहा प्रकार आहेत. त्यांचा उल्लेख स्वामी षडश्रम या संज्ञेने करतात. वर्णाश्रम अमान्य करून समतावाद प्रस्थपित करण्याचे महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान त्यांच्या या लेखनाला लाभले आहे.

षडश्रम-सहाभ्रम[संपादन]

हे सहाभ्रम कोणते ? १)कुळ २) गोत्र ३) चार आश्रम ४) वर्ण ५) जात आणि सर्वात महत्त्वाचा भ्रम म्हणजे (६)नामभ्रम’ परमेश्वर एकच शिव असताना परमेश्वर तत्त्व हे अनेक देवतात (ब्रम्हा, विष्णू, रुद्र इत्यादी) आहे असे गृहीत धरून व हे देवताश्रम मानून अनेक नावांनी त्याला संबोधणे याला स्वामी नामश्रम म्हणतात. अनेकदेवतावादही अमान्य करतात

आता सांगिजैल षडभ्रम जाती-वर्णाश्रम

कुळ-गोत्र-नाम । येणे नावे ।।

ब्राम्हण, क्षेत्री, वैश्य, शूद्र । पृथक देह-अहंकार ।

अहं उत्तम दुडविचार । तो जातिभ्रम ।

अठरा वर्ण-जाती । त्यामाजी माझा उत्तम स्थिती ।

हा अभिमान, अभिलाष असे चित्ती ।

तो वर्णाश्रम भ्रम ।।

ब्रम्हचारी, गृहस्थ । वानप्रस्थ, अवधूत ।

येकयेक विशेष म्हणत । तो आश्रमभ्रम्र ।।

पृथक आथिला अभिमान तो कुळीभ्रम ।

कश्यपात्रि, भारद्वाजमुनी ।

विश्वामित्र, गौतम, जमदग्नी,

वसिष्ठादि पृथक् जनी । तो गोत्रभ्रम ।

ब्रम्हा-विष्णू-रुद्र । हिरण्यगर्भादि देवताचक्र ।

हा सकळ विस्तार । तो नामभ्रम ।।

शिष्य परंपरा[संपादन]

कृष्णाप्पा हे शांतलिंगांचे शिष्य आणि जयरामस्वामी हे कृष्णाप्पांचे शिष्य, म्हणजेच शांतलिंगांचे प्रशिष्य होते. सातारा जिल्ह्यातील वडगाव या ठिकाणी जयरामस्वामींचा जो मठ आहे त्याला ‘जंगमाची गादी‘ असे नाव आहे. मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती शिवाजीराजे भोसल्यांच्या नितांत आदराचा विषय असलेले जयरामस्वामी हे '‘कृष्णदास जयराम‘' म्हणून मराठी संतमंडळात प्रसिद्ध आहेत. ते पंढरपुराच्या विठ्ठलाचे परमोपासक होते आणि त्यांच्या अंतःकरणात शिंगणापुराचा शंभुमहादेव आणि पंढरपुराचा पांडुरंग सदैव क्षेमालिंगन देत नांदत होते. पंढरपूर क्षेत्रात जयरामस्वामींचा मठ आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "दैनिक लोकसत्तेच्या संकेतस्थळावर डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या भाषणाचा उतारा". Archived from the original on 2016-03-09. 2011-04-09 रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेस दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ "महान्यूज संकेतस्थळावर डॉ.यू.म.पठाणांचा लेख[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Unknown parameter |X9iDrDxKYw6hUBe3VmL4HgB1QlFw= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेस दिनांक= ignored (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ दैनिक लोकसत्ता संकेतस्थळावर[permanent dead link] डॉ.रा.चिं.ढेरे यांचा लेख दिनांक ९ एप्रिल २०११ भाप्रवे सायं १० वाजता जसा दिसला
  4. ^ महान्यूज[मृत दुवा] संकेतस्थळावर डॉ.यू.म.पठाणांचा लेख दिनांक ९ एप्रिल २०११ भाप्रवे सायं १० वाजता जसा दिसला