सोयाबीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोयबीन या पानावरून पुनर्निर्देशित)
सोयाबीनच्या शेंगा

सोयाबीन (शास्त्रीय नाव: Glycine max, ग्लिसाइन मॅक्स; इंग्रजी: soya bean"Miracle bean";) ही मुळातील पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे. सोयाबीनमध्ये ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठया प्रमाणात असते म्हणूनच शास्त्रीय नाव ग्लासीन मॅक्स असे आहे. कडधान्य असले तरी सोयाबीनपासून मिळणाऱ्या तेलामुळे त्यांना ढोबळ अर्थाने तेलबियांमध्येही गणले जाते.

सिंगापूर-हाँगकाँगसकट आशियातल्या बहुतेक सर्व देशांमध्ये रोजच्या आहारात सोयाबीनचा उपयोग केला जातो.

सोयाबीन हे भारतातील इतर तेलबिया व नगदी पिकाप्रमाणे महत्त्वाचे नगदी पीक आहे.

जगामध्ये ६०% सोयाबीन अमेरिकेत उत्पन्न होते तर भारतात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्य प्रदेशात होते. मध्य प्रदेशातील इंदूर या गावी सोयाबीन रिसर्च सेंटर आहे.

उपयोग[संपादन]

सोयाबीनचे दूध तयार करून पर्यायी निर्भेळ दूध तयार केले जाते. कडवटपणा काढून टाकलेल्या सोयाबीनची कणीक वापरून पोळ्या, ब्रेड बिस्किटे, नानकटाई, केक करता येतात. डाळीचे पदार्थ म्हणजे शेव, चकली, मिसळ बनवता येते.पनीरला पर्याय म्हणून बऱ्याचदा वापरले जाणारे टोफू म्हणजेही सोया पनीरच. सोयाबीन खाद्यतेल करण्यासाठी तेलगिरण्यांना पुरवले जाते, तर पक्के सोयाबीन बियाणे म्हणून वापरले जाते. तेलगिरण्यांमध्ये तेल व पेंड ही दोन उत्पादने मिळतात. सोयाबीनचे तेल आहारात स्वस्त खाद्यतेल म्हणून वापरले जाते. तर पेंडीचा उपयोग कोंबड्य़ांचे खाद्य म्हणून केला जातो. काही पेंड निर्यातही होते. खाद्य अन्नपदार्थ असण्याबरोबर सोयाबीनच्या बियांचा उपयोग बायोडीझेल बनवण्यासाठी ही होतो. भारतातले बहुतांशी सामान्य लोक नेहमीच्या आहारत सोयाबीन तेलाचा वापर करतात. सोया सॉस हा तर एक अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे जो फ्रॅंकीपासून पिझ्झ्यापर्यंत कशातही सर्रास वापरला जातो.सोया नगेट्स,सोया चंक्स,सोयाबीनची भाजी,सोया टिक्की,सोया कबाब/कटलेट इ.चविष्ट पाककृती लोकप्रिय आहेत.

लागवडीपूर्वीची बीज प्रक्रिया[संपादन]

सोयाबीनची लागवड करतांना तापमान आणि सूर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा लागतो. सोयाबीन हे शॉर्ट डे (म्हणजेच दिवसांत कमी तास सूर्यप्रकाश राहणे) पीक आहे. जसा जसा दिवसांतील सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी कमी होत जाईल तसतशी सोयाबीनची फूलधारणा होत राहते. सोयाबीनची लागवड ४.५ ते ८.५ च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत केली तरी चालते. ज्या जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साचून राहत असेल, त्या जमिनीत सोयाबीनची लागवड करू नये, असे सांगितले जाते..

  • सोयाबीनच्या लागवडीपूर्वी रायझोबियम आणि सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाची बीज प्रक्रिया करावी लागते.
  • सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम हा सहजीवी नत्र स्थिर करणारा बॅक्टेरिया (जीवाणू) गाठी करून राहत असतो.
  • हा बॅक्टेरिया हवेतील मुक्त स्वरूपातील नत्र, सोयाबीन पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरूपात रूपांतरित करीत असतो.
  • रायझोबियमच्या वापराने सोयाबीनची चांगली वाढ होते. फांद्यांची संख्या वाढते, तसेच जास्त प्रमाणात प्रोटिन्स तयार होऊन दाण्यांचे वजनदेखील वाढते.
  • सोयाबीनपासून २० टक्के इतके तेल मिळते. हे तेल तयार होण्यात सल्फर (गंधक) फार महत्त्वाची भूमिका बजावीत असते.

लागवड[संपादन]

सोयाबीनची लागवड जून ते जुलै महिन्यात केली जाते. लागवड करतांना पावसाचा अंदाज घेऊन लागवड करतात. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पिकासाठी हानिकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सून व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करणे श्रेयस्कर.

  • सोयाबीनची पेरणी करतांना १ एकरात १,७७,७७७ रोप बसतील अशा पद्धतीने पेरणी करतात.
  • पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. आणि दोन रोपांत १० .सें.मी. राहील असे करावे. एका ठिकाणी २ किंवा ३ बिया टोचता येतात.
  • पेरणी करतांना जमिनीत फार खोलवर पेरणी करत नाहीत. त्यामुळे सोयाबीनची हवी तशी वाढ मिळत नाही.
  • एक एकरात पेरणीसाठी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे असते.

कीड रोखण्यासाठी उपाय[संपादन]

शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा करणे - किडीच्या अळ्या, पिले व पूर्ण वाढ झालेले कीटक हे पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य असते. शेतात ठरावीक अंतरावर अंदाजे हेक्टरी १०० ठिकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी १०-१५ फूट उंचीच्या जागा केल्यास किडींचे परिणामकारकरीत्या नियंत्रण होते व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.

प्रकाश सापळा वापरणे - रात्रीच्या वेळी शेतात २०० वॅटचा दिवा लावून त्याखाली रॉकेलमिश्रित पाण्याचे घमेले ठेवल्यास रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारे कीटक मरतात. मेलेल्या कीटकांमध्ये हानिकारक कीटकांच्या संख्येवरून त्यांच्या प्रादुर्भावाचे भाकित करता येते व वेळीच उपाययोजना करता येते.

कामगंध सापळा वापरणे - सोयाबीन पिकावरील लष्करी अळी व शेंगा पोखरणारी अळी या किडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्याकडे वरील किडींचे नरपतंग आकर्षित होतात व ते नष्ट करता येतात. किडींच्या जीवनक्रमात यामुळे असमतोल निर्माण झाल्याने कीड आटोक्यात येते. या सापळ्यांचा उपयोग किडींच्या प्रादुर्भावाचे भाकित करण्यासाठी देखील होतो.

रोगमुक्त बियाणांचा वापर - पेरणीसाठी रोगमुक्त शेतात अगर उत्तम रीतीने रोग नियंत्रण केलेल्या शेतात तयार झालेले बियाणे वापरणे उत्तम.

कीड व रोगप्रतिकारक जातींचा वापर - कीड व रोगप्रतिकारक जातींचे बियाणे पेरणीसाठी वापरणे हा बचतीचा व सर्वांत परिणामकारक उपाय आहे. परंतु जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आहेत, याची खात्री करून मगच पेराव्या अशी अपेक्षा असते.

परोपजीवी कीटक- यामध्ये परोपजीवी बुरशी, परोपजीवी कीटक व जिवाणू यांच्या वापराचा समावेश होतो. सोयाबीनच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी टड्ढायकोग्रामा हे अंड्यावरील परोपजीवी कीटक व घातक लस, पाने खाणाऱ्या अळ्यांवर बॅसिलस थुरीजिएन्सिस व बॅव्हेरिया बॅसिआना या जिवाणूंसाठीची कीटकनाशके बाजारात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे शक्य झाले आहे.

कीटकनाशकांचा वापर[संपादन]

  1. खोडमाशीच्या नियंत्रणासाठी १० टक्के दाणेदार फोरेट प्रति हेक्टरी १० किलो या प्रमाणात पेरणीपूर्वी जमिनीत मिसळतात. थोयोमेथोक्झाम या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रियादेखील परिणामकारक आढळून आली आहे.
  2. पाने खाणाऱ्या, पाने पोखरणाऱ्या व गुंडाळणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ लिटर किंवा क्लोरोपायरिफॉस २० ई.सी. १.५ लिटर किंवा इथोफेनप्रॉक्स १० ई.सी. १ लिटर किंवा टड्ढायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली किंवा एन्डोसल्फान ३५ ई.सी. १.५ लिटर किंवा इथिऑन ५० ई.सी. १.५ लिटर किंवा मेथोमिल ४० एस.पी. एल किलो या कीटकनाशकांची आलटूनपालटून फवारणी करतात. वरील कीटकनाशकांच्या भुकटीचादेखील हेक्टरी २०-२५ किलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करतात..

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]