सुधा वर्दे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुधाताई वर्दे, माहेरच्या अनुताई कोतवाल, (जन्म : १९३२; - मुंबई, ९ एप्रिल, २०१४) या महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीतील एक कार्यकर्त्या होत्या. त्या राष्ट्रसेवादलाच्या माजी अध्यक्षा होत्या. त्यांचे पती प्रा. सदानंद वर्देे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते. ओडिसी नर्तिका झेलम परांजपे या सुधाताईंच्या कन्या.

सुधाताईंना नृत्यकलेची जाण होती. त्यामुळे जेव्हा सेवादलाचे कलापथक सुरू झाले, तेव्हा सुधाताईना त्यात आवडीचे क्षेत्र गवसले. राष्ट्रसेवादलाचे महाराष्ट्रदर्शन, भारत दर्शन, गल्ली ते दिल्ली, बिनबियांचे झाड या कार्यक्रमाचे शेकडो प्रयोग करताना सुधाताईंनी गावोगाव प्रवास केला. सेवादलाच्या पथकात असताना त्यांना वसंत बापट, लीलाधर हेगडे यांच्याबरोबर काम करावयाची संधी मिळाली.

सुधाताई वर्दे यांनी भारतातील समाजवादी चळवळीचा उदय, तिची भरभरभराट आणि सध्याची मरणप्राय अवस्थाही अनुभवली. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात प्रा. सदानंद वर्दे यांना, आणि नंतर आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केल्याच्या आरोपाखाली सुधाताईंना आणि झेलमलासुद्धा अटक झाली. तुरुंगात सुधाताई आणि मुलगी झेलम या एकत्र राहिल्या. या सगळ्या अनुभवांचे वर्णन सुधाताईंनी आपल्या ’गोष्ट झऱ्याची’ या आत्मचरित्रात केले आहे.