सुचेता भिडे चापेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुचेता चापेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
सुचेता चापेकर
टोपणनावे सुचेता भिडे
आयुष्य
जन्म ६ डिसेंबर १९४८
संगीत साधना
घराणे तंजावूर
संगीत कारकीर्द
कार्य भरतनाट्यम
पेशा नर्तिका, नृत्य दिग्दर्शक, व्यवसायिक
कार्य संस्था कलावर्धिनी
विशेष कार्य कलावर्धिनी संस्थापक
गौरव
गौरव महाराष्ट्र गौरव पुरस्कार
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार - २००७
बाह्य दुवे
संकेतस्थळ

सुचेता भिडे चापेकर (जन्म : ६ डिसेंबर १९४८) या एक मराठी शास्त्रीय नर्तकी, नृत्य दिग्दर्शिका आहेत. त्या भरतनाट्यम या नृत्य प्रकारात निपुण आहेत.[१]भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. गुरू, वाग्येकार आणि संरचनाकार असलेल्या सुचेता चापेकरांना संगीत नाटक अकादमीने २००७ साली पुरस्कार देऊन गौरविले आहे.

बालपण[संपादन]

भिडे यांचे बालपण मुंबई येथे गेले. मुलीची नृत्यातली गती आणि आवड बघून स्वतः चित्रकार असलेल्या वडिलांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.गुरू पार्वतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे आरंगेत्रम १९६३ साली वयाच्या १५व्या वर्षी झाले. पार्वतीकुमारांच्या नृत्य कार्यक्रमातून त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्याचप्रमाणे गुरूंच्या भरतनाट्यम नृत्यातील तंजावर येथील मराठी राजांच्या योगादानाविषयीच्या अभ्यासातही सुचेताताई त्यांच्या साहाय्यक होत्या. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून पदवी संपादन करत असतानाच देशभर विविध ठिकाणी त्यांचे नृत्याचे कार्यक्रम होत होते. मद्रास म्युझिक अकादमी येथील त्यांच्या कार्यक्रमाला विशेष पसंती मिळाली.त्यानंतर त्यांना गुरू के.पी.किट्टप्पा यांच्याकडून भरतनाट्यम नृत्यातील प्राचीन रचना आणि कर्नाटक संगीताचे मार्गदर्शन मिळाले.

नृत्यविषयक कामगिरी[संपादन]

लग्नानंतर पुण्यात स्थाईक झालेल्या सुचेताताईंनी १९८२ साली पहिला विदेश दौरा केला. लंडन,पॅरीस,रोटरडॅम येथील त्यांच्या नृत्य प्रस्तुतीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ऐशीच्या दशकात महाराष्ट्रासह उत्तर भारतात त्यांनीअनेक कार्यक्रम केले. त्यादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की केवळ भाषेच्या अडचणीमुळे भरतनाट्यमसारख्या सुंदर कलेचा आस्वाद उत्तर भारतीय रसिक घेऊ शकत नाहीत. त्यातूनच मग नृत्यगंगा या अनुपम नृत्यशैलीचा जन्म झाला. १९८२ साली याचा पहिला प्रयोग मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परर्फॉमिंग आर्ट्स येथे झाला.[२] भरतनाट्यमचे मूळ सौंदर्य कायम राखत हिंदुस्तानी संगीतात हिंदी मराठी रचना त्यांनी सादर केल्या आणि या त्यांच्या प्रयोगाला समीक्षकांसह रसिकांचीही भरघोस दाद मिळाली.या त्यांच्या अभिनव प्रयोगासाठी त्यांनी तंजावूरच्या मराठी राजांच्या रचनांचा सखोल अभ्यास केला आणि पीएच.डी. मिळवली. शहाजीराजे,सरफोजीराजे यांच्या अनेक मराठी,हिंदी आणि संस्कृत रचनांच्या सादरीकरणातून त्यांनी नृत्यकलेत भर घातली आहे.गेली तीस वर्षाहून अधिक काळ नृत्यगंगा प्रवाही राहिली आहे आणि त्यात शंभराहून अधिक रचना सादर केल्या जातात. नृत्यगंगा शैलीद्वारे अभिजात नृत्यात मोलाचे योगदान,नर्तनातील शुद्धता,सौष्ठव,सात्त्विक अभिनय आणि मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतून संवाद साधण्याची हातोटी ही त्यांच्या सादरीकरणाची वैशिष्टे आहेत. प्रभावी वक्तृत्व ,चिंतन आणि उत्तम लेखन यांची कलानिर्मितीस जोड असल्याने चार दशकाहून अधिक काळ त्या कार्यरत आहेत. प्रतिष्ठित अशा सर्व नृत्य महोत्सवांमधून त्यांच्या नृत्याला ज्ञात्यांकडून आणि रसिकांकडून प्रशंसा मिळाली आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात तीन वेळा नृत्य करण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे. एक अधिकारी कलाकार,संशोधक वृत्तीच्या अभ्यासक आणि भाष्यकार म्हणून त्या कीर्तिमान आहेत. आनंदासाठी कला,कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला हे ब्रीद घेऊन त्यांनी१९८८ मध्ये समविचारी लोकांच्या बरोबर ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट ’ या कलेच्या प्रसार प्रचार करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून अनेक नृत्य कलाकार,रचनाकार आणि अध्यापक यांची जडणघडण त्यांनी केली आहे. पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच त्यांनी अनेक शिष्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे.नृत्याचे विविध कार्यक्रम अभिनव संकल्पना घेऊन सादर करणे ही त्यांची विशेषता.

कलानिर्मिती[संपादन]

नाट्यपदांवर आधारित- नाट्यरंग डॉ.प्रभा अत्रे यांच्या रचनांचा नृत्यप्रभा संपूर्ण संस्कृत भाषेतील रचनांचा – नृत्यार्णव संत मीराबाईंचे समग्र काव्य असलेला- मीराके प्रभू पं.नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया वर आधारित- नृत्यनाट्य

पुरस्कार आणि मानसन्मान[संपादन]

राज्यसरकार – महाराष्ट्र गौरव पुरस्कार सूरसिंगारसंसद,मुंबई- नृत्यविलास उपाधी राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी,नवी दिल्ली – भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानासाठीचा सर्वोच्च सन्मान

सुचेता चापेकरांवरील पुस्तके[संपादन]

  • नृत्यात्मिका (लेखिका : सुचेता भिडे –चापेकर)

पुरस्कार[संपादन]

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००७)
  • पुणे महापालिकेने रोहिणी भाटे यांच्या नावाने दिला गेलेला २०१५ सालचा ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार’.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://indianexpress.com/article/cities/pune/blueeyed-girl-6/
  2. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २३३. ISBN 978-81-7425-310-1.