सुंदरबन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुंदरवन या पानावरून पुनर्निर्देशित)
सुंदरबन : उपग्रह चित्र
सुंदरबन : उपग्रह चित्र, भारत आणि बांग्लादेश

पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश यांदरम्यान गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस पसरलेले हे जगातले सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. साधारण दहा कोटी वर्षांपूर्वी सदाहरित जंगलातील स्पर्धात्मक वातावरणापासून फारकत घेऊन काही वनस्पती नद्यांच्या मुखाशी वसलेल्या भरती-ओहोटीच्या प्रदेशात राहू लागल्या. अनुकूलनातून त्यांनी स्वतमध्ये काही बदल घडवून आणले व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहण्याचे कसब बाणवले. काळाच्या ओघात साधारण ७० जातींच्या वनस्पतींनी अशा प्रकारे निराळे जीवन सुरू केले. समुद्राच्या क्षारतेसमोर टिकाव धरण्याची क्षमता असल्यामुळे या वनस्पतींना मराठीतखारफुटी’ म्हणतात.

नर्मदातापी सोडल्यास, भारतातील बहुतेक मोठ्या नद्या पूर्ववाहिनी असल्यामुळे, भारतात खारफुटी वनस्पती पूर्व किनाऱ्यावर जास्त प्रमाणात आढळतात. भारताची पूर्व किनारपट्टी रुंद असून ती सौम्य उताराने समुद्रात बुडते. यामुळे भरती-ओहोटीचे विस्तृत क्षेत्र मिळते व याच क्षेत्रात खारफुटी वनस्पती चांगल्या वाढतात.भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांग्लादेश मिळून गंगा-ब्रम्हपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

सुंदरबनातील प्राणी[संपादन]

खारफुटींच्या जंगलांमध्ये विविध प्राणी आढळतात. कीटकांपासून वाघापर्यंत व छोटय़ा शिंपल्यापासून मगरीपर्यंत जैववैविध्य येथे सापडते. जितके खारफुटीचे वन विस्तृत असते, तेवढे जैववैविध्य जास्त आढळते. भारत व बांगलादेशात संयुक्तपणे वाढणारे सुंदरबन हे म्हणूनच जगातील सर्वात मोठे व सर्वात वैविध्यपूर्ण खारफुटीचे वन आहे. सुंदरबनाचे वैशिष्ष्ट्य म्हणजे येथे वाघांचे अस्तित्व आहे. एवढेच नव्हे, तर येथील वाघ केवळ जमिनीवरील भक्ष्यांवर अवलंबून न राहता मासेमारी करूनदेखील आपली उपजीविका करतो.

सुंदरबनच्या खाडीतील सुसर हा खारफुटीतील वनात सापडणारा सर्वात मोठा प्राणी आहे. मोठ्या प्राण्यांप्रमाणेच असंख्य लहान प्राणी या वनात सापडतात. विविध जातींची फुलपाखरे, कीटक, मधमाश्यादेखील सापडतात. खारफुटीमधील ‘काजळा’ (River Mangrove) या वनस्पतीच्या फुलापासून उत्तम प्रकारचा मध मिळतो. या मधाला इतकी जास्त मागणी असते, की सुंदरबनात वाघाचा धोका पत्करून ‘माधोक’ म्हणून ओळखले जाणारे मध गोळा करणारे लोक जीवावर उदार होऊन हा मध गोळा करतात. सामान्य मधाच्या दुप्पट ते तिप्पट किमतीला हा मध विकला जातो.

खारफुटीचे धार्मिक महत्त्व[संपादन]

सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता खारफुटीच्या जंगलाची देवता समजली जाते व हिंदू-मुस्लिम तिला सारखेच पूजतात.

भारतात चेन्नईजवळ चिदंबरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात.

ठाणे जिल्ह्यातील काही गावी खारफुटीचे संरक्षण करणारी एक गाव समिती असते, या समितीमार्फत मर्यादित प्रमाणात खारफुटीचे लाकूड गोळा करता येते. पण कोणीही जर मर्यादेपेक्षा जास्त लाकडे तोडली तर समिती निवाडा करून मर्यादाभंग करणाऱ्याला शिक्षा देते. शिक्षेनुसार त्या व्यक्तीला रात्रभर खारफुटीच्या झाडाला बांधून ठेवायची तरतूद आहे.[१] इतकी कडक शिक्षा ठेवल्यामुळे कोणीही या वनस्पतीचा दुरुपयोग करीत नाही व या वनस्पतीचे संवर्धनही योग्य रीतीने होते.

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ विवेक कुलकर्णी (४ जून २०१७). "खारफुटीची जंगले". लोकसत्ता. ६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.