साहित्याचे प्रयोजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या मते, कलावंत कशासाठी कला निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतूने तिचा आस्वाद घेतो, स्वीकार करतो या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रयोजनविचार महत्त्वाचा आहे. कलानिर्मिती ही व्यावहारिक गोष्ट नाही, त्यामुळे तिच्या निर्मितीचे प्रयोजन ही गोष्ट गुंतागुंतीची आहे. त्यामुळे प्रयोजनाचा विचार कलानिर्मितीमधील महत्त्वाचा विचार आहे.१

साहित्याच्या प्रयोजनाचा विचार प्राचीन आणि आधुनिक साहित्यशास्त्रात सातत्याने चर्चिला गेला आहे. प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश होय. कवी वा लेखक कोण्या हेतूने उद्देशाने लिहितो, व वाचक कोणत्या हेतूने वाचतो हा निर्मितिप्रक्रियेतील व आस्वादप्रक्रियेतील महत्त्वाचा प्रश्न असून भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही मीमांसकांनी या प्रयोजनांचा विचार केला आहे.

भारतीय साहित्यशास्त्रातील दृष्टीकोण[संपादन]

भारतीय साहित्यशास्त्रात मम्मटाने १. यश, २. अर्थप्राप्ती, ३. व्यवहारज्ञान, ४. अशुभनिवारण, ५. कान्तासंमित उपदेश, ६. उच्च आनंद ही प्रयोजने सांगितली आहेत.

१. यश- यश याचा अर्थ कीर्ती असून लेखनामुळे लेखकाला कीर्ती मिळते असे हे प्रयोजन मानते. मात्र लेखक कीर्तीसाठी लिहितो असे म्हणणे कठीण आहे असा या प्रयोजनावर आक्षेप आहे. २. अर्थप्राप्ती- याचा अर्थ पैसा असू लेखक पैशासाठी लिहितो, असे हे प्रयोजन मानते; मात्र केवळ याचसाठी लेखक लिहितो असेही म्हणणे कठीण आहे. ३. व्यवहारज्ञान- याचा अर्थ जीवनाचे भान होय. लेखनामुळे वाचकाला नव्या जाणिवा, अनुभव प्राप्त होतात. ललित साहित्याने हे उद्बोधन होते, त्यासाठी लेखक लिहितो व वाचक वाचतो, असे हे प्रयोजन मानते. मात्र जरी जीवनातील सत्याची जाणीव झाली किंवा जिज्ञासापूर्ती झाली तरी हे काही ललित कृतीचे प्रयोजन नव्हे. तो फार तर त्याचा परिणाम मानता येईल, असे आक्षेपकांचे मत आहे. ४. अशुभनिवारण- याचा अर्थ लेखनामुळे लेखकाचे अशुभ निवारण होणे होय. प्राचीन साहित्यात पदे, आरत्या, क्वचित स्तोत्र यासाठी लिहिली गेली आहेत. देवाची स्तुती केल्याने शंकर रावणावर प्रसन्न झाल्याचे उदाहरण पुराणात आहे. मात्र आधुनिक लेखनाचे हे प्रयोजन मानता येत नाही. ५. कान्तासंमित उपदेश- मम्मटाच्या मते, वेदशास्त्रातील उपदेश प्रभूसंमित असतो, इतिहासपुराणातील उपदेश सुहृतसंमित असतो, तर काव्यातील कांतासंमित- म्हणजे प्रेमळ पत्नीने मधुर शब्दांनी केलेला उपदेश असतो. ‘मनुष्याच्या अंतःकरणाला कोमल स्पर्श करून भावनात्मक आवाहन करणे’ हे कान्तासंमित उपदेशाचे स्वरूप स. रा. गाडगीळांनी सांगितले आहे.१ मात्र हे देखील फलस्वरूपच आहे, कारण लेखक या हेतूने लिहितो असे मानता येत नाही. ६ उच्च आनंद- याचा अर्थ व्यावहारिक आनंदापलीकडील उच्चतर आनंद होय. यालाच आध्यात्मिक आनंद म्हणता येईल. पूर्वी काव्याची प्रेरणाच आध्यात्मिक असल्यामुळे हे प्रयोजन मानल्या जात..

या शिवाय डॉ. स. रा. गाडगीळ यांनी काव्यशास्त्रप्रदीप ग्रंथात आधुनिक १.काव्यनिर्मितीची प्रेरणा ,२.समाजजीवनाला गती देणे ,३.काव्य म्हणजे जीवनभाष्य,४.कला आणि नीती, ५. पलायनवाद आणि वासनातृप्ती, ६. जिज्ञासापूर्ती आणि उद्बोधन ७.आत्माविष्कार आणि शुद्ध आनंद, ८.परतत्त्वस्पर्श ही साहित्यप्रयोजने सांगितली आहेत.

१. काव्यनिर्मितीची प्रेरणा –

मानवाने नवनिर्मितीच्या प्रेरणेतून धर्म, तत्त्वज्ञान शास्त्र यांप्रमाणेच कलेची निर्मिती केली आहे. वास्तवाच्या अभावातून अस्वस्थ झालेला लेखक प्रतिभेने एक अलौकिक सृष्टी निर्माण करतो तिच्या मुळाशी ही निर्मितीची प्रेरणा असते, असे हे प्रयोजन मानणारे सांगतात.

२. समाजजीवनाला गती देणे –

साहित्यामध्ये जीवनाचे चित्रण करून समाजजीवनाला गती देणे हे साहित्याचे प्रयोजन असून मराठीतील जीवनवादी लेखक या विचारधारेचे आहेत. कलावंत समाजाचाच भाग आहे, समाजाच्या अंतरंगातील संघर्ष चित्रित करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे, असे वाङमयच पुरोगामी ठरते, असे ही विचारधारा मानते. कलावादी लेखक यालाच बोधवादी किंवा प्रचारकी साहित्य मानतात. या भूमिकेतून हिरीरीने लिहिणे हे एक साहित्य प्रयोजन होय.
डॉ. देवानंद सोनटक्के म्हणतात, आक्षेपकांच्या मते, हे काही साहित्याच्या निर्मितीचे प्रयोजन नव्हे, साहित्याची निर्मिती ही तात्कालिक राजकीय वा सामाजिक गरजा भागविण्यासाठी होत नाही. हे साहित्याचे साक्षात कार्य नव्हे. imaginative creation – कल्पनानिर्मित प्रतिमासृष्टी हेच साहित्याचे कार्य असून ते प्रचारकी साहित्याशी सुसंगत नाही.

३. काव्य म्हणजे जीवनभाष्य

literature is the criticism of life असे मॅथ्यू अर्नोल्डचे म्हणणे आहे. डी. एच. लॉरेन्स, टॉलस्टॉय हेही याच मताचे पुरस्कर्ते होते. साहित्य म्हणजे जीवनभाष्य होय. कवीच्या मनातील आदर्श काव्यसृष्टी प्रस्थापित जीवनावर भाष्य करते. उदा. तुकोबांचे प्रबोधनपर अभंग तत्कालीन धर्म, समाज व्यस्थेवरील भाष्य होते किंवा मर्ढेकरांचे काव्य तत्कालीन यंत्रयुगावरील भाष्य होते. म्हणून, असे जीवनभाष्य करणे हे देखील काव्यप्रयोजन असू शकते.

४. कला आणि नीती

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मते, नीती ही सामाजिक घटना असून समाजाच्या सुव्यवस्थेसाठी समाजाकडून निर्माण केलेली ती एक मूल्यव्यवस्था असते. काव्याच्या किंवा साहित्याच्या बंधनरहित, स्वैर संचारामुळे समाजजीवनातही स्वैराचार निर्माण होईल. काव्याने, साहित्याने सामाजिक बंधने पाळली पाहिजेत असे नीतीवाद्यांचे म्हणणे आहे.
कलाकृतीतून मानवी मनावर बरे वा वाईट परिणाम घडवता येतात म्हणून कलावंताने सामाजिक जबाबदारीने आविष्कार करावा असे नीतिवाद्यांचे म्हणणे आहे, तर कला, नीती बोध यांच्या पलीकडे असल्याने नीतीचा विचार करण्याची गरज नाही असे कलावाद्यांचे म्हणणे आहे. तात्पर्य नीतिवादी किंवा कलावादी- यापैकी एक प्रयोजन ठेवून लेखक लिहित असतो.

१. पलायनवाद आणि वासनातृप्ती

जीवनात दुखी आणि निराश झालेल्यांना आपल्या कल्पनेच्या पंखावर आरूढ त्यांना उच्च आणि अननुभूत आनंद देणे हे कलेचे प्रयोजन शोपन हॉवर, ना. सी. फडके यांनी मानले आहे. हाच पलायनवाद होय.
देवानंद सोनटक्के यांच्या मते, प्रत्यक्ष जीवनात ज्या वासना म्हणजे इच्छांची तृप्ती होऊ शकत नाही त्यांची पूर्ती काल्पनिक कलेच्या जगात करून घेणे ही वासनातृप्ती कलावंताचे प्रयोजन असते. कवी ग्रेस यांच्या लौकिक जीवनात न लाभलेल्या प्रेयसी व मातृप्रेमाच्या अभावाची पूर्ती म्हणजे त्यांची काव्यनिर्मिती होती. मराठीतील अनेक रोमँटिक कवींच्या कविता या वासनापूर्तीच्या प्रयोजनाने निर्माण झाल्या आहेत.

२. जिज्ञासापूर्ती आणि उद्बोधन

अनेक गोष्टी मानव केवळ जिज्ञासेपोटी करत असतो. विश्वाचे आकलन करून घेण्याची जिज्ञासा आणि जग बदलण्याची प्रेरणा म्हणजे नवनिर्मिती. या दोन्ही प्रेरणा काव्यप्रयोजन होय. केशवसुतांची कविता हे या प्रयोजनाचे उत्तम उदाहरण होय.
उद्बोधन म्हणजे केवळ बोध नसून जीवनाच्या विविध अंगांचे दर्शन घडविणे होय. या प्रेरणेमुळेच मानवी मनाच्या व सांस्कृतिक समृद्धीसाठी लेखक धडपडतो आणि साहित्य वा कला मानवी संस्कृतीचा वारसा ठरते. त्यामुळे उद्बोधन हे प्रयोजन नगण्य मानता येत नाही.

३. शुद्ध आनंद आणि आत्माविष्कार

साहित्य वाचनाने होणाऱ्या जिज्ञासातृप्तीने आणि उद्बोधनाने वाचकाच्या ठिकाणी जी वृत्ती तयार होते तिलाच शुद्ध आनंद म्हटल्या जाते. हा आनंदच काव्यानंद असून तो स्थल-काल निरपेक्ष असतो. त्यासाठी रसिकसापेक्ष कल्पनाशक्तीची गरज मात्र असते.
आपल्याला आलेली अनुभूती प्रतिभान्वित करणे आणि तिला अपूर्व नव्या अशा स्वरूपात प्रकट करणे हे कवीचे कार्य असून त्यामुळे रसिकाच्या ठिकाणी आस्वादाच्या पातळीवर काव्यानंदाची स्थिती निर्माण करणे हेच काव्याचे प्रयोजन मानले जाते. तत्त्ववेत्ता कान्ट यालाच DIS-INTERESTED JOY असे म्हणतो, तर अभिनवगुप्ताने याच प्रतीतीला विश्रांतिकारिणी असे नाव दिले आहे.
कवी-लेखकाच्या अंतःकरणाला प्रतीत झालेल्या सत्याचा किंवा अनुभवाचा कल्पनारम्य आविष्कार करण्याचा हेतू असणे म्हणजे आत्माविष्कार होय. हा आविष्कार माणसाच्या सर्जनशील प्रवृत्तीतूनच होतो. आपल्या प्रतीभानिर्मित सृष्टीत कवी जीवनातील अनुभवांना नवनवे आकार देण्याची क्रीडा करीत असतो.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवविश्वातून काही उत्कट व भावलेले अनुभव प्रतिभाशक्तीने अंकित करून प्रकट करणे हेच लेखकाच्या आत्माविष्काराचे प्रयोजन असते.

४. परतत्त्वस्पर्श

हे काव्याचे अलौकिक प्रयोजन होय. काव्याचे लौकिक प्रयोजन काहीही असले तरी अलौकिक प्रयोजन आत्मज्ञान व मोक्षप्राप्ती होय असे काहीजण मानतात. ज्ञानदेव-रामदासादी संतकवींचे हेच प्रयोजन होते.
All true Art Is thus the expression of soul – अशी कलेची व्याख्याच गांधीनी केली होती. या सर्वांच्या विचारांचे सार असे की, विश्वाच्या मुळाशी एक निराकार, निर्गुण चैतन्य आहे. त्याचा सगुण, साकार आविष्कार म्हणजे साहित्य होय. त्यामुळे परतत्त्व हे देखील एक काव्यप्रयोजन आहे.
प्रा. अ. वा. कुलकर्णी यांनी याशिवाय काही प्रयोजने सांगितली आहेत.

१. मनोरंजन २. विरेचन ३. अनुभवसमृद्धी ४. स्व-रूपनिष्ठा १. मनोरंजन रंजन ही मानवी मनाची प्रवृत्ती आणि गरज आहे. या मानसिक गरजेतूनच गोष्टी सांगणे आणि ऐकणे यांचा जन्म झाला म्हणून हेच प्रयोजन ठेवून कथनात्म साहित्य निर्माण केले जाते असे काही अभ्यासकांना वाटते. अर्थात साहित्यात उच्च वाङमयीन अभिरुचीचे मनोरंजन अभिप्रेत असते. २. विरेचन विरेचन म्हणजे कॅथार्सिस. ही ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल मांडलेली संकल्पना आहे. त्याच्या मते, शोकांतिकेच्या दर्शनामुळे त्याच्या दया आणि करुणा या भावनांचे विरेचन होऊन मनुष्याचि चित्तवृत्ती आल्हाददायक होते. म्हणून विरेचन हेच साहित्यकृतीचे प्रयोजन ठरते असे काहींना वाटते. हे लेखक आणि रसिकसापेक्ष प्रयोजन आहे. ३. अनुभवसमृद्धी हे वाचकसापेक्ष व लेखकसापेक्ष प्रयोजन आहे. कलाकृती हा लेखकाच्या आत्मशोधाचा एक मार्ग असतो, या शोधातूनच त्याला अनुभवाची समृद्धी प्राप्त होत असते व असे साहित्य वाचून वाचकालाही ही समृद्धी प्राप्त करून देते. या समृद्धीसाठीच लेखन आणि वाचन केले जाते. ४. स्व-रूपनिष्ठा साहित्यकृती ही एक भाषिक संघटना असते. अनुभवाचे हे रूप म्हणजे लेखकाला गवसलेल्या अनुभव- बीजाचा विस्तार असतो. लेखकाने त्या बीजानुभवाशी प्रामाणिक राहून त्याचा विस्तार आणि आविष्कार करणे हे एक लेखन प्रयोजन मानले गेले आहे. मर्ढेकरांनी यालाच वाङमयीन आत्मनिष्ठा म्हटले आहे. भालचंद्र नेमाडे यांनी यालाच लेखकाची नैतिकता मानले आहे.

अशाप्रकारे डॉ. सोनटक्के यांनी भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्य प्रयोजनांचा विचार व विश्लेषण केले आहे. 

१. डॉ.. देवानंद सोनटक्के यांनी दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे सादर केलेला शोधनिबंध

विकिक्वोट
विकिक्वोट
साहित्याचे प्रयोजन हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ ग्रंथ[संपादन]

१. काव्यशास्त्र प्रदीप, स. रा. गाडगीळ, विजया प्रकाशन, नांदेड, १९८७

२. साहित्यविचार, अ. वा. कुळकर्णी, प्रतिमा प्रकाशन, पुणे, दु. आ. १९९७

३. भारतीय साहित्यशास्त्र, ग. त्र्यं. देशपांडे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, दु.आ.१९६३

४. रसचर्चा, पद्माकर दादेगावकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

संदर्भ लेख :

१. मी का लिहिते?, कुसुमावती देशपांडे, पासंग , मौज प्रकाशन, मुंबई, १९८७


हे सुद्धा पहा[संपादन]