सदाशिव पांडुरंग केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सदाशिव पांडुरंग केळकर (१८४८:चाकण, महाराष्ट्र - २० डिसेंबर, १९०६) हे एक मराठी निबंधकार, पत्रकार आणि नियतकालिकांचे संपादक-लेखक होते. आई लहानपणीच वारल्यामुळे त्यांचे संगोपन पुण्यात राहणाऱ्या मावशीने केले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर ते एका कापड गिरणीत लागले आणि त्याकाळी जे काम फक्त युरोपियन लोकांना जमत असेे वीव्हिंग मास्टरचे काम, त्यांच्याइतक्याच कुशलतेने करू लागले. जरी काही वर्षांनी स.पां केळकरांनी गिरणीतील नोकरी सोडली, तरी त्यांना कामगारांबद्दल वाटणारा जिव्हाळा कमी झाला नाही. कामगारांसाठी त्यांनी ’कामगार’, हितोपदेश कामगार’ यांसारखी साप्ताहिके चालवली. ज्ञानदीप नावाच्या मासिकाचे ते संस्थापक होते. ’सुबोध पत्रिका’ या साप्ताहिकाचेही ते संपादन करीत.

इ.स. १९००मध्ये केळकर पॅरिस येथे विणकामाचे प्रदर्शन पाहण्यासाठी गेले. पॅरिसहून इंग्लंडला जाऊन त्यांनी. तेथे वर्षभर विणकामाचा अभ्यास केला. तेथून त्यांनीे काही यंत्रसामग्रीही खरेदी करून भारतात आणली. या सर्व प्रवासासाठी, शिक्षणासाठी आणि यंत्र सामग्रीसाठी त्यांच्या मित्रांनी केळकरांना आर्थिक मदत केली होती. भारतात आल्यावर सदाशिव पांडुरंग केळकर यांनी स्वतःच एक कापड विण्ण्याचे यंत्र तयार केले. हातमागाचा प्रसार करण्याचा आणि त्यासाठी नवीन प्रकारची यंत्रे बनवण्याचा त्यांचा इरादा होता. पण त्यापूर्वीच २० डिसेंबर १९०६ रोजी केळकरांचे निधन झाले.

संसार[संपादन]

सदाशिव पांडुरंग केळकर यांचे लहानपणीच लग्न झाले होते. पण त्यांची पहिली पत्नी लवकरच वारली. दुसरे ल्ग्न त्यांनी मिरजेच्या सीतारामपंत अलूरकर यांच्या दुर्गा नावाच्या विधवा कन्येशी केले(इ.स. १८७८). हे त्या काळात मोठेच धाडस होते. या विवाहासाठी डॉ. रामकृष्ण भांडारकरांनी प्रार्थनासमाजाच्या तत्त्वांप्रमाणे एक खास विवाहविधी तयार केला होता. लग्नाचे पौरोहित्यही भांडारकरांनी केले. कन्यादान न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व सौ. रमाबाई रानडे यांनी केले. लग्नानंतर केळकरांनी पत्नीचे नाव उमाबाई ठेवले. उमाबाई सदाशिवरावांप्रमाणेे अतिशय बुद्धिमान होत्या.

लग्नानंतर उमाबाईंनी खासगीरीत्या इंग्रजीचे शिक्षण घेतले. सदाशिवराव प्राथनासमाजाचे सभासद होते. उमाबाईही झाल्या. लग्नानंतर तीन वर्षांनी म्हणजे १८८१ साली केळकरांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून देऊन, पूर्णवेळ प्रार्थनासमाजाचे काम करण्यास सुरुवात केली, तर उमाबाईंनी सुईणीच्या कामाचे रीतसर शिक्षण घेतले, आणि संसाराची आर्थिक जबाबदारी उचलली. उमाबाईंनी सुईणीच्या कामात इतके कौशल्य प्राप्त केले की राजेरजवाड्यांकडेही त्यांना या कामासाठी बोलावणी येऊ लागली.

सदाशिवराव आणि उमाबाई यांना नऊ अपत्ये झाली; त्यांतली तीन अगदी लहान वयातच वारली. उरलेल्या सहा अपत्यांमध्ये चार मुलगे आणि दोन मुली होत्या. मुलींमधल्या थोरलीचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी झाला. हीच मुलगी पुढे ताराबाई मोडक म्हणून प्रसिद्ध पावली.

सदाशिव पांडुरंग यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • मूर्तिपूजा आवश्यक आहे काय?
  • ग्रंथप्रामाण्य