शंकर शिवदारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर शिवदारे हे सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यासाठी झालेल्या चळवळीत ८ मे १९३० रोजी हुतात्मा झालेले स्वातंत्र्यसैनिक होते.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूर जिल्हयातील व्यक्तींनीही मोठे योगदान दिले आहे. येथील चार हुतात्म्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जे बलिदान दिले, त्यामुळे सोलापूर शहराला हुतात्मानगरी म्हणूनही ओळखले जाते. मल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ नारायण शिंदे आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन ही त्या चार हुतात्मांची नावे आहेत. पण त्या आधीही सोलापुरात एक तरुण हुतात्मा झाला, त्याचे नाव शंकर शिवदारे. सोलापूर जिल्हयात स्वातंत्र्यलढयाचे पडसाद लोकमान्य टिळकांच्या कालखंडापासूनच उमटत होते.

५ मे १९३० रोजी महात्मा गांधींना इंग्रज सरकारने अटक केल्याचे वृत्त सोलापुरात समजले, तेव्हा लोक अवस्थ झाले. ६ मे रोजी सोलापूर शहरात युवकांनी , महिलांनी मिरवणुका काढून गांधीजींच्या अटकेचा निषेध नोंदविला. काही जणांनी तर प्रक्षुब्ध होऊन नासधूस करण्यास सुरुवात केली. दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. याच दिवशी “रात्री 8.30 वाजता टिळक चौकात काँग्रेसच्या वतीने श्री. जाजूंनी सभा घेतली.श्री. जाजू, राजवाडे, शेठ गुलाबचंद, शेठ माणिकचंद शहा, कुर्बान हुसेन, महाजन वकील, च.रा. वांगी, सिद्रामप्पा फुलारी, आशण्णा इराबत्ती, कु.हिराबाई रांगोळी, डॉ. अंत्रोळीकर, कुंजविहारी, पंचप्प जिरगे, अंबण्णप्प शेडजाळे, डॉ. व्होरा, भांबुरे, जगन्नाथ शिंदे हे वक्ते होते.

सोलापूर शहरात काही विपरित घडू नये म्हणून काँग्रेसने शांततेचे आवाहन केले व सर्व कार्यक्रम तूर्त रद्द करावे असे ठरविले. मात्र तरुण कार्यकर्ते शांत रहायला तयार नव्हते. त्यांनी वेगळी सभा घेऊन सोलापूरमध्ये तीन दिवसांचा हरताळ पाळण्याचा निर्णय घेतला. सोलापूरमधील वातावरण तापत गेले. ७ मे १९३० रोजी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. स्वातंत्र्यलढ्यातील नेते वीर नरीमन आणि जमनालाल बजाज यांना सरकारने अटक केल्याचे ८ मे रोजी कळाले. त्यानंतर तर सोलापुरातील कार्यकर्त्यांचा संयम संपला. युवक संघाने सकाळीच जंगी मिरवणूक काढली व टिळक चौकात मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले.

खरे तर मिठाचा सत्याग्रह जिथे समुद्रकिनारा आहे, तिथेच करता येणार होता. पण तरीही त्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्याकरिता सोलापूरकरांनी एक विशाल मोर्चा काढला होता. मोर्चातले दीडदोनशे सत्याग्रही मोर्चानंतर सोलापूरच्याबाहेर, शिंदीच्या बनात गेले. शिंदी म्हणजे एक प्रकारचे खजुरासारखे झाड. त्या झाडापासून ‘ताडी’ नावाचे एक मद्यसदृश पेय केले जाते. त्या सत्याग्रहींनी ठरवले होते की, नाही मीठ, तर नाही; शिंदीची झाडे तर आहेत; आणि दारूबंदीच्या दृष्टीनं शिंदीची झाडे तोडणे हाही एक प्रकारचा सत्याग्रहच आहे. मग काय, ते सत्याग्रही शिंदीच्या बनात घुसून शिंदीची झाडे तोडू लागले. ही बातमी सोलापूरच्या कलेक्टरपर्यंत जाऊन धडकली. त्याचं नाव होते ‘नाईट.’ त्याने इन्स्पेक्टर नॅपेट आणि काही पोलिसांसह शिंदीच्या बनाकडे धाव घेतली आणि अनेक सत्याग्रहींना जागेवरच अटक केली. हे समजताच जमाव प्रक्षुब्ध झाला. अटक केलेल्यांना सोडा असा सर्वांचा आग्रह होता. कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर पोलीस घेऊन तेथे आले. कलेक्टर गाडीतून उतरलेते पिस्तुल रोखूनच, त्यामुळे जमाव अधिकच भडकला. तेवढ्यात मल्लपा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी नावाचे एक वजनदार सत्याग्रही धावत धावत तिथे आले त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले. भडकलेल्या सत्याग्रहींना त्यांनी शांत केले आणि त्यांच्या तावडीतून कलेक्टरची सुटका केली. पकडलेल्यांना सोडावे याबाबत चर्चा सुरू असतानाच एक २० वर्षाचा धाडसी तरुण हातात झेंडा घेऊन कलेक्टरकडे धावत आला आणि त्याने थेट कलेक्टरांकडेच मागणी केली; ‘‘तुम्ही शिंदीच्या बनात ज्या सत्याग्रहींना अटक केली आहे, त्यांची त्वरित सुटका करा. कारण आता आम्ही तुम्हाला सोडले आहे.’’ तेव्हा एका सॉर्जंटने गोळी झाडली, त्यात त्या तरुणाचा मूत्यू झाला. तो तरुण म्हणजेच सोलापुरचा पहिला हुतात्मा शंकर शिवदारे होय.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ पुंडे, नीलकंठ (प्रथम आवृत्ती , मार्च २००९). मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे. सोलापूर: सुविद्या प्रकाशन , सोलापूर. pp. २, ४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)