विजय धोंडोपंत तेंडुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विजय तेंडुलकर या पानावरून पुनर्निर्देशित)
विजय धोंडोपंत तेंडुलकर
Vijay Tendulkar.jpg
विजय तेंडुलकर
जन्म नाव विजय धोंडोपंत तेंडुलकर
जन्म जानेवारी ६, १९२८
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू मे १९, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कथा
अपत्ये प्रिया तेंडुलकर

विजय तेंडुलकर (जानेवारी ६, १९२८ - मे १९, २००८) हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक होते.

जीवन[संपादन]

विजय तेंडुलकरांचा जन्म जानेवारी ६, १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कलखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुण्यात आणि मुंबईत त्यांचे वास्तव्य होते.

१९६६ नंतर मात्र ते मुंबईतच राहिले व तेथे त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द घडवली. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले.

चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये 'आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. आकाशवाणीसाठीही त्यांनी नाटके लिहिली. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते.

कारकीर्द[संपादन]

नाटके[संपादन]

लेखनदृष्ट्या 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.

'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन सघर्षही झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.

चित्रपट[संपादन]

तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.

मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती-समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते.

"देशातील वाढता हिंसाचार" या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्‍या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचा जिव्हाळा होता.

साहित्य[संपादन]

पुरस्कार[संपादन]

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, इ.स. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. इ.स. १९९८ मध्ये संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्तीही त्यांना मिळाली होती.

वाद[संपादन]

तेंडुलकरांच्या लेखनाबरोबरच त्यांच्या मुलाखतीही तितक्‍याच गाजल्या. त्यातून अनेक वादविवादही झडले. त्यांचा स्वभावच वादळे अंगावर घेण्याचा. त्यातूनच हजारो लोकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारी माणसे आज समाजात आहेत. त्यांचे मारेकरी होण्यास मला आवडेल असे जळजळीत उद्‌गारही बाहेर पडले. पुरस्कार स्वीकारताना जाहीर व्यासपीठावरून आमच्या पिढीने स्वतःलाच फसवले अशी खंतही तितक्‍याच सहजपणे व्यक्त झाली.

बाह्य दुवे[संपादन]

अधिक माहिती[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.