वारली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वारली शैलीतील एक भित्तीचित्र

महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. मुख्यत्वे ठाणे जिल्ह्यात वास्तव्य.

काही समाजात काही वेगळे कलागुण जोपासले जातात आणि तीच कला त्यांची ओळख बनते. जेव्हा तुम्ही वारली म्हणता, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर चटकन वारली चित्रकला येते. वारली चित्रकला हि यांची खासियत आहे. “वारली” भारतातील एक अनुसूचित जमात. वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांत तसेच दाद्रा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे व नासिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. एकूण लोकसंख्या सु. ५,६७,०९३ (१९८१) एवढी होती. वारली या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी अनेक कथा, दंतकथा व वदंता प्रसृत झाल्या आहेत. प्राचीन साहित्यातही या जमातीचे भिन्न नावांनी उल्लेख आढळतात. कात्यायनाने वार्तिकात निषाद, व्यास व वरूड या तीन अनार्य जमातींचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी वरूड म्हणजे वारली होत, असे वि. का. राजवाडे यांनी महिकावतीच्या बखरीत म्हटले आहे. 'वरूड' शब्दावरून वरुडाई-वारुली-वारली अशी त्यांनी व्युत्पत्ती दिली आहे. डॉ. विल्सन यांच्या मते दक्षिणेतील सात कोकणांपैकी वरलाट ह्या कोकणात राहणारे ते वारली, अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. आर्. इ. एन्थोवेन व लॅथॅम हे वारली ही भिल्लांचीच एक पोटजात असल्याचे नमूद करतात.