लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.[१] २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.
लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.[२] या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.[३]
हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे.