लीलावती भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लीलावती भागवत

लीलावती भागवत (माहेरच्या लीला पोतदार; ५ सप्टेंबर, १९२०:रोहा, रायगड जिल्हा, महाराष्ट्र - २५ नोव्हेंबर, २०१३:पुणे, महाराष्ट्र) या मराठीतल्या बालकुमार साहित्यिक होत्या. एस.एन.डी.टी. विद्यापीठातून १९४०साली त्यांनी पदवी संपादन केली. मराठी आणि हिंदी भाषांच्या शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम राबवला केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या.[ स्पष्टिकरण हवे]


लीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ मे १९४०रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले. भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व द.ग. गोडसे यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले.[ संदर्भ हवा ]

मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले.

अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला. साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदीनंतरसुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांचे वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[ संदर्भ हवा ]

पुस्तके[संपादन]

  • फसगत
  • वाट वळणावळणाची (या पुस्तकात लीलावतींनी आपल्या गीताई या आजीचे-वडिलांच्या आईचे- व्यक्तिचित्र रेखाटले आहे.)
  • स्पर्शबोली

बालसाहित्य[संपादन]

  • अभयारण्यातील चोरी
  • आला विदूषक आला
  • इंजिन हे छोटे
  • कमळजेचा मित्र मासा
  • कूड कूड थंडी
  • कोण असे हे राव
  • कोणे एके काळी
  • खेळू होडी होडी
  • चिट्टू पिट्टूचा पराक्रम
  • छोट्यांच्या छोट्या गंमती
  • जगाला प्रेम अर्पावे
  • झुमझुम झोकानी चमचम चांदण्या
  • पांढरा चाफा
  • प्रेमचंद कथा
  • फास्टरफेणेचा कंपू
  • भाराभर गवत (संपादन)
  • भावले भावले
  • मचव्यातले साहस
  • मुलांची जडण-घडण
  • मुलांसाठी दासबोध
  • रघू रघू राणा
  • राजा पिल्लाची गोष्ट
  • रानातील रात्र (याचे हिंदी रूपांतर अरुंधती देवस्थळींना ’जंगल की एक रात’ या नावाने केले आहे.)
  • सोन्याची लूट
  • स्वर्ग की सैर (हिंदी)
  • स्वर्गाची सहल

हे सुद्धा पहा[संपादन]

गौरव[संपादन]