रिचर्ड लॉरेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रिचर्ड लॉरेन्स (इ.स. १८००?:इंग्लंड - जून १३, इ.स. १८६१:वॉशिंग्टन डी.सी.) हा अमेरिकन अध्यक्षाचा खून करण्याचा प्रयत्न करणारा पहिला माणूस होता.

लॉरेन्स हा मनोरूग्ण होता. तो रंगारी होता व रंगातील रसायनांनी त्याचा आजार बळावल्याची शक्यता आहे. त्याचा असा समज होता की तो इंग्लंडचा राजा रिचर्ड तिसरा होता व अमेरिकन सरकारकडून त्याला खूप पैसे येणे होते. त्याच्या समजानुसार अमेरिकन अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन हे पैसे त्याला मिळु देत नव्हता.

याचा 'बदला' घेण्यासाठी लॉरेन्सने दोन पिस्तुले खरेदी केली व जॅक्सनवर पाळत ठेवु लागला. जानेवारी ३०, इ.स. १८३५ रोजी जॅक्सन दक्षिण कॅरोलिनाच्या प्रतिनिधी वॉरेन आर. डेव्हिसच्या अंत्ययात्रेसाठी गेला. लॉरेन्सने एका खांबामागुन जॅक्सनवर नजर ठेवली व जसा तो जवळ आला, त्यासरशी लॉरेन्सने पुढे होउन जॅक्सनवर मागुन पिस्तुल रोखले व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी झाडली गेलीच नाही. ते पाहता लॉरेन्सने दुसरे पिस्तुल झाडले परंतु त्याचीही तीच गत झाली. तोपर्यंत जॅक्सन व ईतरांनी लॉरेन्सला पाहिले व झटापट सुरू झाली. जॅक्सनने हातातील काठीने लॉरेन्सला टोले लगावले व ईतरांनी त्याला पकडले.

एप्रिल ११, इ.स. १८३५ रोजी लॉरेन्सवर खटला चालवण्यात आला. पहिल्या पाच मिनीटात ज्युरीने लॉरेन्सला वेडपणाच्या कारणामुळे निर्दोष ठरवला. लॉरेन्सला मनोरूग्णांच्या दवाखान्यात ठेवण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला.