मोतीलाल चिमणलाल सेटलवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोतिलाल चिमणलाल सेटलवाड हे भारतातील सुप्रसिद्ध वकील होत. त्यांचे वडील सर चिमणलाल सेटलवाड हेदेखील एक नामांकित वकील होते. मोतिलाल यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८४ साली अहमदाबाद येथे एका गुजराती कुटुंबात झाला. काही वर्षांनंतर चिमणलाल मुंबईत स्थायिक झाले. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून मोतिलाल १९०६ साली ते एलएल. बी. झाले.

मुंबईत त्यांनी आपल्या वडिलांच्या हाताखाली वकिलीला सुरुवात केली. वकिली पेशाला लागणारे सर्व कलागुण मोतिलाल यांच्यात होते. त्यांचा आवाज अत्यंत प्रभावशाली होता. त्यामुळे विरुद्ध पक्षाचा वकील नामोहरम होऊन जायचा. तरीही त्यांच्या आवाजात कधीच भावनात्मक चढ-उतार येऊ न देण्याची ते दक्षता घेत असत. त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता. न्यायालयात आपल्या अशिलाची बाजू मांडताना अत्यंत आत्मविश्वासाने ते चौफेर नजर फिरवत बाजू मांडायचे. ते मुद्देसूद आणि स्वच्छ मुद्दे मांडीत असत. विरुद्ध पक्षाच्या वकिलाची बाजू मांडणे चालू असताना ते त्याला कधीही मध्ये थांबवत नसत. ते कुणाहीकडून अतिशय वाजवी शुल्क आकारीत असत. वकिली पेशात नैतिक मूल्ये जपूनही यशस्वी होता येते, हे त्यांनी दाखवून दिले.

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते १९३७ साली मुंबईचे ऍडव्होकेट जनरल झाले आणि नंतर १९५०मध्ये ते भारताचे ऍटर्नी जनरल झाले. भारताचे ऍटर्नी जनरल हे पद त्यांनी सलग १३ वर्षे (१९५०-६३) भूषविले. एवढय़ा दीर्घ काळ ऍटर्नी जनरल पदावर राहणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी १९५५-५८ सालांत स्थापन झालेल्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्षपदही भूषविले.

मोतिलाल सेटलवाड हे खरोखरच चिमणलाल या आदरणीय पित्याचे आदरणीय पुत्र होते. मोतिलाल सेटलवाड यांनी त्यांचे वडील चिमणलाल यांचा चांगुलपणा नुसता आत्मसात केला असे नाही, तर त्यांनी तो वृद्धिंगतही केला. मोतिलाल यांची बौद्धिक क्षमता आणि न्यायवैद्यक शास्त्राची जाण त्यांना वकिली पेशाच्या सर्वोƒ पदापर्यंत घेऊन गेली. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. `माय लाइफ : लॉ ऍण्ड अदर थिंग्ज' हे त्यांचे आत्मचरित्रही अतिशय प्रसिद्ध आहे.

मोतिलाल यांचे पुत्र अतुल सेटलवाड हेही नामांकित वकील आहेत, तर सून सीता सेटलवाड सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मोतिलाल यांची नात आणि अतुल आणि सीता सेटलवाड यांची कन्या तिस्ता सेटलवाड याही सुप्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

मोतिलाल सेटलवाड यांच्या न्यायव्यवस्थेतील उत्तुंग कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांचा १९५७ साली `पद्मविभूषण' देऊन सन्मान केला.