माहूर
| ?माहूर महाराष्ट्र • भारत |
|
| — तालुका — | |
|
|
|
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जिल्हा | नांदेड |
| भाषा | मराठी |
| तहसील | माहूर |
| पंचायत समिती | माहूर |
| कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ++०२४६२ • MH26 |
गुणक:
माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत.येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] भौगोलिक स्थान
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत.
[संपादन] दुसरे पीठ- श्री रेणुकामाता (माहूरगड)
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. आख्यायिका-
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला . तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले . शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला . आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली .नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला . तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ' इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर ' असे सांगितले . परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले . या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो दु : खी होऊन शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल . फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले..!!
[संपादन] कसे जायचे
- नांदेडपर्यंत - नांदेड हे लोहमार्गानुसार मध्य रेल्वेवर येते. मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडला आगगाडीने थेट जाता येते..
- माहूरपर्यंत - नांदेड ते माहूर अशी एस्टीची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालविते. हा प्रवास सुमारे तीन तासाचा आहे.
- माहूर गांव ते टेकडीवरील मंदिर - शहरातून टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावतात. त्याऐवजी काही खाजगी सेवादेखील मिळतात.
- नागपूर ते माहूर हे रस्त्याने अंतर (वर्धा-यवतमाळ-मार्गे) सुमारे २२० किलोमीटर आहे. या प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या व काही अत्यल्प खाजगी वाहनेही मिळतात.
[संपादन] राहण्याची व्यवस्था
[संपादन] माहूरगड
[संपादन] रेणुकादेवी मंदिर
[संपादन] दत्तात्रेय मंदिर
पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.
माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अ. 30) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.
माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनीं सध्याचे मंदिर सन 1297 मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त 10' X12' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.
या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिऱ्या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. 'माळवातीर्थ' म्हणून ओळखलें जाणारें तीर्थ म्हणजे महानुभावीय साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.
[संपादन] परशुराम मंदिर
[संपादन] वस्तुसंग्रहालय
गावात एक छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालय आहे.त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे.
[संपादन] हेसुद्धा पाहा
- देवीची साडेतीन पीठे
- श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी
- श्री क्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी माता
- श्री क्षेत्र कोल्हापूर श्रीमहालक्ष्मी माता
- विष्णूकवी
- श्री अंबादेवी देवस्थान, अमरावती
- श्री एकविरादेवी देवस्थान, अमरावती
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| नांदेड जिल्ह्यातील तालुके |
|---|
| अर्धापूर | भोकर | बिलोली | देगलूर | धर्माबाद | हदगाव | हिमायतनगर | कंधार | किनवट | लोहा | माहूर | मुदखेड | मुखेड | नांदेड तालुका | नायगाव | उमरी |