महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मनसे या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पक्षाध्यक्ष राज ठाकरे
स्थापना ९ मार्च २००६
मुख्यालय दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स,
छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई[१]
विधानसभेमधील जागा
राजकीय तत्त्वे महाराष्ट्राचा आणि मराठीचा सर्वांगीण विकास,
मराठी राष्ट्रवाद[२]

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (संक्षिप्त : मनसे) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.२०१६ या वर्षापासून मनसेचा दरवर्षी गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मुंबई येथे (शिवतीर्थावर) भरतो लाखो लोकांची या मेळाव्याला उपस्थिती असते

ध्येय आणि धोरण[संपादन]

१. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

२. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.

३. महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते.

४. जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.

५. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी त्याच्या आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणाऱ्या सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी सर्व पातळींवर संघर्ष करणे, यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामांची उभारणी करणे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रचनात्मक कामे व संघर्षात्मक कामे यात फरक मानत नाही. ही दोन्हीही मूलत: हातात हात घालून येणारी कामे यथाशक्ति करणे.

६. मराठी माणसाला न्याय देताना `मराठी भाषा अकादमी'सारख्या संस्थेची स्थापना करण्यापासून अन्‌ महाराष्ट्रद्वेष्ट्या परप्रांतीयांविरुद्ध रस्त्यावर संघर्ष करण्यापासून (खळ्ळ खट्याक्) ते सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे, मराठी भाषेतील सर्व ज्ञानकक्षा रुंदावणे या साऱ्या गोष्टी एकाच वेळी रचनात्मक कामे करून व रस्त्यावर संघर्ष करून पक्षाला साध्य करायच्या आहेत.

७. महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.

८. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात व समाजकारणात तीव्र संघर्षाद्वारे परप्रांतीयांचे वर्चस्व संपूर्णतः नेस्तनाबूत करणे आणि `मराठी माणसासाठीच महाराष्ट्र' ह्यानुसार आग्रही असणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा आहे.

९. भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे.

१०. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राचा विकास आराखडादेखील तयार केला आहे, त्याबाबत राज ठाकरे असे म्हणाले "ज्या एका महान माणसाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचे याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तसच हा महाराष्ट्र ज्या तमाम संतांनी, समाजसुधारकांनी घडवला त्या सर्वांना मी हा महाराष्ट्राचा विकास आराखडा अर्पण करतोय". - राज ठाकरे [३]

प्रमुख आग्रह[संपादन]

शिवाजी पार्क, मुंबई येथील जाहीर सभेत परप्रांतीयांविरोधात भाषण करताना राज ठाकरे

महाराष्ट्रात घुसखोरी करणारे परप्रांतीय रोखणे आणि मराठी माणसाला संधी देणे[संपादन]

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत परप्रांतीयांचे स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना बाहेरचे येऊन जागा अडवत आहेत. काही राजकीय शक्ती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न करीत आहेत, आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती महाराष्ट्रातून लोप पावताना दिसत आहे.

मराठी माणसाला संधी न देता महाराष्ट्रात परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न जिथे जिथे सुरू आहेत तिथे आंदोलन करून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवले आहे.[४]

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य[संपादन]

मराठी भाषा वैभवसंपन्न व्हायची तर महाराष्ट्रातल्या मुलांना ती भाषा शाळेपासूनच शिकवली गेली पाहिजे. शाळा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची मराठी भाषा शिकवायची नाही हे कसे चालेल? महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत-मग ती सरकारी असो, वा खाजगी, कुठल्याही माध्यमाची असो, शहरी असो किंवा ग्रामीण-मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे असा पक्षाचा आग्रह आहे.[५]

सर्वत्र मराठी आणि मराठी पाट्यांचाच आग्रह[संपादन]

भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ह्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले, हजारो जेलमध्ये गेले आणि मुंबईत १०६ हुतात्म्यांनी आहुती दिली. हे सगळे झाले आपल्या मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी. त्यानंतर महाराष्ट्र राज्यानेही स्वतःचा कायदा केला आणि सर्वत्र मराठी पाट्या असाव्यात असा आदेश दिला. ह्या कायद्याचे काटेकोर पालन व्हावे असा पक्षाचा कटाक्ष होता आणि आहे.

भाषा टिकली तर संस्कृती शिल्लक राहील. संस्कृती राहिली तर माणूस टिकेल. मराठी माणूस टिकवायचा तर भाषा जपावी लागेल.[६]

निवडणुका[संपादन]

२००९ विधानसभा निवडणूक[संपादन]

मनसेला २००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लक्षणीय यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिकठाणे येथील एकूण १३ आमदार निवडून आले. "मनसे'ला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. एकोणतीस जागांवर "मनसे'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.

२०१२ सालच्या महानगरपालिका निवडणुका[संपादन]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी

महानगरपालिका विजयी उमेदवार
बृहन्मुंबई महानगरपालिका २८
ठाणे महानगरपालिका
उल्हासनगर महानगरपालिका
पुणे महानगरपालिका २९
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका ४०
अकोला महानगरपालिका
अमरावती महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
Source: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग[७]
सर्वाधिक संख्याबळ

संकेतस्थळ[संपादन]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर लगेचच पक्षाने आपल्या संकेतस्थळाची सुरुवात केली. ह्या संकेतस्थळावर पक्षाच्या संदर्भातल्या माहिती बरोबरच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक माहिती आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

==संदर्भ व नोंदी==शाम उबाळे

  1. ^ "मनसे - कार्यालय". Archived from the original on 2009-05-05. 2009-10-03 रोजी पाहिले.
  2. ^ "मनसे - ध्येय आणि धोरण". Archived from the original on 2012-05-29. 2012-02-25 रोजी पाहिले.
  3. ^ "महाराष्ट्राचा विकास आराखडा". mnsblueprint.org. Archived from the original on 2020-10-24. 2020-09-23 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2011-07-12. 2012-02-25 रोजी पाहिले.
  5. ^ "राज ठाकरे यांचे पत्र दि. ९ जुलै, २००८". Archived from the original on 2011-07-12. 2012-02-25 रोजी पाहिले.
  6. ^ "राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८". Archived from the original on 2011-07-12. 2012-02-25 रोजी पाहिले.
  7. ^ "महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग - महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२".