भीमसेन जोशी
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
| भीमसेन जोशी | |
|---|---|
स्वरभास्कर पं भीमसेन जोशी |
|
| उपाख्य | पंडितजी |
| टोपणनावे | अण्णा |
| आयुष्य | |
| जन्म | फेब्रुवारी ४, इ.स. १९२२ |
| जन्म स्थान | रोना कर्नाटक |
| मृत्यू | जानेवारी २४, इ.स. २०११ |
| मृत्यू स्थान | पुणे |
| मृत्यूचे कारण | वृद्धापकाळ |
| व्यक्तिगत माहिती | |
| धर्म | हिंदू |
| वांशिकत्व | हिंदू |
| नागरिकत्व | भारतिय |
| देश | भारत |
| भाषा | मराठी, कनडा |
| पारिवारिक माहिती | |
| वडील | गुरुराज जोशी |
| जोडीदार | सौ वत्सला जोशी |
| संगीत साधना | |
| गुरू | सवाई गंधर्व ,गाण्यातील आदर्श - बालगंधर्व,सूरश्री केसरबाई केरकर |
| गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, काही कन्नड, मराठी,व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन. |
| घराणे | किराणा घराणे |
| संगीत कारकीर्द | |
| पेशा | गायकी |
| कारकिर्दीचा काळ | १९४१ - २०११ |
| गौरव | |
| गौरव | डॉक्टरेट डि. लिट्. |
| पुरस्कार | भारतरत्न पुरस्कार पद्मश्री पुरस्कार संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार संगीताचार्य पुण्यभूषण पुरस्कार स्वरभास्कर पुरस्कार तानसेन पुरस्कार |
| अधिक माहिती | |
| संकीर्ण | त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. |
| तळटिप | गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. |
स्वाक्षरी |
|
| बाह्य दुवे | |
| संकेतस्थळ | |
पंडित भीमसेन जोशी (कन्नड: ಪಂಡಿತ ಭೀಮಸೇನ ಗುರುರಾಜ ಜೋಷಿ ; मराठी: भीमसेन जोशी ;) (फेब्रुवारी ४, इ.स. १९२२; गदग, कर्नाटक - जानेवारी २४ इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र)
उच्चार (सहाय्य·माहिती)); हे भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.
अनुक्रमणिका |
संगीतशिक्षण [संपादन]
भीमसेन जोश्यांचे वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले.
त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खाँ, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले. अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.
भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.
कारकीर्द [संपादन]
भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.
त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.
भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत.
भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.
अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक जानेवारी २४,इ.स. २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.
वैशिष्ट्ये [संपादन]
मराठी अभंग [संपादन]
’संतवाणी’ आणि ’अभंगवाणी’ हे संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे ह्यांनी अनुक्रमे स्वरबद्ध केलेले आणि पंडीतजींनी स्वरसाज चढवलेले अल्बम खूप गाजले. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे :
- अगा वैकुंठीच्या राया
- आता कोठे धावे मन
- अधिक देखणे तरी
- अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा
- आरंभी वंदीन, अयोध्येचा राजा
- ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव
- इंद्रायणी काठी
- कान्होबा, तुझी घोंगडी चांगली
- काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल
- मन, रामरंगी रंगले
- माझे माहेर पंढरी
- नामाचा गजर, गर्जे भीमातीर
- पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान
- रूप पाहता लोचनी
- तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल
- पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
- सावळे सुंदर, रूप मनोहर
- याचसाठी केला होता अट्टाहास
गौरव [संपादन]
भीमसेन जोशींना अ॑नेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही इ.स. १९७२साली मिळालेलापद्मश्री पुरस्कार, इ.स. १९७६ सालचा संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार, आणि इ.स. १९८५ सालचा पद्मभूषण पुरस्कार हे आहेत. जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने त्यांना संगीताचार्य ही पदवी दिली तर पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डि. लिट्. ही पदवी दिली. इतर पुरस्कारांमध्ये पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ने सन्मानित केले आहे. नोव्हेंबर ४, २००८ रोजी भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे जाहीर केले [१].
त्यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रात पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे.
त्यांनी केलेल्या संगीताच्या सेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहे.
संदर्भ [संपादन]
- ↑ सकाळ वर्तमानपत्रातील बातमी. जानेवारी २२, इ.स. २००८ रोजी पाहिले.
बाह्य दुवे [संपादन]
- धारवाडच्या संकेतस्थळावरील पंडितजींची माहिती
- म्युझिकल निर्वाण संकेतस्थळावरील पंडितजीवरील लेख
- किराणा गायकीचे अभ्यासक तात्या अभ्यंकर यांचा पंडितजींवर त्यांच्या जन्मदिनानिमित्त लेख
- 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली गाणी
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||
|
|||||||||||
बाह्य दुवे [संपादन]
- बदल करण्याजोगे लेख
- संगीतातील अपूर्ण लेख
- अपूर्ण लेख
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
- भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते
- हिंदुस्तानी गायक
- भारतीय शास्त्रीय गायक
- मराठी गायक
- कन्नड गायक
- तानसेन पुरस्कारविजेते
- पद्मश्री पुरस्कारविजेते
- पद्मभूषण पुरस्कारविजेते
- भारतरत्न पुरस्कारविजेते
- संगीत नाटक अकॅडमी पुरस्कारविजेते
- पुण्यभूषण पुरस्कार विजेते
- स्वरभास्कर पुरस्कार विजेते
- पद्मविभूषण पुरस्कारविजेते
- इ.स. १९२२ मधील जन्म
- इ.स. २०११ मधील मृत्यू
- मराठी पार्श्वगायक
