पक्षी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पक्षी हे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रीय पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी. जीवशास्त्रीय दृष्ट्या पक्ष्यांचे सर्वात ठळक वैशिठ्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. उडण्याची क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. पक्ष्यांचे दुसरे वैशिठ्य म्हणजे पिसे. सर्व पक्ष्यांना पिसे,चोच व चार कप्याचे हृदय असते. हृदयाच्या चार कप्यांमुळे पक्षी उष्ण रक्ताचे आहेत. पिसे व चोचीच्या रचनेमुळे पक्ष्यांचे वजन अतिशय हलके असतात, तसेच पिसे पक्ष्यांचे थंडीपासून संरक्षण करतात व सर्वात महत्वाचे म्हणजे उड्ण्याची क्षमता प्रदान करतात.
अनुक्रमणिका |
[संपादन] उत्पत्ती
पक्ष्याची उत्पती प्राचीनकालीन डायनासॉर पासून झाल्याचे मानण्यात येते. सुरुवातीला या कल्पनेची शक्यता वाटणे कठीण होते, कारण डायनासॉर थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी तर पक्षी उष्ण रक्तीय उडणारे प्राणी. उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमध्ये ही कल्पना सत्य असल्याचे दिसून आले. गेल्या शतकात जर्मनीतील एका खाणीत आर्चिओप्टेरिक्स या पक्ष्याचा सांगाडा मिळाला. या सांगाड्याला पंखांची रचना होती व पंखामध्ये पक्ष्यांमध्ये न आढळणार्या नख्या होत्या व सरपटणार्या प्राण्यांच्या जबड्याऐवजी आजच्या पक्ष्यात आढळणारी चोच होती. तसेच पक्ष्यांमध्ये नसलेली लांब शेपटी होती. अशा प्रकारे या उत्क्रांतीमधील महत्वाच्या दुवा असलेल्या सांगाड्याने सिद्ध केले की पक्षी हे सरपटणार्या प्राण्यांपासून बनले. आजच्या पक्ष्यांच्या कवटीची रचना व रक्तातील लालपेशी ह्या सरपटणार्या प्राण्यांशी साधर्म्य सांगणार्या आहेत. तसेच पक्ष्यांच्या पावलांवरील खवले व नख्यांची रचना, नखे दुमडायची पद्धत ह्या सरपटणार्या प्राण्यांशी जवळचे नाते सांगतात. पक्षीही सरपटणार्या प्राण्यांप्रमाणे अंडी घालतात. अंड्याचे कवच व आतिल रचना ही देखील मिळतीजुळती आहे. ज्याप्रमाणे काही सरपटणारे प्राणी नियमितपणे आपल्या कातडीची कात टाकतात तसेच काही पक्षी अजूनही आपली पिसे झडून पाडतात व नवीन पिसे धारण करतात. जीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष्यांची पिसे ही जनावरांच्या खवल्यांचे बदललेले रुप आहे.
[संपादन] शरीर रचना
पक्ष्यांचे शरीराचे तापमान ३८° ते ४४° इतके असते व साधारणपणे सस्तन प्राण्यांपेक्षा थोडेच जास्तच असते. त्यांची पिसे ही उत्तम उष्णतारोधकाचे काम करतात, त्यामुळे त्यांना शरीराचे तापमान कायम ठेवणे सोपे जाते. पिसांचा उपयोग थंड प्रदेशात अतिशय चांगला होतो व जर खाणे पिणे व्यवस्थित मिळाल्यास बाहेरील तापमान कमी असतानाही अतिशय निवांतपणे जीवन कडक थंडीतही व्यतीत करतात. परंतु याच उष्णतारोधक पिसांचा त्यांना उष्ण वातावरणात तोटा होण्याची शक्यता असते. पक्ष्यांची हालचाल इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर उष्णतादेखील निर्माण होते. सस्तन प्राण्यांमध्ये घाम आणणार्या स्वेद ग्रंथी असतात जे तापमान नियंत्रणाचे काम करतात परंतु पक्ष्यांना अश्या स्वेद ग्रंथी नसतात. यामुळे उष्ण तापमानात हालचालीमुळे त्यांना ताप येउन जादा तापमान होउन मृत्यू ओढावण्याची शक्यता असती परंतु निसर्गाने त्यांना फुप्पुसांमध्ये हवेचे फुगे प्रदान केले आहेत ज्यामुळे पक्ष्यांचे जादा उष्णता निर्मूलनाचे काम पटकन होते.
पक्ष्यांची पिसे विविधरंगी असतात. एकाच पक्ष्याला शरीराच्या विविध भागांवर अनेक रंगाची पिसे असतात. हे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसर्या जातीच्या पक्ष्यापेक्षा वेगळे करतात. तसेच नर मादीचे रंगही वेगळे असतात. सामान्यतः पक्ष्यांमध्ये नर अधिक सुंदर असतो. कुठल्याही पक्ष्याला तीन प्रकारची पिसे असतात.
- बाह्य पिसे- ही पिसे सर्वात बाहेरची असतात.यांना काँटूर पिसे अथवा पेने असे म्हणतात. याच पिसांचे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसर्या जातीपासून वेगळे ठरवतात. यात साधारणपणे शेपटीची पिसे, उड्डाणांची पिसे व इतर बाह्य पिसे यांचा समावेश होतो.
- अंतर्बाह्य पिसे- या पिसांना प्ल्युमुले असे म्हणतात. ही पिसे लवचिक असतात व बाह्य पिसांखाली लपून असतात.
- अंतर्गत पिसे- ही पिसे सर्वात आतमध्ये असतात व केसांच्या लवीप्रमाणे दिसतात. जोपर्यंत वरची पिसे काढत नाहीत तोवर ही पिसे दिसत नाहीत. हि पिसे उड्डाणात भाग घेत नाहीत.
[संपादन] पंखांची रचना व उड्डाणे
वेगवेगळे खाद्य मिळविण्यासाठीच्या हालचालींना अनुरुप अशी पक्षांच्या पंखाची व उड्डाणाची रचना असते.
- एकाच ठिकाणी पंख न हालविता तरंगणे
- जलद झेप
- पंखाची थोडी उघडझाप करुन हवेत तरंगणे
- हवेत तरंगताना मधेच पंखांची जलद फडफड
- पंखांची जलद फडफड करुन जलद उड्डाण
- भरारी मारत असतांना मधेच पंख मिटणे
- कमी उंचीवर पंखांची अतिजलद फडफड
- सरळ उड्डाण व जलद फडफड
[संपादन] चोच
पक्ष्यांच्या विविध चोचींचे उपयोगानुसार प्रकार -
१)मासे पकडण्यासाठी दातर्या असलेली
२)दलदल किंवा चिखलातुन अन्न गाळुन घेण्यासाठी
३)पाणी/चिखलातील अन्न शोधण्यासाठी
४)लाकुड तासण्यासाठी
५)फुलातील मध खाण्यासाठी
६)बिया/कठीण कवचाची फळे फोडुन खाण्यासाठी
७)मास चिरण्यासाठी व फाडुन खाण्यासाठी
८)कापण्यासाठी
[संपादन] विविध जाती व कुळे
जगात एकूण पक्ष्यांच्या साधारणपणे ८,६०० जाती आहेत,उपजाती व स्थानिक बदल लक्षात घेतल्यास हा आकडा ३०,००० जाईल.त्यापैकी सुमारे २६५ जाती नामशेष झाल्या असाव्यात.
[संपादन] वर्तन
बहुतांशी पक्षी हे दिनचर आहेत. फारच थोडे पक्षी हे निशाचर असतात. घुबडांमधील बहुतांशी जाती निशाचर आहेत. तसेच रात्रबगळा, टिटवी हे काही पक्षी निशाचर आहेत.
[संपादन] खाद्य
पक्ष्यांच्या मध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. मध फुलांतील मकरंद, फळे, लहान रोपे, बिया, छोटे प्राणी, साप, व विविध प्रकारचे किडे पक्षी खातात. काही शिकारी पक्षी वगळता किडे हे बहुतांशी पक्ष्यांचे आवडते अन्न आहे. किंबहुना किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच पक्ष्यांचा जन्म झाला आहे असे मानण्यात येते. पक्ष्यांना दात नसल्याने ते चोचिने खाद्य प्रथम जितके लहान आकारात तोडता येईल तिकके तोडतात व लगेच गिळतात. चर्वणाची पुढील प्रक्रिया पोटात पार पडते.
[संपादन] स्थलांतर
ठरल्या वेळी एका मुलुखातुन दुसर्या मुलुखात स्थलांतर करायचे व नंतर नियमितपणे परतायचे हे पक्षांच्या स्थलांतराचे खास लक्षण आहे. उडण्याच्या वरदानामुळे पक्षी इतर प्राण्यांपेक्षा जास्त लांबवर स्थलांतर करतात. पक्ष्यांचे स्थलांतरास अनेक कारणे असतात त्यातील कारणे खालीलप्रमाणे
- अन्नाची उपलब्धता -
- हवामान- थंड हवामान सोसण्याची क्षमता- पक्ष्यांची थंडी सोसण्याची क्षमता चांगली असते तरी युरोप, सायबेरीयातील पक्षी येथील अतिकडक हिवाळा आवाक्याबाहेरचा असतो. म्हणून या भागातील पक्षी दक्षिणेकडील उबदार प्रदेशात म्हणजे, उत्तर अफ्रिका, मध्यपूर्व इराण, भारतीय उपखंडात व आग्नेय अशियात स्थलांतर करतात. युरोप व सायबेरियातील उन्हाळ्यामध्ये या भागात खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते व पक्षी पुन्हा सायबेरिया व युरोपात स्थलांतर् करतात.
- जनुकिय सवयी- लक्षावधी वर्षांची स्थलांतराची सवय यामुळे बहुतांशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या जातींमध्ये जन्मतः स्थलांतराचे ज्ञान असते. - उदा; पेरु व चिली देशातील काही पक्षी, जनुकीय सवयींमुळे अन्न उपलब्ध नसलेल्या भागातही स्थलांतर् करतात.
- सुरुक्षितता - शिकार्यांपासून सुरक्षितता
[संपादन] पक्ष्यांचे महत्व
[संपादन] भारतीय पक्षी
पक्ष्यांच्या ८५०० जातींपैकी मोठ्या प्रमाणावरील जाती भारतात आढळतात. भारतात एकूण १२०० जातीचे पक्षी आढळतात. स्थानिक जातींप्रमाणेच स्थलांतरीत जातींचीही संख्या पुष्कळ आहे. कावळा,कबूतर व चिमणी हे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत.
[संपादन] संदर्भ व नोंदी