नामदेवराव एकनाथ नवले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावबहादुर नामदेव एकनाथ नवले (जन्म : इ.स.१८९४) हे ब्रिटिश भारतातील वकील आणि राजकारणी होते. ते बडोदा कॉलेज मधून बी.ए.आणि मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयातून एल्‌.एल.बी. झाले. शिक्षणासाठी त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप आणि दिवाण बहादुर धमासकर स्कॉलरशिप ही विद्यावेतने मिळाली होती. १९२३ मध्ये ते मुसळगावच्या कृष्णराव शिंदे सरदेशमुखांच्या कमला नावाच्या कन्येशी विवाहबद्ध झाले.

नवले वकिली करत असतानाच ते अहमदनगर जिल्हा स्कूलबोर्डाचे चेरमन झाले. पुढे मुंबई विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ते मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर निवडून गेले. एकूण दहा वर्षे मुंबई काउन्सिलचे ते एक प्रमुख ब्राम्हणेतर सदस्य होते. सभासद असतानाची त्यांची हुशारी आणि कर्तबगारी जाणून त्यांना नंतर काउन्सिलचा उपसभापती म्हणून निवडून दिले गेले.

नामदेवराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामपूरमध्ये १९२७मध्ये सातारा जिल्हा शेतकी संमेलन झाले होते. ते १९२९ मध्ये झालेल्या मध्य प्रांत आणि वऱ्हाड ब्राम्हणेतर संमेलनाचेही अध्यक्ष होते. हिंदुस्थानच्या भेटीला आलेल्या सायमन कमिशनपुढे त्यांनी ब्राम्हणेतरांची कैफियत जोरदारपणे आणि सहजपणे अमान्य न करता येतील असे दाखले देऊन मांडली होती. ब्राम्हणेतर पक्षाचे नेते आणि प्रतिनिधी या नात्याने त्यांनी १९३० साली दिल्लीला भरलेल्या सर्वपक्षीय संमेलनात नामदेवरावांनी हजेरी लावली होती. ते काही काळ अहमदनगर जिल्हा बोर्डाचे सदस्य, तर काही काळ अहमदनगर आणि संगमनेर नगरपालिकांमध्ये नगरसेवक होते.

नामदेवराव नवले यांनी उपभोगिलेली पदे[संपादन]

  • अहमदनगर जिल्हा बोर्डाचे सदस्य
  • अहमदनगर नगरपालिकेचे नगरसेवक
  • मध्य प्रांतात झालेल्या ब्राम्हणेतर संमेलनाचे अध्यक्ष
  • मुंबई प्रांतातल्या प्राथमिक शिक्षक संमेलनाचे अध्यक्ष (मुंबई १९३३)
  • मुंबई प्रांताच्या स्थानिक स्वराज्य संमेलनाचे अध्यक्ष (नाशिक, १९३३)
  • मुंबई प्रांतातील स्कूल बोर्ड्‌सचे कार्यकारी अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्या संमेलनाचे अध्यक्ष (मुंबई, १९३४)
  • मुंबई लेजिलेटिव्ह काउन्सिलचे आधी दहा वर्षे सदस्य आणि मग उपसभापती
  • पुणे आणि सोलापूर जिल्हा मराठी शिक्षण संमेलनांचे अधक्ष (पुणे व बार्शी, १९३१-३२)
  • १ जानेवारी १९२३ला त्यांना ब्रिटिश सरकारने रावबहादुर हा किताब दिला.
  • संगमनेर नगरपालिकेत नगरसेवक
  • सातारा जिल्हा शेतकी संमेलनाचे अध्यक्ष (१९२७), वगैरे.