नयनतारा (मराठी अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नयनतारा व्होरा (जन्म: इ.स. १९४०; मृत्यू : मुंबई, ३० नोव्हेंबर इ.स. २०१४) या एक मराठी नाट्य-चित्र आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी १९६८ मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. मराठी चित्रपटसृष्टीत सुधीर जोशी यांच्यासह नयनतारा यांची जोडी कमालीची गाजली. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटामधील लीलाबाई काळभोर ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्या काळी चांगलीच गाजली होती. सहारा चॅनलवरील 'गिल्ली डंडा' या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले होते. एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विनोदी भूमिकांनाही त्यांनी न्याय दिला. बिनधास्त शैलीतील संवादफेक व मुद्राभिनय यासाठी त्या ओळखल्या जात होत्या.

मधुमेहामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला होता. प्रकृतिअस्वास्थ्यामुळं नयनतारा शेवटची १० वर्षे सिनेनाट्यसृष्टीपासून दूर होत्या. त्यापूर्वी त्यांनी माऊली प्रॅाडक्शन, कलावैभव, चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांत भूमिका केल्या होत्या.

‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका केली होती. हे नाटक सुपरहिट झाले. त्यानंतर नाटक आणि सिनेमात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेच्या आईची अनेकदा भूमिका केल्याने त्या लक्ष्याची आई म्हणून ओळखल्या जात होत्या.

दीपेश व्होरा हे नयनतारा यांच्या मुलाचे नाव.

नयनतारा यांची भूमिका असलेली नाटके[संपादन]

  • इथे भेटलात ते भेटलात
  • कार्टी प्रेमात पडली
  • शांतेचे कार्टे चालू आहे. (श्रीनिवास भणगे यांच्या मूळ ’घालीन लोटांगण’ या नाटकावर बेतलेले नाटक)
  • स्मार्ट वधू पाहिजे

नयनतारा यांची भूमिका असलेले चित्रपट[संपादन]

  • अशी ही बनवाबनवी (१९८८)
  • आई पाहिजे (१९८८)
  • आधार (२००२)
  • आनंदी आनंद (१९८७)
  • कुंकवाचा करंडा (१९७१)
  • खुळ्यांचा बाजार (१९९२)
  • जिगर (१९९८)
  • तू सुखकर्ता (१९९३)
  • धांगडधिंगा (१९९९)
  • बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७)
  • सगळीकडे बोंबाबोंब (१९८८)

नयनतारा यांची भूमिका असलेल्या चित्रवाणी मालिका[संपादन]

  • कॅप्टन येणार आहे
  • खऱ्याची दुनिया
  • गिल्ली डंडा (हिंदी)
  • मुलगा माझा बाजीराव

नयनतारा व्होरा यांचे हिंदी चित्रपट[संपादन]

  • खिलाडी ४२० (इ.स. २०००)

दम (इ.स. २००३)