दादर पारसी कॉलनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दादर पारसी कॉलनी

दादर पारसी कॉलनी (अधिकृत नाव - मंचेरजी जोशी पारसी कॉलनी) ही पारसी समुदायाची दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्ती आहे. दादर-माटुंगा लोकवस्तीमधे ही कॉलनी स्थित आहे. इतर पारसी कॉलनींप्रमाणे (पारसी कॉलनीला ’बाग’ या शब्दशः अर्थाने देखील संबोधलं जातं) या कॉलनीला भिंती किंवा कुंपणाची मर्यादा घातलेली नाही व शेजारच्या लोकवस्तीपासून ही कॉलनी वेगळी देखील केलेली नाही. या कॉलनीमधेच प्रसिद्ध फाईव्ह गार्डन आहे, जे प्रसिद्ध पारसी मंचेरची जोशी यांनी बनवलं.

दादर पारसी यूथ असेंब्ली (The Dadar Parsi Youth Assembly - DPYA)चे माध्यमिक विद्यालय देखील याच विभागात स्थित आहे.

इतिहास[संपादन]

ही कॉलनी पारसी समुदायाकरीता, श्री. मंचेरजी एदलजी जोशी यांच्या अथक प्रयत्नांमधून साकारली आहे.

१८९९-१९०० मधे दादर - माटुंगा - वडाळा - सायन या मुंबईच्या पहिल्या उपनगरीय योजनेअंतर्गत हा विभाग बांधण्यात आला. मुंबई नगर विकास विश्वस्तांनी इ.स. १८९० साली मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीनंतर ही योजना तयार केली होती. यामागे उद्देश असा होता की शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेल्या लोकसंख्येच्या दाटीला इतरत्र जागा मिळावी. सर्वेक्षण योजनेनुसार सुमारे ६०,००० नागरिकांना दादर-माटुंगा विभागात, तितक्याच नागरिकांना सायन-माटुंगा विभागामधे घरे मिळणार होती. ८५,००० नागरिकांना शिवडी-वडाळा येथील विकसीत भागात घरे दिली जाणार होती.

ही योजना अंमलात आणताना या विभागात योग्य स्वच्छता कशी राहील याचीदेखील काळजी घेतली गेली होती. कोणतीही इमारत तीन मजल्यांपेक्शा जास्त उंच नसेल व दोन इमारतींच्या मधे भरपूर मोकळी जागा असेल, असे पाहिले गेले होते. भू-क्षेत्राचा उपयोग आवासीय, व्यावसायिक व संस्था अशा मिश्र बांधकामांसाठी केला गेला होता. उद्याने, बाग-बगीचे व रस्त्यांची योग्य योजना केलेली होती.

या भू-क्षेत्रातील ४४० एकर भाग सरकारसाठी विक्री किंवा भाडेतत्त्वावर देण्यासाठी राखून ठेवण्यात आला होता. नवीन विकसीत क्षेत्राचा योग्य लाभ मिळावा म्हणून प्रथमच सहकारी समितींची स्थापना करण्यात आली होती. दादरमधील पारसी व हिंदू कॉलनी अशाच प्रकारे विकसीत केल्या गेल्या आहेत.

मोहम्मदअली मार्ग या नवीन तयार केलेल्या मार्गामुळे दादरक्रॉफर्ड मार्केट मधील अंतर केवळ १० कि.मी. झाले. ट्राम व्यवस्थादेखील या नवीन वसवलेल्या उपनगरापर्यंत पोहोचवण्यात आली. GIP (इंग्लिश: Great Indian Peninsular Railway network) तर्फे, आज ज्याला टिळक ब्रीज किंवा टिळक पूल म्हणून ओळखतात, तो पुल बांधला गेला. या पुलामुळे दोन उपनगरीय रेल्वे जोडण्यास मदत झाली. लवकरच, फेब्रुवारी १९२५ मधे GIP रेल्वेने आपली उपनगरीय वाहिनी उघडली व रेल्वेच्या विद्युतीकरणास सुरुवात केली. BCIP योजनेअंतर्गत येथे हलविण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांपैकी काही संस्था म्हणजे VJTI (मराठी: व्ही.जे.टी.आय.), द सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वाडीया वाच्छा, ज्याला आता जे.बी. वाच्छा पारसी मुलींचे माध्यमिक विद्यालय म्हणून ओळखले जाते.

या आलीशान कॉलनीमधे सुमारे १५,००० पेक्षा जास्त पारसी लोक राहातात. केवळ मुंबईतच नव्हे तर बहुधा जगामधेही जिथे बहुसंख्येने पारसी लोक राहात आहेत, अशी ही एकमेव वस्ती असावी.

विशेष[संपादन]

दिवंगत ब्रिटिश संगीतकार व क्वीन या संगीतसमूहाचे मुख्य गायक फ्रेडी मर्क्युरी उर्फ फारोख बलसारा (इंग्लिश: Freddie Mercury) हे मूळचे भारतीय पारसी व दादर पारसी कॉलनीतील रहिवासी होते, हे फारच थोड्या जणांना माहित आहे.