जीवन विद्या मिशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीवन विद्या मिशन ही समाजाच्या उत्कर्षासाठी आणि उन्नतीसाठी झटणारी एक संस्था आहे. सद्गुरू वामनराव पै हे १९५५ सालापासून ह्या संस्थेच्या माध्यमातून जीवन विद्येचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

जीवन विद्येचे खालील दोन संकल्प आहेत,

  • हे जग सुखी व्हावे
  • हे हिंदुस्तान राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे.

"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" ह्या सिद्धांताभोवती जीवनविद्येचे तत्त्वज्ञान फिरते. सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये जीवनविद्येचा प्रसार झाला. आजमितीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीवनविद्येची केंद्रे सुरू झाली आहेत व लाखो लोकांनी जीवनविद्येचा स्विकार केलेला आहे. जीवनविद्या ज्ञान या जगातील प्रत्येकासाठी सुलभ आणि उपलब्ध होण्यासाठी. जीवनविद्येची जीवनमूल्ये आत्मसात करा जी चांगल्या मानवाला, मानसिकतेत परिवर्तन, सुसंवादी विचार, प्रेम आणि पर्यावरणाची काळजी याकडे नेत आहेत.

जीवनविद्या म्हणजे काय[संपादन]

जीवनविद्या हे जीवनाचे विज्ञान आणि यशस्वी आणि सुसंवादी जीवन जगण्याची कला आहे. जीवनविद्या चेतन आणि अवचेतन मनाची भूमिका आणि त्यांच्यातील संबंध शोधते. जीवनविद्या विशिष्ट मन व्यवस्थापन व्यायाम प्रदान करते जे आपल्याला जीवन यशस्वीपणे आणि सामंजस्याने हाताळण्यासाठी कौशल्यांसह सक्षम करते. हे मन व्यवस्थापन व्यायाम आपल्याला अत्यंत सकारात्मक विचारांचे नमुने तयार करण्यास मदत करतात. सकारात्मक विचार व्यक्तीसाठी फायदेशीर आहे तर सुपर सकारात्मक विचार व्यक्ती आणि प्रत्येकासाठी फायदेशीर आहे.

सुपर पॉझिटिव्ह विचार पद्धती आपल्या नातेसंबंधांवर, आरोग्यावर, कल्याणावर आणि जीवनाच्या सर्व पैलूंवर सकारात्मक परिणाम करतात.

इतिहास[संपादन]

सदगुरू श्री. वामनराव पै हे दादर व इतर मध्यमवर्गीय विभागात प्रवचने करीत असत तेव्हा त्यांना हा संकल्प स्फ़ुरला की, कामगार विभागात कार्य करावे. कामगार विभागातील तळमळीचे व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते श्री. सहदेवराव कदम यांनी सदगुरूंची प्रवचने आयोजित करण्यात पुढाकार घेतला व त्यांना श्री. वसंतराव मुळे आणि श्री. भास्करराव यादव यांनी सुरेख साथ दिली. या सर्वांच्या सहकार्याने चिंचपोकळी येथील कामगार वेल्फ़ेअर सेंटर येथे श्री. सदगुरूंची प्रवचने सुरू झाली. परंतु ते सेंटर नंतर बंद झाल्यामुळे काळाचौकी येथील हनुमान मंदिरात नियमितपणे प्रवचने करण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन) स्थापनेचा संकल्प श्री. सदगुरूंना स्फ़ुरला व तो संकल्प विजयादशमीच्या सुमुहूर्तावर १९५५ साली साकार झाला. त्या दिवशी श्री.सदगुरूंनी जीवनविद्येचा ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केला. त्या प्रकाशात आज अज्ञान व अंधश्रद्धेच्या अंधारात चाचपडणाऱ्या लाखो दुःखी जीवांचे जीवन सुख, समाधान व शांती ह्यांनी उजळून निघत आहे.

नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन)ची नोंदणी १९८० साली झाली. कार्याचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त नेमले गेले. कार्यकारी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. १९८० साली २५ वर्षे पूर्ण झाली व त्या निमित्त मोठा समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला गेला. तसेच २००६ साली जीवनविद्येच्या परीसस्पर्शी क्रांतीला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ६ ते ८ जानेवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य दिव्य सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला.

जीवनविद्या गरिबांना वरदान, श्रीमंताना आधार व विश्वाला उपयुक्त असून ती धर्मातीत, वैश्विक व शाश्वत आहे. अखिल मानव जातीला जीवनाभिमुख करण्याचे, सुखी करण्याचे प्रचंड सामर्थ्य तिच्यात आहे.

बिन खर्चाची, बिन कष्टाची व फावल्या वेळी करता येणारी साधना - म्हणजे विश्वप्रार्थना - करायला श्री.सदगुरू सांगतात. ही विश्वप्रार्थना म्हणजे शांतिसुखाचा राजमार्ग आहे.

स्वरूप[संपादन]

श्री. सदगुरू वामनराव पै यांनी स्थापन केलेला नाम संप्रदाय हा मूळचा नाथ संप्रदाय असून आदिनाथांपासून गुरूंपरंपरा सुरू झाली. या संप्रदायात नामस्मरणप्रार्थना यांवर जास्त भर देण्यात व नंतर साधकांना दिव्य बोध व दिव्य साधना देण्यात येते.

कार्य[संपादन]

जीवनविद्येचे समाज प्रबोधनाचे कार्य प्रवचने, व्याख्याने, उत्सव, ग्रंथ दिंडी, संपर्क फेरी, अभ्यास वर्ग, युवा व बाल संस्कार केंद्रे, शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शनपर व्याख्याने, प्राथमिक व प्रगत अभ्यासक्रम, अभिनव विवाह सोहळा, नवनाट्य, उपासना यज्ञ, नामसंकीर्तन यज्ञ, प्रार्थना जपयज्ञ, ग्रंथ वाचन व चर्चा वर्ग वगैरे माध्यमांतून होते.

अंधश्रद्धा, अंधविश्वास, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे व ज्ञानाचे महत्त्व, प्रेमाने व मनापासून काम करण्याचे महत्त्व, राष्ट्र-भक्ती, कुटुंब-नियोजन, स्त्रियांना व वृद्धांना कुटुंबात आदराचे स्थान, मुलांवर-युवकांवर संस्कार, कर्म-कांडांची अनावश्यकता, जातीयता व विषमता यांपासून मुक्त्तता, शुभ बोलणे, शुभ विचार करणे, शुभ कर्म करणे यांचे महत्त्व, दैववादाचे दुष्परिणाम, डोळस श्रद्धा व आत्मश्रद्धेचे महत्त्व, शहाणपणाचे महत्त्व, प्रपंच व परमार्थ याचे संतुलन करण्याची गरज, जीवन जगणे ही कला कशी आहे, परमार्थात खऱ्या सदगुरूंचे महत्त्व इत्यादी अनेक जीवनाला उपयुक्त अशा विषयांवर जीवनविद्या ही संस्था मार्गदर्शन करते.

तत्त्वज्ञान[संपादन]

दिव्य संदेश[संपादन]

"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"

दिव्य शिकवण[संपादन]

या जगात 'शहाणपण' हे खरे अमृत होय. आपण दुसरयांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख-दुःख आपणाकडेच परत येते, हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगणे हेच खरे 'शहाणपण' होय.

दिव्य संकल्प[संपादन]

शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे
शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने

परमेश्वराची व्याख्या[संपादन]

निसर्गनियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर कृपा किंवा कोप करीत नाही तर माणूसच स्वतःच्या कर्मांनी स्वतःवर कृपा किंवा कोप करीत असतो.

जीवनविद्येची विश्वप्रार्थना[संपादन]

हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आंनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

क्रिया ते नशीब साखळी[संपादन]

परिस्थिती - संगती - संस्कार - वासना
विचार
आचार - सवयी - स्वभाव - नशीब

मूर्तिपूजा[संपादन]

जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे मूर्तिपूजा ही प्राथमिक स्वरूपातील साधना आहे (ज्याप्रमाणे शाळेत बिगरी इयत्ता- के.जी.असते त्याप्रमाणे). सर्वसामान्य लोकांना देव आकळता येत नाही ही अडचण ओळखून ऋषिमूनींनी लोकांना मूर्तिपूजा करण्यास सांगितले. मूर्तिपूजा करता करता साधकाची स्वस्वरूपाकडे दृष्टी वळेल असा त्यांचा हेतु होता. परंतु मूळ उद्देश राहिला बाजूला व लोक तपशीलातच अडकून पडले. (कर्म-कांड सुरू झाले.) थोडक्यात ज्याप्रमाणे बिगरी हा डिग्रीचा पहिला टप्पा असला तरी कायमचे बिगरीत बसणे शहाणपणाचे नाही, त्याचप्रमाणे कायमचे मूर्तिपूजेत अडकून रहाणे शहाणपणाचे नाही असे जीवनविद्या मानते. मू्र्तिपूजेनंतर खऱ्या देवाची ओळख होण्यासाठी स्वरूप भक्तीकडे वळणे व ती शिकण्यासाठी खऱ्या सदगुरूंना शरण जाणे जीवनविद्या आवश्यक समजते.

अंधश्रद्धा[संपादन]

जी करिते माणसाला गद्धा ती जाणावी अंधश्रद्धा. जी श्रद्धा माणसाला विवेकहीन बनविते, जिचे बुद्धी वा तर्काच्या कसोटीच्या आधारे समर्थन केले जाऊ शकत नाही, तिला अंधश्रद्दा म्हणता येईल. अशा अंधश्रद्धांच्या आहारी गेल्यामुळे माणसाकडून एरवी न होणारे वर्तनही होऊ शकते. कौल लावणे, लिंबू फ़ेकणे, उतारा टाकणे, नवस करणे, ,घराला उलटी बाहुली लावणे वा नाल लावणे, कोहळा टांगणे, वाहनाला लिंबू-मिरची लावणे, वा‍ऱ्या करणे, प्रदक्षिणा घालणे, भानामती, भूतबाधा, पिशाच्च बाधा, या सर्व अंधश्रद्धा आहेत.यांच्या आहारी जाऊन कधीकधी मारहाण केली जाते, भांडणे होतात. काही वेळेस तर लोकांना जाळण्यासारख्या घटना घडल्या आहेत. सदगुरू श्री. वामनराव पै व त्यांचे शिष्य या अंधश्रद्धांच्या विरुद्ध गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करीत आहेत.

पाप-पुण्य[संपादन]

जीवनात पाप-पुण्याचे स्थान फ़ारच मह्त्त्वाचे आहे, परंतु या सत्याची जाणीव लोकांना नाही असे दिसून येते. जे नास्तिक असतात ते पाप-पुण्याच्या कल्पना फ़ालतू आहेत असे समजतात व त्यांना फ़ारसे महत्त्व देत नाहीत.याच्या उलट जे आस्तिक आहेत ते अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पाप-पुण्यासंबंधी भलत्याच गैर समजुती उराशी बाळगतात.या संदर्भात जीवनविद्येचा द्दष्टिकोन स्पष्ट आहे.

जीवनविद्येने केलेली पाप-पुण्याची व्याख्या[संपादन]

बरी-वाईट क्रिया आणि त्याची अव्यक्त इष्ट-अनिष्ट प्रतिक्रिया या दोहोंच्या दरम्यान आपल्या क्रियेचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूपाने अंतर्मनात वास करून असतो व अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची व संधीची वाट पहात तेथे ठाण मांडून बसतो, तो सूक्ष्म ठसा म्हणजे पुण्य किंवा पाप होय.

नामस्मरण[संपादन]

स्मरण हा जीवनाचा पाया आहे.जसे स्मरण तसे जीवन असा माणसाचा प्रत्यक्ष अनुभव असतो. याचाच अर्थ असा,स्मरण सुधारले की जीवन सुधारते व स्मरण बिघडले की जीवन बिघडते. सामान्य माणसाचे स्मरण बिघडलेले असते. असे हे बिघडलेले स्मरण सुधारण्याचा साधा व सोपा उपाय म्हणजे देवाचे नामस्मरण करणे हा होय. देवाचे स्मरण हे जीवन असून देवाचे विस्मरण हे मरण होय.

मोक्ष[संपादन]

पारंपरिकपणे जन्म-मरण या चक्रातून सुटका म्हणजे मोक्ष असे समजले जाते. मोक्षाची ही कल्पना श्री. सदगुरू वामन राव पै यांना मंजूर नाही ते म्हणतात, अंतःकरणात स्वरूपाची जागृती होणे- आपण कोण आहोत याचे ज्ञान प्रकट होणे म्हणजेच मोक्षाची प्राप्‍ती होणे. मोक्ष म्हणजे मोकळा- अज्ञानातून मोकळे(मुक्त) होणे म्हणजे मोक्षप्राप्‍ती होणे. जन्म-मरणाची सुटका करून घेणे हे आपले उद्दिष्ट असता कामा नये असे त्यांचे म्हणणे आहे. कारण आपली अज्ञानातून सुटका झाल्यावर आपण पळ काढणे अयोग्य आहे. आपले अज्ञान दूर झाल्यावर आपण इतरांचे अज्ञान घालवण्यासाठी प्रयत्‍न करावेत असे त्यांचे सांगणे आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टीत जीवनविद्येचे तत्त्वज्ञान वैशिष्ट्यपूर्ण आहे व ते जास्त समाजाभिमुख आहे.

साक्षात्कार[संपादन]

  • अंतःकरणात स्वस्वरूपाची जागृती होऊन आत्मानुभव प्राप्‍त होणे यालाच देवाचा साक्षात्कार असे म्हणतात. या व्यतिरिक्त सामान्य लोक ज्याला देवाचा साक्षात्कार असे म्हणतात तो कमी-अधिक भ्रमाचाच प्रकार असतो.

मानवी जीवनात 'साक्षात्कार' या विषयाला फार महत्त्व स्थान आहे. परंतु लोकांना या सत्याची जाणीव झालेली दिसत नाही. माणसाला जो जन्म प्राप्‍त झालेला आहे तो देवाचा म्हणजे दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्यासाठीच होय. मानवी जीवनाची वाटचाल स्वभावतः साक्षात्काराच्याच दिशेने (Divine Consciousness) होत असते, अशी गैरसमजूत बऱ्याच विद्वान लोकांची झालेली दिसून येते. वास्तविक वस्तुस्थिती नेमकी याच्या उलट आहे. अज्ञान आणि अहंकार यांच्या आहारी जाऊन मानवी जीवन सुखदुःखाच्या चक्रव्युहात सापडलेले असते. या चक्रव्युहाचे भेदन करून साक्षात्काराचे अंतिम ध्येय माणसाला सहजासहजी गाठता येणे शक्य नसते. जर हे ध्येय साधावयाचे असेल तर त्यासाठी एका बाजूने प्रयत्‍न, दुसऱ्या बाजूने प्रार्थना व तिसऱ्या बाजूने 'शाब्दे परेचि निष्णात अशा सदगुरूंचे अचूक मार्गदर्शन आवश्यक असते.

जीवनसंगीताचे सप्‍तसूर[संपादन]

जीवनसंगीताचे सात सूर आहेत. १) जग २) कुटुंब ३) शरीर ४) इन्द्रिये ५) बहिर्मन ६) अंतर्मन ७) परमात्मा

जग[संपादन]

जग हा आपला परिघ आहे व आपण जगाचे केंद्र आहोत. आपले जगावर व जगाचे आपल्यावर असे परस्परांवर सतत परिणाम होत असतात.दुर्दैवाने भारतीय लोकांचा जगाकडे पाहण्याचा द्दष्टीकोण अत्यंत निराशाजनक (निगेटिव्ह) असा आहे.जग हे असार आहे.भ्रम आहे, नाशिवंत आहे,मिथ्या आहे असा द्दष्टीकोन स्वीकारल्याने लोकांना जीवनसंगीतातला हा पहिलाच बेसूर होऊन जीवन भयाण, भकास, त्याज्य व दुःखमय भासू लागते. अशा निराशजनक विचारसरणीचा परिणाम म्हणून भारतीयांची प्रयत्‍नवादाकडे पाठ झाली व दैववाद बोकाळला गेला. तसेच अशा निराशाजनक विचार-प्रणाली मुळेच या असार जीवनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्‍न करणाऱ्या बैरागी, साधू, संन्यासी यांविषयी छुपे आकर्षण निर्माण झाले. श्री. सदगुरू म्हणतात, सर्वसंग परित्याग (कुटुंब-नातेवाईक-व्यवसाय यांचा त्याग) करून साधू बनणे हा साक्षात पलायन वाद आहे.

ते म्हणतात, "मी" पणाचा त्याग, "मी अमूक" या कल्पनेचा पूर्ण त्याग हाच खरा सर्वसंग परित्याग आहे व तोच खरा साधु-संन्यासी आहे व हे करण्यासाठी घरादाराचा किंवा उद्योग-धंद्याचा त्याग करण्याची काही एकगरज नाही.

लोकांच्या या जगाबद्दल व वैराग्याबद्दल भोळसट व खूळचट कल्पना त्यांच्या सामूहिक अंतर्मनात जाऊन बसल्या आहेत व त्याचे द्दश्य परिणाम म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणावर आढळून येणारे दैन्य, दुःख व दारिद्र्य होय.वैराग्याच्या नावाखाली दैन्य, दुःख व दारिद्र्य यांचे कौतुक करणाऱ्या भारतीयांच्या मनातील विकृत कल्पनांना मुळासकट उपटुन काढल्या खेरीज भारताची प्रगती होणार नाही असे सदगुरू श्री.वामनराव पै यांचे म्हणणे आहे.

त्यांनी निर्माण केलेले जीवनविद्येचे तत्त्वज्ञान असे सांगते की, जग हे असार, मिथ्या व नाशवंत नसून ते सत्य, नित्य व नित्य नूतन आहे.जगात चांगले-वाईट, बरे-बुरे, सुष्ट-दुष्ट, उत्तम-अधम,उच्च-नीच, सुंदर-कुरूप असे सर्व आहे.

जग हे निसर्ग नियमांवर चालते. जे निसर्ग-नियम पाळतात त्यांच्यावर सुख-शांतीच्या फ़ुलांचा वर्षाव होतो या उलट जे निसर्ग नियम लाथाडतात त्यांच्यावर नियतीच्या लाथा खाण्याचे प्रसंग येतात.म्हणून जीवन संगीताचा हा पहिला स्वर सुरेखपणे हाताळणे आवश्यक आहे.

कुटुंब[संपादन]

जीवनसंगीतातील कुटुंब या दुसऱ्या स्वराचे स्थानही फ़ार महत्त्वाचे आहे. पत्‍नी व मुले हे मुले हे कुटुंब संस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत हे न लक्षात आल्यामुळे अनेकांचे संसार सुखाच्या नावाने साक्षात तापदायक रखरखीत वाळवंट झाले आहेत. पत्‍नीचे स्थान हे कुटुंबात अनन्यसाधारण असते व ती अनेक भूमिका अत्यंत कौशल्याने हाताळत असते. घरातील सर्वांची देखभाल करते म्हणून गृहमंत्री, पोटापाण्याची व्यवस्था करते म्हणून अन्न मंत्री, मुलांच्या अभ्यासाकडे-शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून शिक्षण मंत्री, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून आरोग्य मंत्री, पतीला योग्य वेळी योग्य सल्ला देऊन साथ देते म्हणून उत्कृष्ट सल्लागार अशा विविध भूमिका ती कुटुंबाच्या छोट्या राज्यात बजावत असते. अशी ही पत्‍नी कुटुंबरूपी किल्ल्याचा महत्त्वाचा बुरूज असते. हा बुरूज जर ढासळला तर किल्ला शत्रूच्या हाती सापडून विनाश ओढवला जाऊ शकतो. त्याप्रमाणे कुटुंबरूपी किल्ल्याचा पत्‍नी हा फार महत्त्वाचा बुरूज आहे हे लक्षात घेऊन ती सुस्थितीत, सुरक्षित व सुखरूप राहील याची दक्षता घेणे पतीचे कर्तव्य आहे.

जीवनविद्येचे कार्यक्रम[संपादन]

पुस्तकांची यादी[संपादन]

मराठी पुस्तके[संपादन]

  • तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ( लेखकाचे निवेदन : जीवनाकडे पाहाण्याचा सर्वसामान्य लोकांचा द्दृष्टीकोन दैववादी, प्रारब्धवादी, नशिबवादी असतो. त्याऐवजी आपलेच बहिर्मन व अंतर्मन परस्परांच्या संगनमताने कळत अथवा नकळत आपल्या व पर्यायाने समाजाच्या जीवनाला इष्ट किंवा अनिष्ट आकार देत असते हा दृष्टीकोन रूजवणे व त्यासाठी अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीचे उत्कृष्ट प्रबोधन जनमानसात करून मानवाच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनाला अचूक दिशा देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. तसेच मानवी जीवन सुरेख, सुसह्य, समृद्ध व सुखी करण्यासाठी विचारवंतांची खरी गरज आहे. पण विचारवंतांचा दुष्काळ व अविचारी लोकांचा सुळ्सुळाट ही आजची परिस्थीती असून हेच या जगाचे खरे दुर्दैव आहे. हे प्रमाण उलटे व्हावे यासाठी केलेला प्रयत्‍न म्हणजे या पुस्तकाची निर्मिती होय)
  • अमृत मंथन ( लेखकाचे निवेदन : अध्यात्मविद्येसंबंधी लोकांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजूती दूर करून प्रपंच व परमार्थ हे एकमेकांना पोषक असल्याने दोन्हीही जर युक्तिने केले तर प्रपंच चांग होतो व परमार्थ सांग होतो हयाबाबत मार्गदर्शन करणे व तळमळीच्या साधकांना त्यामुळे योग्य दिशा मिळून त्यांची त्यात प्रगती व्हावी हा या पुस्तकाचा उद्देश आहे. )
  • अंधार अंधश्रद्धेचा
  • ज्ञानेशांचा संदेश
  • नामाचा नंदादीप
  • जीवनविद्या दर्शन
  • विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे
  • माणसाचा जन्म कशासाठी?
  • तुमचे भाग्य तुमच्या विचारात
  • हीच खरी मूर्तिपूजा व हाच खरा धर्म
  • जीवनविद्येचा मंगल कलश
  • सुखाचा शोध आणि बोध
  • सुखी जीवनाचे पंचशील
  • सुगंध जीवनविद्येचा
  • परिस जीवनविद्येचा
  • जीवनविद्या स्मरणी
  • सार्थ हरिपाठ
  • शरीर साक्षात परमेश्वर
  • जीवनविद्या समज गैरसमज
  • स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे
  • संकल्प सिद्धीचे गुपित विश्वप्रार्थना

इंग्रजी पुस्तके[संपादन]

  • गिफ्ट ऑफ विस्डम (Gift of Wisdom)
  • युवर डेस्टिनी इन युवर‍ थॉटस‍ (Your Destiny in Your Thoughts)
  • द परपज ऑफ लाइफ (The Purpose of Life)
  • टुवर्ड्‌स‍ द गोल ऑफ ब्यूटिफुल‍ लाईफ (Towards the goal of Beautiful Life)
  • द रॉयल रोड टु पीस ॲन्ड हॅपिनेस‍ (The Royal Road to Peace and Happiness)
  • सर्च फॉर हॅपिनेस (Search for Happiness)
  • मास्टर की टु हॅपी लाइफ (Master Key to Happy Life)
  • गाइडन्स टु स्टुडन्ट्‌स (Guidance to Students)

पुस्तके मिळण्याची ठिकाणे[संपादन]

  • आयडीयल बुक डेपो, दादर, मुंबई
  • मॅजेस्टिक बुक डेपो, दादर, मुंबई
  • गुरुकृपा बुक डेपो, लालबाग, मुंबई
  • तुकाराम बुक डेपो, गिरगाव, मुंबई
  • बळवंत पुस्तक भंडार, गिरगाव, मुंबई
  • अक्षर धारा, पुणे
  • सागर बुक स्टॉल, ठाणे
  • मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे
  • जीवनविद्येच्या सर्व शाखा तसेच कार्यालये.

संकेतस्थळे[संपादन]

या विषयावरील अन्य पुस्तके[संपादन]

  • अंतर्मनाच्या शक्तीपलीकडील आत्मज्ञान (लेखक सरश्री)