जयदेवी लिगाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयदेवीताई लिगाडे (२३ जून, इ.स. १९१२:सोलापूर - २५ जुलै, इ.स. १९८६) या कन्नड भाषेतील एक कवयित्री होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव चन्नबसप्पा आणि आईचे संगव्वा मडकी होते. जयदेवीताईंचे वडील शिक्षणप्रेमी होते. संगव्वाबाई सामाजिक कार्यकर्त्या होता. आपल्या घरीच त्या स्त्रियांसाठी प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेत असत.

बालपण सोलापुरात गेले असल्याकारणाने जयदेवीताईचे सहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचे लग्न सोलापूरमधील धनाढ्य घरातील चनमल्लप्पा लिगडे यांच्याशी झाले. लग्नानंतर जयदेवीताईंनी कानडी भाषेचा अभ्यास करून तिच्यात प्रावीण्य मिळविले. त्यांनी कन्नड भाषेतील समृद्ध साहित्य मराठीत आणले. सोलापूरच्या सिद्धरामेश्वरावर त्यांची श्रद्धा होती. सिद्धरामेश्वराच्या वचनांचे मराठी भाषांतर करून जयदेवीताईंनी त्याचे ’सिद्धवाणी’ नावाचे पुस्तक १९५४ साली प्रकाशित केले. त्यानंतर त्यांनी बसवदर्शन, महायोगिनी वगैरे पुस्तके मराठीत आणली. श्री सिद्धाराम पुराण हे नवरसयुक्त महाकाव्य असून त्यामध्ये ४००१ ओव्या आहेत. या काव्याच्या निमित्ताने जयदेवीताईंनी मूळ कन्नडच्या बोलीभाषेत असलेला ’त्रिपदी छंद’ मराठी साहित्यिकांना परिचित करून दिला. या महाकाव्यात दहा-बारा प्रकारचे त्रिपदी छंद वापरल्यामुळे त्यांनी कन्नड साहित्य प्रांतातही मोठी कीर्ती मिळविली. डॉ. जयदेवी लिगाडे यांची कन्नड भाषेत १० आणि मराठीत ८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची दोन कानडी आणि एक मराठी पुस्तक अजून अप्रकाशित आहे.

साहित्यलेखनाशिवाय सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्म व राजकीय क्षेत्रातसुद्धा त्यांनी कार्य केले होते. महिलांसाठी प्रौढ शिक्षण, हस्तकला, वक्तृत्व आदींना त्यांनी प्रोत्साहन दिले. दलितोद्धार, कुटुंबनियोजन आणि स्त्रीस्वातंत्र्य यांसाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. हैदराबाद संस्थानातील पीडित नागरिकांना त्यांनी आपल्या शेतात आश्रय दिला होता. १९४८ साली महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर त्यांनी सोलापुरात विविध ठिकाणी शोकसभांचे आयोजन केले होते. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी(दावणगिरी) यांची नेत्रशिबिरे भरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या मराठी-कन्नड समरसतेच्या प्रतीक होत्या. अशा जयदेवीताई लिगाडे यांचे १९८६ साली, वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. बसवकल्याण येथे त्यांची समाधी आहे.

डॉ. जयदेवीताईंची कानडी पुस्तके[संपादन]

  • अरविंद कल्याणक
  • जयगीता
  • ताईत पदगळू
  • तारक तंबुरी
  • बंदेऊ कल्याणक
  • साविरद पदगळू
  • सिद्धरामेश्वर पुराण (महाकाव्य)

कानडीतून मराठीत आणलेली पुस्तके[संपादन]

  • अण्णबसवण्णा
  • त्रिविधी
  • बसवदर्शन
  • महायोगिनी (अक्क महादेवीची वचने)
  • महावीर वाण
  • शून्य संपादने (बृहत्भाषांतरित महाकाव्य- प्रकाशक मराठी साहित्य व संस्कृति मंडळ)
  • सिद्धवाणी (सिद्धरामाची वचने)
  • सिद्धलिंग वाणी

सन्मान, पुरस्कार[संपादन]

  • १९७४ साली मंड्या येथे झालेल्या अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते.
  • हुबळी येथील २६व्या अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या महिला अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
  • १९७१ साली कर्नाटक विश्वविद्यालयाने त्यांना सन्माननीय डी.लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.
  • ब्रिटिश सरकारने दिलेली ’केसरेहिंद’ ही पदवी त्यांनी नाकारली होती.