चीझ
चीझ (अन्य लेखनभेद: चीज ; इटालियन: formaggio, फोर्माज्ज्यो ; इंग्लिश: Cheese, चीज ; जर्मन: Käse, खेजअ ; फ्रेंच: fromage, फ्रोमाज ;) हा दुधापासून बनवलेला एक नाशवंत पदार्थ आहे. याचा उगम मुळात अतिरिक्त दुधाचा साठा करण्याच्या उद्देशाने झाला असावा असा कयास आहे. इजिप्तमध्ये इ.स.पू. २०००च्या सुमाराससुद्धा चीझ बनवले जात होते, असे पुरावे आहेत.
चीजचे बहुतेक प्रकार हे रेनेट नावाचे एन्झाइम वापरून केले जातात. रेनेट हे सर्व सस्तन प्राण्यांच्या आतड्यात आढळणारे एन्झाइम असते. त्याचा मुख्य उपयोग मातेच्या दुधाचे पचन होण्यासाठी असतो. इ.स.पू. ५००० ते ८००० या काळात भटक्या जमाती प्राण्यांच्या आतड्यांचा पखालीसारखा वा पिशव्यांसारखा उपयोग करत असत. त्या लोकांना रेनेटचा, दुधावर होणारा परिणाम माहीत झाला असावा, असा इतिहासकारांचा कयास आहे. रेनेटसदृश अन्य एन्झाइम वनस्पतिजन्य असू शकतात किंवा बुरशीतून केलेलेसुद्धा असतात. असे एन्झाइम वापरून केलेले चीझ शाकाहारी लोकांना चालू शकते. चीझ करताना वापरलेले दूध, त्यातील स्निग्धांश, चीझ करतानाचे तापमान व इतर पद्धती यांतील फरकांमुळे जगभर चीझचे शेकडो प्रकार असतील. स्कॉच व्हिस्की किंवा शँपेन यांप्रमाणे काही प्रकारचे चीझ हे त्या त्या भागातच तयार झालेले असले तरच ते, ते नाव लावू शकतात असे कायदे आहेत.