चर्चा:मदनलाल धिंग्रा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर हुतात्मा. त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला. ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण त्यांनी घेतले. पुढे त्यांनी भारतमंत्र्याचा स्वीय साहाय्य्क कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाउसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. मदनलाल यांना अटक होऊन फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.