गोविंदराम निर्मलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोविंदराम निर्मलकर (जन्म : १० ऑक्टोबर १९३५, मोहरा-छत्तीसगड, - रायपूर, २७ जुलै २०१४) हे एक मूळ मराठीभाषक नाट्य‌‌ अभिनेते आणि नृत्य-गायन-वादनप्रवीण लोककलाकार होते. त्यांचा जन्म राजनांदगाव जवळ असलेल्या मोहरा या गावात झाला होता. छत्तीसगडच्या 'नाचा' नावाच्या लोकनाट्याचा अभ्यास करून त्या कलाप्रकाराच्या सादरीकरणामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळविले होते.

इ‌. १९७१मध्ये गोविंदराम हे नाट्य दिग्दर्शक हबीब तनवीर यांच्या 'नया थिएटर या संस्थेत दाखल झाले. पुढे २००५ सालापर्यंत ते संस्थेचे प्रमुख अभिनेते म्हणून ओळखले जात. 'चरणदास चोर' हे त्यांचे गाजलेले हिंदी नाटक. त्या नाटकात निर्मलकरांची चोराची प्रमुख भूमिका असे. नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले. गोविंदरामांच्या जोरकस अभिनयामुळे या नाटकाला इंग्लंडमधील एडिंबरोला भरलेल्या आंतरराष्ट्रीय नाट्य समारोहात ५५ देशांच्या नाटकांतून उत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला होता. नाटकाच्या शेवटी जेव्हा सत्यासाठी चोर जीव देतो तेव्हा प्रेक्षकांनाही रडू येत असे.

गोविंदराम निर्मलकर विनोदी भूमिका तर उत्तम करीत होतेच, पण त्यांशिवाय गंभीर दृश्येही ते तितक्याच समर्थपणे सादर करत. बोलका गतिमान चेहरा, पाणीदार डोळे आणि जोशपूर्ण आवाजामुळे निर्मलकरांना रंगभूमीवरचे आणि 'नाचा'चे एकमेवाद्वितीय कलावंत समजले जाई. आयुष्याच्या शेवटची ८ वर्षांत गोविंदराम पक्षाघाताच्या आजाराने पीडलेले होते, तरीही त्यांच्या अभिनयकौशल्यात थोडीही कमरतरता आली नव्हती. त्यांना सरकारकडून महिना १५०० रुपये निवृत्तिवेतन मिळत असे.

गोविंदराव निर्मलकरांची भूमिका असलेली अन्य नाटके[संपादन]

  • आगरा बाजार
  • कामदेव का अपना वसंत ऋतु का सपना
  • गांव के नाम ससुरार मोर नाव दमाद
  • जिन लाहौर नई वेख्‍या वो जन्‍म्या ई नई
  • देख रहे हैं नैन
  • पोंगा पंडित
  • बहादुर कलारिन
  • मिट्टी की गाड़ी
  • लाला शोहरत बेग
  • वेणीसंघारम
  • शाजापुर की शांतिबाई
  • सोन सरार


गोविंदराम निर्मलकरांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • मध्य प्रदेश सरकारचा तुलसी सन्मान
  • छत्तीसगड सरकारचा दाऊ मंदरा पुरस्कार
  • भारत सरकारचा संगीत नाटक ऍकॅडमी पुरस्कार
  • पद्मश्री पुरस्कार


वर्गःहिंदी नाट्य अभिनेते